हेना मुर : (२ फेब्रुवारी १७४५ – ७ सप्टेंबर १८३३). इंग्लडमधील ब्रिस्टॉलमध्ये जन्मलेली हेना मुर एक यशस्वी कवयित्री, नाटककार, धर्मसुधारणावादी, प्रचारक, समाज सुधारक होती. स्त्री शिक्षण आणि गुलामगिरी निर्मूलनासाठी ती प्रयत्नशील होती. शालेय मुख्याध्यापक जेकब मुर यांच्या पाच मुलींपैकी ती चौथी होती. सर्व बहिणींनी त्यांचे प्राथमिक शिक्षण, लॅटिन तसेच गणिताचे शिक्षण वडिलांकडून घेतले. हेनाला मोठ्या बहिणींनी फ्रेंच भाषा शिकवली. ती एक विवेकी विद्यार्थीनी होती आणि कौटुंबिक परंपरेनुसार तिने लहान वयातच लिखाण सुरू केले. लहान वयातच ती नाटके लिहायला लागली. नंतर ती लंडनच्या अभिजात साहित्यिक वर्तुळात सामील झाली. हेना हिच्या पहिल्या साहित्यिक प्रयत्नांमध्ये ग्रामीण नाटके लिहिली गेली. यात दि सर्च आफ्टर हॅपिनेस (१७६२) चा विचार करता येईल. नम्र संभाषणामुळे साहित्यिक आणि बौद्धिक क्षेत्रामध्ये गुंतलेल्या स्त्रियांच्या ब्लूस्टॉकिंग समूहात ती प्रमुख ठरली. ब्लूस्टॉकिंग वर्तुळात तिचे स्वागत झाले आणि सर जोशुआ रेनॉल्ड्स, जॉन्सन, एडमंड बर्क आणि खासकरुन डेव्हिड गॅरिक यांनी तिच्या दि इन्फ्लेक्झिबल कॅप्टिव्ह (१७७५), पर्सी (१७७७) या नाटकांची निर्मिती केली. मात्र १७७९ मध्ये डेव्हिड गॅरिकच्या निधनानंतर तिने रंगमंचासाठीचे लिखाण सोडले आणि धार्मिक तसेच बोधपर लिखाण करण्यास सुरूवात केली.
ती गुलामांच्या व्यापाराविरूद्ध मोहीम राबविणार्या एका गटात सामील झाली. तिची नंतरची नाटके, कविता आणि पत्रिका अधिकाधिक नैतिकतेवर भाष्य करणार्या ठरल्या. १७९० च्या दशकात नैतिक, धार्मिक राजकीय विषयावर अनेक चीप रिपॉझिटरी ट्रॅक्ट्स पत्रिकांचे लिखाण तिने साक्षर परंतु गरीब जनतेसाठी केले. थॉमस पेनच्या राईट्स ऑफ मॅनचा प्रतिकार करण्यासाठी (१७९२) मध्ये लिहिलेले तिचे व्हिलेज पॉलिटिक्स इतके यशस्वी झाले की त्यामुळे चीप रिपॉझिटरी ट्रॅक्ट्स मालिकेची निर्मिती झाली. तिच्या बहिणी आणि मित्रांच्या मदतीने एका वर्षात २० लाख पत्रिका प्रसारित केल्या. ज्यायोगे गरिबांना चातुर्य व चिकाटीचे गुण जोपासण्याचा आणि देवावर आणि सभ्यतेच्या दयाळूपणावर विश्वास ठेवण्याचा सल्ला अगदी सरळ-सामान्य परंतु सुसंवादी भाषेत दिला. याच अनुषंगाने तिने १७८८ मध्ये थॉट्स ऑन दि इम्पॉर्टन्स ऑफ द मॅनर्स ऑफ द ग्रेट जनरल सोसायटी हा अभ्यासपूर्ण प्रबंध लिहिला.
दरम्यान, तिने आणि तिची बहीण मार्था यांनी ग्रामीण समरसेट परगण्यामध्ये स्थापित शाळांशी आपला संपर्क वाढविला आणि गरिबांच्या शिक्षणावर आपले विचार मांडले. तिच्या बहुतेक सुशिक्षित समकालीनांप्रमाणेच, तिचा असा विश्वास होता की समाज स्थिर आहे आणि ही सभ्यता गरिबांच्या चांगल्या वर्तणुकीवर अवलंबून आहे आणि म्हणून गरिबांचे सर्वोत्कृष्ट शिक्षण त्यांचे भविष्य बनवते. याच उद्देशाने तिने महिलांसाठी आणि मुलांसाठी शाळा स्थापित केल्या. ज्यात ख्रिश्चन धर्माच्या तत्त्वांचा सारांश शिकविणारे आणि योग्य असे कौशल्य शिकवले जात असे. यास विरोध झाला. विरोधकांना असे वाटत होते की गरिबांचे मर्यादित शिक्षण देखील शेतीतली त्यांची आवड नष्ट करेल. मात्र विरोध होत असतानाही तिने आपले शिक्षण देण्याचे प्रयत्न सतत चालू ठेवले. लेखिका म्हणून तिचे अंतिम लोकप्रिय यश कोलेब्स इन सर्च ऑफ ए वाईफ (१८०१) ही बोधपर काल्पनिक कादंबरी होय. २० व्या शतकाच्या उत्तरार्धातील स्त्रीवादी चळवळीने तिच्या स्ट्रेक्चर्स ऑन द मॉडर्न सिस्टम ऑफ फिमेल एज्युकेशन (१७९९) या पुस्तकाचा आधार घेत महिला शिक्षणाच्या प्रणालीसंबंधी तिचे विचार पुनरुज्जीवित केले.
हेना मुरने जनसमुदायासाठी शिक्षण आणि त्यांच्यात नैतिक मूल्ये रुजवण्याचे उद्दीष्ट शेवटपर्यंत चालू ठेवले. एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी चांगले नैतिक आचरण आवश्यक आहे या भावनेतून तिने गुलामगिरीविरूद्ध मोहीम राबविली आणि गरिबांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. या सर्वातून तिचे एक विशाल सामाजिक वर्तुळ निर्माण होत गेले आणि तिच्या प्रतिभेमुळे नाटक, कविता, स्तोत्रे, आणि धार्मिक उपदेशांची अनेक पुस्तकेही तयार झाली. तिने तिच्या आयुष्याचा शेवटचा भाग बार्लीवुड येथे व्यतीत केला.
संदर्भ :
- https://www.britannica.com/biography/Hannah-More.
- https://www.oxforddnb.com.More, Hannah (1745–1833), writer and philanthropist.