विख्यात ग्रीक तत्त्ववेत्ता ॲरिस्टॉटल याच्या महत्त्वाच्या ग्रंथांपैकी एक ग्रंथ. मूळ ग्रीक ग्रंथाचे हे लॅटिन नाव असून यामध्ये त्याने सजीव-सृष्टीच्या गुणांबद्दलचे भाष्य केले आहे. या ग्रंथामध्ये म्हटल्याप्रमाणे ॲरिस्टॉटलच्या मते, प्रत्येक सजीवाजवळ एक प्रकारचे चैतन्य असते. या चैतन्याला तो ‘आत्मा’ असे म्हणतो. आत्म्यासाठी अॅरिस्टॉटल सायकी (psyche) असा शब्द वापरतो. यालाच लॅटिन भाषेत ‘डी ॲनिमा’ म्हटले आहे. (कालांतराने हा शब्द मनासाठी वापरला जाऊ लागला). हे चैतन्य प्रत्येक सजीवामध्ये निरनिराळ्या प्रकारचे असते. त्यांच्यातला भेद त्याद्वारे होणाऱ्या कर्मांच्या आधारे कळू शकतो. ॲरिस्टॉटलच्या मते, प्रत्येक सजीवामध्ये पोषण आणि पुनरुत्पादन या किमान दोन पात्रता असणे आवश्यक आहे. वनस्पतींमध्ये पोषण करणे-करवणे आणि पुनरुत्पादन करणे या दोन पात्रता असल्यामुळे त्या चैतन्यमय आहेत. निम्नस्तरातील प्राण्यांमध्ये उपरोल्लेखित दोन पात्रतांशिवाय विविध ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने प्राप्त होणारी आकलनशक्ती आणि कर्मेंद्रियांद्वारे मिळणारी चलनवलन शक्ती असणे अपेक्षित आहे. ॲरिस्टॉटलने मानवांमध्ये मात्र या सर्वांच्या बरोबर बुद्धीचाही अंतर्भाव केलेला आहे.
ॲरिस्टॉटलने हे चैतन्य सगळ्या सजीव-सृष्टीचा गाभा असे मानले आहे. तसेच ते शरीरामध्ये उपस्थित असल्याचेही तो मानतो. प्रत्येक शरीरातील चैतन्य विशिष्ट असते आणि या विशिष्ट चैतन्यानुसार विशिष्ट सजीव निर्माण होतो. असे असल्यामुळे शरीराशिवाय या चैतन्याचे अस्तित्व असणे शक्य नाही. डी ॲनिमा या ग्रंथामध्ये ॲरिस्टॉटलने असे मत मांडले आहे, की चैतन्याची बहुतांशी कार्ये शरीराशीच निगडित असतात; परंतु काही वेळा बुद्धी हे कार्य शरीराबाहेर अस्तित्वात असू शकते. पण चैतन्य आणि ते ज्यात असते ते शरीर यांचा एकमेकांशी अवियोज्य प्रकारचा संबंध असल्याने चुकीच्या शरीरातील चैतन्याचे अस्तित्व अशक्य असते.
ग्रंथ संरचना : डी ॲनिमा हा ग्रंथ तीन भागांत असून त्यांतील पहिल्या भागामध्ये पाच, दुसर्या भागामध्ये बारा आणि तिसर्या भागामध्ये तेरा पाठ आहेत.
सारांश :
- भाग १ (पुस्तक पहिले) : पहिल्या भागात सामान्यपणे ॲरिस्टॉटलच्या संशोधनकार्याची पद्धत आणि चैतन्यात्मक सृष्टीतील द्वंद्व यांबद्दल चर्चा आहे. ग्रंथाच्या सुरुवातीला ॲरिस्टॉटल कबूल करतो की,सृष्टीतील चैतन्याची व्याख्या करणे हा एक अत्यंत कठीण प्रश्न आहे. परंतु व्याख्या करण्यासाठी तो एक कल्पक उपाय सुचवतो. तो या संदर्भात एक सूत्रमांडतो. ज्याप्रमाणे कोणत्याही वस्तूचे ज्ञान आपण तिच्या गुणकर्मांच्या आधारे करून घेऊ शकतो त्याचप्रमाणे निसर्गातील कोणत्याही बाबीचे एकदा का आपल्याला गुण आणि कर्म कळले की, आपल्याला तिचे ज्ञान होऊ शकते, हे ते सूत्र. यासाठी जसे शास्त्रीय प्रयोगांच्या आधारे त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज १८० अंश असते हे ज्ञान होते, त्याचा दृष्टांत त्याने दिला आहे. चैतन्याचे ज्ञान मिळवण्यासाठी शरीराच्या गुण आणि कर्मांचा म्हणजेच पर्यायाने गुणांचा अभ्यास आवश्यक असतो. या आणि आपल्या पूर्वसूरींनी यासंबंधी केलेल्या विवेचनाच्या आधारे ॲरिस्टॉटल त्याने मानलेल्या चैतन्याची व्याख्या सजीवांतील जीवशक्ती किंवा प्राणशक्ती अशी करतो.
- भाग २ (पुस्तक दुसरे) : दुसर्या भागामध्ये ॲरिस्टॉटलने केलेल्या चैतन्याच्या व्याख्येबरोबर त्याने स्वतः केलेल्या अभ्यासाद्वारे पोषण प्रक्रिया, पुनरुत्पादन प्रक्रिया या सजीवांतील सर्वमान्य कार्यांचा विचार विशद केला आहे. त्या बरोबरच सामान्य ऐन्द्रिय ज्ञानाचा ऊहापोहही या भागात केला असून त्या अनुषंगानेच त्याने पंचज्ञानेंद्रियांच्या जाणीवांबद्दलचे ‒ रूप, शब्द, गंध, रस आणि स्पर्श यांचे ‒ विवेचनही केलेले आहे.
ॲरिस्टॉटलने शास्त्रीय पद्धतीने चैतन्याच्या गुणांचे निश्चितीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी कोणत्याही वस्तूला तो द्रव्य, आकार आणि अवयव या तीन भागांमध्ये दर्शवतो. सोबतच तो हे दर्शवण्याचा प्रयत्न करतो की, चैतन्य हे निसर्गातील कोणत्याही सुसंघटित शरीरात सर्वप्रथम प्रत्यक्ष उत्पन्न तत्त्व आहे. तो असे विशद करतो की, चैतन्य ही जिवंतपणाची खूण असल्यामुळे आणि द्रव्य हे केवळ तिच्या अभिव्यक्तीचे साधन असल्यामुळे चैतन्य म्हणजे द्रव्य नाही. याच अनुषंगाने ते आकार आणि अवयवही नाही. या पुढील भागात ॲरिस्टॉटलने या चैतन्याच्या पोषण आणि जाणिवांच्या गुणांचा ऊहापोह केला आहे, तो पुढीलप्रमाणे :
सर्व सजीव, वनस्पती आणि प्राणी, स्वतःचे पोषण करतात आणि स्वतःसारख्या जीवांचे पुनरुत्पादन करतात. सर्व सजीवांमध्ये पोषण शक्तीबरोबरच, ऐन्द्रिय बुद्धी असते. या ऐन्द्रिय बुद्धीमुळे जीवांना किमान स्पर्शज्ञान होऊ शकते.
ॲरिस्टॉटलच्या मते, स्पर्शज्ञान इतर ऐन्द्रिय ज्ञानांमध्ये आधी अभिव्यक्त होते; कारण हे ज्ञान सुख आणि वेदना या सर्वाधिक सामान्य ज्ञानाच्या सर्व स्तरांतील जीवांमध्ये जाणवणार्या कसोट्या समजता येतात. जीवांना जेव्हा सुख आणि वेदनांची जाणीव होते, तेव्हाच त्यांच्यात इच्छा उत्पन्न होऊ शकते, असे त्याचे मत आहे. काही जीवांमध्ये स्पर्शाबरोबरच रूपज्ञान, शब्दज्ञान, गंधज्ञान आणि रसज्ञान आढळते, तर काही जीवांमध्ये सुख आणि वेदनांपेक्षा जटील जाणिवा विकसित झालेल्या दिसतात. म्हणून त्याने पुढे अधिक सूक्ष्म अंगाने या कार्यांसंबंधी विवेचन केले आहे. याच भागामध्ये काही जीवांमधील स्मृती, कल्पनाशक्ती आणि ऐच्छिक चलनवलन यांच्या विषयीही त्याने चर्चा केली आहे.
- भाग ३ (पुस्तक तिसरे) : तिसर्या भागामध्ये आधी दिलेल्या पाच ज्ञानेंद्रियांशिवाय इतर कोणतीही इंद्रिये नाहीत, याबद्दल ॲरिस्टॉटलने मत मांडले आहे. त्याचप्रमाणे इंद्रियांचे कार्य कसे होते, याबद्दल विवेचन केले असून विविध बुद्धिगम्य कार्यांचाही उहापोह त्याने केला आहे. त्याने कल्पनाशक्ती, विचारशक्ती आणि ज्ञान यांबद्दल भाष्य या भागात केले आहे. तसेच मन आणि मानसिक कार्यांबद्दल विचार मांडले आहेत. या भागामध्ये चैतन्याचे एक अंग म्हणून मनाची चर्चा करताना अॅरिस्टॉटलने मनाला मानवांचीच मक्तेदारी मानली आहे. तो विचारशक्तीला ऐन्द्रिय ज्ञान आणि कल्पनाशक्तीहून भिन्न मानतच नाही. त्याच्या मते, इंद्रिये असत्य सांगत नाहीत आणि कल्पनाशक्ती ही कोणतेही ऐन्द्रिय ज्ञान पुन्हा मनात उभे करू शकते. असे असले, तरीही विचारशक्ती मात्र नेहमीच सत्य प्रकटन करते असे नाही. मन हे इच्छेनुसार विचार करू शकत असल्यामुळे मनाचे दोन भाग मानले आहेत. एका भागात सगळ्या कल्पना असतात, ज्यांचा मनात विचार होऊ शकतो आणि दुसर्या भागात त्या कल्पना असतात, ज्याबाबत मन प्रत्यक्षात विचार करते आणि प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करते. यांना अनुक्रमे ‘शक्यता बुद्धी’ आणि ‘प्रातिनिधिक बुद्धी’ असे त्याने नाव दिले आहे. शक्यता बुद्धी त्रिकोण, झाड, मानव, लाल इ. अशा यच्चयावत कल्पनांचा साठा करते. विचार करताना प्रातिनिधिक बुद्धीमधून मन या कल्पना उचलते आणि त्याद्वारे विचार घडवते. प्रातिनिधिक बुद्धी हा भाग त्या संकल्पनांना स्पष्ट करतो आणि पुन्हा शक्यता बुद्धीत साठवून ठेवतो. कोणत्याही सिद्धांताची पहिली कल्पना शक्यता बुद्धीचा भाग असते त्यानंतर त्याची सिद्धता प्रातिनिधिक बुद्धीत विचारीकृत होऊन शक्यता बुद्धीत साठवली जाते. आवश्यकता असेल तेव्हा शक्यता बुद्धीमधून ती सिद्धता उध्दृत केली जाते. ॲरिस्टॉटलच्या मते, मनाचा प्रातिनिधिक बुद्धीचा भाग हे द्रव्यातीत, शरीराच्या बाहेरही अस्तित्वात असणारा आणि अमर आहे. या बाबतचे त्याचे सारे मुद्दे कमालीचे संक्षिप्त आहेत. त्यामुळे अत्यंत संदिग्धता येते. याच्या स्पष्टीकरणानुसार वेगवेगळे विचार-संप्रदाय निर्माण झाले आहेत.
या भागाच्या उपसंहारात्मक विभागात ॲरिस्टॉटलने त्याने मांडलेल्या चैतन्य संकल्पनेची व्याख्या आणि स्वरूप यांबद्दल विचार मांडले आहेत. त्या सोबतच सर्व इंद्रिये असलेल्या सजीवांची कार्ये आणि केवळ स्पर्शेंद्रियांसह असणार्या सजीवांची कार्ये यांविषयी चर्चा केली आहे. या भागातील शेवटच्या पाठात त्याने चैतन्यमय सजीवांसाठी कमीत कमी किती गोष्टी आवश्यक असतात, याचा उहापोह केला आहे.
भाषांतरे आणि टीका : डी ॲनिमाचे अरेबिक भाषांतर इशाक इब्न हुनय्न यांनी सर्वप्रथम ९ व्या शतकात केले. त्यानंतर या ग्रंथाच्या सिरियन भाषांतरावरून १० व्या शतकात इब्न झुरा यांनी याचे अरेबिक भाषांतर केले. १३ व्या शतकात या ग्रंथाचे पर्शियन भाषांतरही झाले होते. झेराहिया बेन शिएल्टेल हेन यांनी १३ व्या शतकात या ग्रंथाचे अरेबिकमधून हिब्रूमध्ये भाषांतर केले.
११ व्या शतकात एविसेन्ना यांनी डी ॲनिमावर टीका लिहिली. या टीकेचे लॅटिन भाषांतर मायकल स्कोटस यांनी केले.
प्रभाव : डी ॲनिमा हा ॲरिस्टॉटलच्या उल्लेखनीय ग्रंथांपैकी अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्यामधून त्याच्या संशोधनाची प्रक्रिया आणि तर्कशास्त्राचा वापर संकल्पनांच्या सिद्धतेसाठी कसा केला गेला आहे, हे चांगल्याप्रकारे समजते. त्याची चैतन्याची, त्याच्या मते आत्म्याची संकल्पना, मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये फार महत्त्वाची ठरली. शरीर, बुद्धी आणि विचारप्रक्रिया यांबाबतचे ॲरिस्टॉटलचे मत मानसशास्त्र आणि वैद्यकशास्त्र या विषयांत विशेष अभ्यासले गेले आहे. त्याचप्रमाणे येथे मांडण्यात आलेली द्रव्य संकल्पना भौतिकशास्त्रामध्ये विचारणीय ठरल्याचे दिसून येते.
पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी डी ॲनिमा आजही अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो.
संदर्भ :
- Hicks, R. D. Aristotles De Anima, Cambridge, 1907.
- Lewes, George Henry, Aristotle : A Chapter From The History of Science, Including Analyses of Aristotles Scientific Writings, New York, 1864.
- Montada, Joseph, Aristotle on Soul in Arabic Translation, 2012.
समीक्षक – मनिषा पोळ