अकादमी ही प्राचीन ग्रीसमधील ज्ञानदानाची संस्था होय. तिची स्थापना इ.स.पू.सु. ३८७ मध्ये प्लेटो या ग्रीक तत्त्वज्ञाने केली. त्या काळात अकादमी हे विद्याप्राप्तीचे माहेरघर होते व अनेक देशांतून तिथे ज्ञानपिपासू विद्यार्थी येऊन राहत होते, असे इतिहासात नमूद आहे.

अथेन्स : अकादमीकडे जाणारा ऐतिहासिक मार्ग.

प्लेटो (इ.स.पू. ४२७—३४८) हा ग्रीक तत्त्वज्ञांमधला अत्यंत महत्त्वाचा ‍तत्त्वज्ञ. त्याने आयुष्यात खूप प्रवास करून ज्ञानाची उच्च पातळी गाठली होती. त्याचे अनेक दौरे झाल्यानंतर वयाच्या चाळिसाव्या वर्षी त्याने अथेन्समध्ये वास्तव्य करायचे ठरवले. त्यासाठी त्याला एक शांत निवासस्थान हवे होते. अथेन्समधून ड्रोमोस नावाचा एक विस्तीर्ण रस्ता जात असे. त्याच्या दुतर्फा प्रचंड मोठी व उंच ऑलिव्हची झाडे होती. तो संपूर्ण परिसर अत्यंत शांत आणि रम्य होता. ग्रीक दैवतशास्त्रातल्या अकादमस ह्या वीरपुरुषाच्या स्मृतीकरिता ही जागा राखली होती. अनेक ग्रीक पुराणकथा ह्या जागेशी जोडल्या होत्या. ह्या जागेजवळच प्लेटोची वडिलोपार्जित जागादेखील होती. विद्यासाधना व ज्ञानदानाकरिता उत्कृष्ट अशी ही जागा बघून प्लेटोने येथेच विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. जसे प्लेटोचे विद्यार्थी वाढत गेले, तशी ही एक धार्मिक संस्था बनत गेली. अकादमसच्या नावावरून तिला अकादमी (किंवा अकॅडमी) असे नाव प्राप्त झाले. येथे तत्त्वज्ञान, गणितशास्त्र, सृष्टिशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांचे शिक्षण दिले जात असे.

अकादमीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच गेली. प्लेटोने आपल्या प्रगल्भ व्याख्यानांतून संपूर्ण ग्रीस देशातल्या तरुण मुलांना प्रेरित केले. अकादमीत अध्यापन सुरू झाल्यापासून प्लेटोने जी योजना तयार केली त्याचे निवेदन त्याच्या फ्रीड्रस ह्या ग्रंथात आहे. अकादमी ही काही प्रमाणात आधुनिक विद्यापीठाप्रमाणे होती. विद्यापीठाचे मूळ आपल्याला अकादमीत पाहायला मिळते. इतिहासात अथेन्सचे राजकीय वर्चस्व कमी झाल्यावरही अकादमीमुळेच त्याचे तत्त्वज्ञानातील वर्चस्व कायम राहिले. अकादमीचा प्रभाव कित्येक शतके अथेन्सवर व ग्रीक तत्त्वज्ञानावर टिकून राहिला. तेथील शिक्षणपद्धतीवरही त्याची छाप कायमची पडली.

ॲरिस्टॉटल (इ.स.पू. ३८४—३२२) या तत्त्वज्ञाने वयाच्या सतराव्या वर्षी प्लेटोच्या अकादमीत प्रवेश केला आणि तो प्लेटोसोबत पुढील वीस वर्षे, प्लेटोचा मृत्यू होईपर्यंत, राहिला. त्याच्या अद्भुत बुद्धिकौशल्यामुळे प्लेटो त्याला ‘अकादमीचा मेंदू’ (The Mind of the Academy) असे म्हणत असे. अशाप्रकारे अकादमीने अनेक विद्वान घडवले. प्लेटोच्या पश्चात त्याचा भाचा स्प्यूसिपस हा अकादमीचा अधिपती बनला. प्लेटोनंतर अकादमीच्या तत्त्वज्ञानात अनेक बदल झाले. अकादमीचा इतिहास खालील चार खंडांत विभागलेला आहे :

  • जुनी अकादमी (इ.स.पू. ३४७—२६४)
  • मधली अकादमी (इ.स.पू. २६४—१६०)
  • नवी अकादमी (इ.स.पू. १६०—१००)
  • शेवटची अकादमी (इ.स.पू. पहिले शतक—इ.स. ५२९)

अकादमीचे तत्त्वज्ञान : अकादमीच्या पहिल्या कालखंडात स्प्यूसिपस, झीनॉक्रिटस, पॉलेमो आणि क्रेटिस हे अकादमीचे ‘स्कॉलर्स’ अथवा पीठप्रमुख होऊन गेले. त्यांनी प्लेटोच्या तत्त्वज्ञानाचा विकास केला व अनेक विषयांत प्रगती केली. प्लेटोने जगाचे ऐहिक व पारलौकिक असे भेद केलेले व मानवांचे अबौद्धिक व बौद्धिक असे भेद केले होते. ‘आयडिया’ ह्या आदर्श असून त्या पारलौकिक असतात, आणि ज्या वस्तू ह्या जगात दिसतात, त्या केवळ मूळ ‘आयडियां’चे प्रतिबिंब असतात. प्लेटोचा हा सिद्धांत फारच आदर्शवादी होता. त्यामुळे अकादमीतल्या पुढच्या विद्वानांनी त्यात बदल केले. केवलतत्त्व, निःश्रेयस व ईश्वरीबुद्धी यांत प्लेटोने तादात्म्य मानले होते. स्प्यूसिपस (इ.स.पू. ४००—३३९) याने त्या संकल्पना वेगळ्या करून निःश्रेयस हे वस्तूचे अधिष्ठान नसून ध्येय आहे, असे म्हटले. त्याने ऐंद्रिय अनुभवावर व शास्त्रीय निरीक्षणावर भर दिला. त्याने ‘आयडिया’च्या ऐवजी संख्या घातल्या व त्यांना वस्तूपासून वेगळे केले.

अथेन्स : अकादमीची ऐतिहासिक जागा.

यानंतर झीनॉक्रिटस (इ.स.पू. ३९६—३१४) अकादमीचा प्रमुख झाला. त्याने तत्त्वज्ञानाची सत्ताशास्त्र, नीतिशास्त्र व भौतिकशास्त्र अशी निश्चित विभागणी केली. सर्व सृष्टीचा आधार एकता व द्वैत असून एकता म्हणजे पिता आणि अनेकता म्हणजे माता, असे त्याने प्रतिपादन केले. आयडिया किंवा संख्या हे त्यांचे अपत्य होय. विश्वात्मा स्वतःला गती देणारा आहे (Unmoved Mover) हेही त्याने मानले. क्रेटिस हा नीतिशास्त्रात अकादमीचा प्रतिनिधी होता, असे म्हणता येते.

नंतरच्या कालखंडांतही अकादमीच्या तत्त्वज्ञानात अनेक मूलभूत बदल झाले. आर्केसिलॉस (इ.स.पू. ३१६—२४१) ह्या पीठप्रमुखाने पिरोप्रणीत संशयवादाचा पुरस्कार केला आणि अकादमीच्या तत्त्वज्ञानाला एक नवे वळण मिळाले. संशयातीत सत्यज्ञानाचा अभाव असल्याने आपण कधीच ठाम निर्णय घेऊ शकत नाही, असे त्याने प्रतिपादिले. पुढील महत्त्वपूर्ण तत्त्वज्ञ कार्नीआडीझ (इ.स.पू. २१४—१२९) याने संशयवादाला संभवनीयता सिद्धांताची जोड दिली. आपल्याला जरी पूर्ण सत्याचे ज्ञान होत नसले, तरी दैनंदिन जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी संभवनीय स्वरूपाचे ज्ञान पुरेसे ठरते. ज्या विधानाविषयी अधिक सबळ पुरावा असतो, ते विधान अधिक संभवनीय असते. अशा विधानांवरच आपले दैनंदिन जीवन आधारलेले असते.

अकादमीच्या नवीन कालखंडात अकादमीतले तत्त्वज्ञान संशयवादाचा त्याग करून मतसंग्रहवादाकडे वळले आणि नंतर नव-प्लेटोमताकडे झुकले. मतसंग्रहवादामुळे प्लेटोच्या तत्त्वज्ञानासोबत अन्य पंथातले तत्त्वज्ञानही अभ्यासले जाऊ लागले. ॲरिस्टॉटलच्या ग्रंथावरही अभ्यास येथे सुरू झाला.

अकादमीचा शेवटचा पीठप्रमुख डामॅशियस याच्या कारकिर्दीत इ.स. ५२९ मध्ये जस्टिनियन या रोमन सम्राटाने अकादमीच्या देणग्या बंद करून अकादमी बंद पाडली. अन्य मतानुसार प्लेटोने सुरू केलेली अकादमी ही इ.स.पू. प्रथम शतकातच सुल्ला ह्या रोमन सम्राटाने नष्ट केली व पाचव्या शतकात काही नव-प्लेटोवाद्यांनी अकादमीची पुन्हा स्थापना केली. त्या काळातला अकादमीचा इतिहास धूसर असल्याने अशी मते उदयास आलेली दिसतात. काही लोकांचा असाही कयास आहे की, जस्टिनियनने अकादमी बंद पाडल्यावर ती पूर्णपणे नष्ट झाली नसावी. तिथल्या विद्वानांनी तुर्कस्तानामध्ये स्थलांतर करून आपली विद्या जपली असावी व इ.स. नवव्या शतकात बगदाद येथे प्लेटोवादाच्या टीका लिहिण्याची परंपरा सुरू केली असावी.

अथेन्समध्ये, जिथे प्लेटोची अकादमी अनेक शतके कार्यरत होती, ती जागा इ.स. विसाव्या शतकात पुनरुज्जीवित करण्यात आली. तिथे उत्खननदेखील झाले आहे. अनेक पर्यटक व अभ्यासक त्या ऐतिहासिक जागेला भेटी देत असतात.

संदर्भ :

  • जोशी, ग. ना. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा इतिहास, खंड पहिला, पुणे, १९७५.
  • वाडेकर, देविदास दत्तात्रय, मराठी तत्त्वज्ञान महाकोश, खंड पहिला, पुणे, १९७४.

                                                                                                                                                                     समीक्षक : हिमानी चौकर