महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध किल्ला. हा किल्ला पुणे-सोलापूर मार्गावरील यवत गावापासून  सु. १० किमी. अंतरावर असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची २३०० फूट आहे. कऱ्हे पठारावर असलेले माळशिरस हे गाव किल्ल्याजवळ वसलेले आहे. किल्ल्यात बाराव्या शतकात यादव राज्यकर्त्यांनी बांधलेले हेमाडपंती बांधणीचे भुलेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. त्यामुळे भुलेश्वर टेकाड किंवा यवतेश्वर डोंगर म्हणूनही हा किल्ला परिचित आहे. किल्ल्याच्या दक्षिणेस असलेल्या मंगळाई देवीच्या ठाण्यावरून या किल्ल्याला ‘दौलतमंगळʼ हे नाव पडले असावे.

दौलतमंगळ किल्ला, पुणे.

सासवड व यवतमधून गाडीमार्गाने किल्ल्यापर्यंत जाता येते. सांप्रत किल्ल्याचे मोजकेच अवशेष शिल्लक आहेत. किल्ल्याला तीन बुरूज असून पूर्वेकडील तटबंदीमध्ये एका दरवाजाचे अवशेष आहेत. किल्ल्यावर खडकात खोदलेली पाण्याची टाकी असून एक टाक्याचे बांधकाम ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर यांनी केले आहे. किल्ल्यावरील भुलेश्वर मंदिराचे बांधकाम बेसाल्ट खडकात केलेले आहे. पूर्वेकडील पायऱ्या चढताना उजव्या तसेच डाव्या बाजूला मूर्तीशिल्प आढळतात. समोरच मोठी घंटा असून त्या खाली कातळात कोरलेला कासव आहे. मंदिरावरील घुमट आणि त्यावर असलेले खांब लक्ष वेधून घेतात. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला गणेशप्रतिमा, तर डाव्या बाजूला विष्णूप्रतिमा कोरलेली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर समोरच एक भिंत आहे. तेथून दोन्ही बाजूला जाणाऱ्या पायऱ्या असून यावरून मंदिर दुमजली आहे, असा भास होतो. मंदिरात काळ्या पाषाणामुळे थंड वातावरण, तसेच अंधार जाणवतो. मंदिरात ६ फूट उंचीची महाकाय नंदीची एक मूर्ती पाहायला मिळते. मंदिराच्या भिंतींवरील नक्षीकाम, विविध शिल्प, कोरीव मूर्ती लक्ष वेधून घेतात. मंदिराची द्वारशाखा कोरीवकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात छोटी छोटी देवकोष्ठे (कोनाडे) असून त्यांत विठ्ठल रखुमाई, महादेव, गणेश आदी मूर्ती दिसतात. मंडपाच्या पायरीवर आणि जमिनीवर काही देवनागरी शिलालेख असून हे शिलालेख मंदिराच्या पुनर्बांधणीच्या काळातील असावेत, असे अभ्यासकांचे मत आहे. त्यांतील एक शिलालेख इ. स. १२८१ मधील आहे. या शिवाय किल्ल्याच्या एका बुरुजाखाली जानुबाई देवीचे मंदिर असून त्यावर शरभशिल्प दिसून येते.

बुरूज, दौलतमंगळ किल्ला, पुणे.

सोळाव्या शतकात शहाजीराजांचे सासरे लखुजी जाधव आणि त्यांच्या तीन पुत्रांची निजामशहाच्या दरबारात हत्या झाल्यावर शहाजीराजांनी निजामशाही सोडून स्वतंत्र राज्य स्थापण्याचा निर्णय घेतला. पुणे ही शहाजीराजांना वडिलोपार्जित मिळालेली जहागिरी होती. आदिलशहाच्या ताब्यात असलेल्या पुण्यावर शहाजीराजांनी स्वारी केली आणि पुणे व आजूबाजूचा प्रदेश ताब्यात घेतला. शहाजीराजांच्या हल्ल्यामुळे चिडलेल्या आदिलशहाने रायराव नावाच्या सरदाराला मोठी फौज घेऊन पुण्यावर पाठवले. रायरावाने पुण्यावर हल्ला केला, तेव्हा या रायरावाचे उच्चाटन शहाजीराजांनी केले. युद्धाच्या या धामधुमीत जिजाबाईंना शहाजीराजांनी सुरक्षित अशा शिवनेरी किल्ल्यावर पाठवले.

दरवाजाचे अवशेष, दौलतमंगळ किल्ला, पुणे.

मुरारजगदेव हे आदिलशहाच्या दरबारातील एक बडे सरदार होते. त्यांचे आणि शहाजीराजांचे चांगले संबंध होते. आदिलशहाच्या फौजांनी पुण्याची वाताहात केल्यावर मुरारजगदेव यांनी १६३४ मध्ये पुण्यापासून जवळ असलेल्या भुलेश्वर मंदिर टेकडीभोवती तटबंदी, बुरूज बांधून दौलतमंगळ किल्ल्याची उभारणी केल्याचे सहा कलमी शकावलीत म्हटले आहे. त्यानंतर पुणे प्रांताचा लष्करी आणि मुलकी कारभार दौलतमंगळ किल्ल्यावरून केला जात असे. पुढे मुरार जगदेवांची आदिलशहाने हत्या केली (१६३५). १६३६ मध्ये येथील हवालदार महमदशहा महमदअली असल्याचा उल्लेख एका पत्रात सापडतो. पुढे छ. शिवाजी महाराजांनी पुण्याच्या लाल महालातून कारभार सुरू केल्यावर या किल्ल्याचे महत्त्व संपले. किल्ल्यावरील भुलेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारास व तेथील लोकोपयोगी बांधकामे करण्यास ब्रह्मेंद्रस्वामींनी एक लाख रुपये खर्च केले. होळकरांनी सुद्धा या मंदिराच्या जिर्णोद्धारास आर्थिक मदत केली होती.

संदर्भ :

  • Kate, Gauri, Comprehensive study of Bhuleshwar temple dist. Pune, unpublished Ph. D. Thesis, 2017.
  • केळकर, न. चिं.; आपटे, द. वि. संपा., शिवकालीन पत्रसार संग्रह, खंड १ ते ३, पुणे, १९३०; १९३७.
  • पुरंदरे, कृ. वा. संपा., शिवचरित्र साहित्य खंड १, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९२६.
  • पारसनीस, द. ब. ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर चरित्र, पुणे, १९००.

समीक्षक : सचिन जोशी