रॉबर्ट एच्. व्हिटाकर (Robert Harding Whittaker) यांनी वर्गीकरण विज्ञानाची सुरुवात केलेल्या कॅरॉलस लिनियस (Carolus Linnaeus) यांच्या वर्गीकरणात सुसूत्रता आणण्यासाठी १९६९ मध्ये पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती रूढ केली. सजीव वर्गीकरणात ही पद्धत अधिक प्रचलित आहे. पंचसृष्टी वर्गीकरणात असलेल्या त्रुटींचा अभ्यास करून अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ कार्ल वूस (Carl Woese) आणि रसायनवैज्ञानिक जॉर्ज फॉक्स (George E. Fox) यांनी रायबोसोम जनुकावर व प्रथिनावर आधारलेली वर्गीकरण पद्धत पुढे आणली. याचे कारण म्हणजे त्यांना १९७० च्या सुमारास आढळलेले अत्यंत विषम स्थितीत सापडणारे जीवाणू. यांना त्यांनी ‘परम सीमा सजीव’ (Extremophiles) असे नाव दिले. कार्ल वूस आणि त्यांचे सहसंशोधक यांनी त्यांना सापडलेल्या नव्या जीवाणूंतील रायबोसोम्सचा अभ्यास केला.
आभासी केंद्रकी पेशीतील रायबोसोम तुलनेने कमी रेणूभार असलेले असतात. रायबोसोमच्या लहान भागातील आरएनए (RNA) हे केंद्रकाम्ल तयार करण्यासाठी लागणाऱ्या जनुकांचा त्यांनी विशेष अभ्यास केला. विविध जीवांतील अशा जनुकांची (16S ribosomal RNAgenes) तुलना केल्यास त्यांच्यामध्ये विविधता आहे, असे कार्ल वूस आणि जॉर्ज फॉक्स यांना आढळले. शरीर रचनेतील साम्यभेदांची तुलना करण्यापेक्षा हे अधिक खात्रीलायक आहे हे त्यांच्या लक्षात आले. जनुके ही अनुवंशिकतेने पुढील पिढ्यांना दिली जात असल्याने वंशेतिहास (Phylogeny) समजण्यासाठी ही तुलना उपयोगी ठरेल असे त्यांना वाटले. त्यांनी १९७७ च्या सुमारास जीवशास्त्रीय वर्गीकरण हे रायबोसोम्सच्या आरएनएतील साम्यभेदांवर आधारित असावे असे सुचवले. त्यातून त्यांना आढळलेल्या जीवाणूंपेक्षा पूर्ण भिन्न अशा नव्या जीवाणूंसाठी अधिक्षेत्र (Domain) निर्माण करण्याचा विचार त्यांनी मांडला. त्यानुसार पृथ्वीवरील जीवांची पुढील तीन अधिक्षेत्रांत विभागणी करण्यात येते — आदिजीवाणू (Archaea), जीवाणू (Eubacteria), दृश्यकेंद्रकी सजीव (Eukarya).
पंचसृष्टी वर्गीकरणामध्ये मोनेरा (Monera) सृष्टीमध्ये जीवाणूंचा समावेश केलेला होता. कार्ल वूस यांनी त्यांना मिळालेल्या नव्या पुराव्यांच्या आधारे जीवाणू म्हणजे मोनेरा सृष्टीऐवजी अधिक विस्तृत ‘अधिक्षेत्र’ (Domain) नावाचा सजीव गट बनवला. यातील पहिले अधिक्षेत्र आदिजीवाणू, दुसरे अधिक्षेत्र जीवाणू आणि तिसरे अधिक्षेत्र दृश्यकेंद्रकी सजीव हे होत.
त्यांच्या या नव्या ‘आदिजीवाणू’ अधिक्षेत्र निर्माण करण्याच्या वर्गीकरण संकल्पनेला साल्वादोर लुरीया (Salvador Edward Luria) आणि अर्न्स्ट मायर (Ernst Mayr) यांसारख्या प्रख्यात जीववैज्ञानिकांनी विरोध केला. आदिजीवाणूंबद्दल जशी अधिक माहिती होत गेली तसा हा विरोध मावळला. आदिजीवाणू आणि जीवाणू ही दोन वेगळी अधिक्षेत्रे हे आता सर्वमान्य झाले आहे.
आदिजीवाणू या नव्या अधिक्षेत्रात मोडणारे ‘आदि’जीव पृथ्वीवरील सध्या माहीत असलेले सर्वांत प्राचीन जीव आहेत. यातील अनेक आदिजीवाणू अतिअम्ल, अतिअल्कली, अतिउष्ण, अतिशीत तसेच अतिक्षारयुक्त अशा पर्यावरणात टिकून राहतात. प्रतिकूल परिस्थितीतही ते सक्रीय राहतात. त्यांची संख्यावाढ देखील होते.
आदिजीवाणूंच्या नव्या जगाची मानवाला जास्त माहिती होत जाईल त्यानुसार आधीच माहिती असलेल्या जीवांबद्दलचे ज्ञान विस्तारत जाईल. अतिप्रतिकूल परिस्थितीत आदिजीवाणू कसे तग धरतात, हे पूर्ण अभ्यासल्यावर अंतराळातील अन्य ग्रहांवर जीवसृष्टी कोणत्या प्रकारची असू शकेल ह्याचा अंदाज बांधणे आणि शोध घेणे सोपे जाईल.
सजीव वर्गीकरण ही एक जिवंत आणि गतिमान विद्याशाखा आहे. वैज्ञानिकांना नवनवीन जीव सापडतात. त्यांच्या रचनेचा आणि शरीर क्रियांचा अभ्यास केला जातो. पूर्वज्ञात गोष्टींशी नवे मुद्दे पडताळून पाहिले जातात. योग्य वाटल्यास आधीच्या गटांची पुनर्रचना केली जाते. ते गट रद्द किंवा विभाजित केले जाऊ शकतात आणि हे सारे गरज भासेल तेव्हा पुन्हा पुन्हा केले जाते. कार्ल वूस यांच्या ‘जीववृक्ष – Tree of life’ संकल्पनेतून उदयाला आलेल्या प्रकल्पाद्वारे जगभरच्या शेकडो शास्त्रज्ञांच्या मदतीने लक्षावधी जातींच्या सजीवांची माहिती गोळा केली गेली आहे आणि हे काम सतत पुढे नेले जात आहे.
आदिजीवाणूंसाठी अधिक्षेत्र निर्माण केले गेल्याने त्यांचे जीवजगतातील आगळे स्थान लक्षात येऊन जगभर त्यांच्या अभ्यासाला चालना मिळाली आहे.
पहा : जीवाणू पेशी, पंचसृष्टी वर्गीकरण, लवणजलरागी जीवाणू, सजीव वर्गीकरण.
संदर्भ :
- The Historic Paper: Woese, C.R., O. Kandler& M.L. Wheelis (1990). “Towards a natural system of organisms: Proposal for the domains Archaea, Bacteria, and Eucarya.” Proc. Natl. Acad. Sci. USA 87:4576-4579.
- https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2685559/
- https://www.calacademy.org/explore-science/discovering-the-tree-of-life
- https://www.pnas.org/content/87/12/4576.long
- https://en.wikipedia.org/wiki/Three-domain_system
समीक्षक : मोहन मद्वाण्णा