व्हॅटिकन विश्वपरिषद म्हणजे व्हॅटिकन सिटीत भरलेली कॅथलिक धर्मपरिषद. पहिली व्हॅटिकन परिषद १८६९-७० साली संपन्न झाली. आजपर्यंत व्हॅटिकन सिटीत दोनच धर्मपरिषदा आयोजित केल्या गेल्या; पण कॅथलिक विश्वात एकूण एकवीस धर्मपरिषदा भरलेल्या आहेत. पहिली धर्मपरिषद रोमन सम्राट कॉन्स्टंटाइन यांच्या नेतृत्वाखाली इ.स. ३२५ या वर्षी नायसिया या ठिकाणी भरलेली होती. तीत धर्मश्रद्धेची कलमे निश्चित करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. तीच श्रद्धा ‘नायसियन क्रीड’ म्हणून प्रत्येक रविवारी जगभरातील कॅथलिक चर्चमधून घोषित केली जाते.

ख्रिस्ती धर्मपरिषदांचा इतिहास विचारात घेता त्यांमध्ये पुढील प्रकार आढळतात : डायॉसिझन् (जिल्हावार), प्रादेशिक, राष्ट्रीय, पौर्वात्य व पाश्चिमात्य आणि वैश्चिक. जितकी परिषद अधिक व्यापक, तितका तिचा निर्णयही अधिक व्यापक प्रमाणात मान्य होत असे. काही वेळा परिषदांच्या निर्णयांना राजाची किंवा पोपची मान्यता मिळविण्याची आवश्यकता निर्माण होई. स्थानिक परिषदांमधील निर्णय मर्यादित क्षेत्रातच प्रमाणभूत राहत व नंतर ते बदलले जाण्याचीही शक्यता असे.

द्वितीय व्हॅटिकन परिषदेतील एक क्षण

विवेकवाद, संशयवाद तसेच धर्मप्रवृत्तीच्या विरोधात जाणाऱ्या काही उदारमतवादी विचारसरणी यांचा जोर वाढलेला असतानाच्या वातावरणात पहिली धर्मपरिषद भरली. परमेश्वरी साक्षात्कार, ईश्वराचे अस्तित्व, आत्म्याचे अमरत्व यांसारख्या ख्रिस्ती धर्माच्या मूलतत्त्वांनाच विरोधी वातावरणामुळे धक्का पोहोचण्याची शक्यता विचारात घेऊन या धर्मपरिषदेने त्याविरुद्ध आवाज उठविला. संपूर्ण चर्चचा आध्यात्मिक नेता आणि गुरू म्हणून पोप हे ख्रिस्ती धर्मश्रद्धेविषयी एखादा धर्मसिद्धांत जाहीर करतात, तेव्हा तो प्रमादरहितच असतो, असे प्रतिपादन या धर्मपरिषदेत करण्यात आले.

१९६०–७० हे दशक संपूर्ण जगात नवीन पर्व सुरू झाल्याची नांदी समजली जाते. सगळीकडे नवीन विचारांचे वारे वाहत होते. दुसऱ्या महायुद्धानंतर शांतीत जन्माला आलेली पिढी आता युद्धाला विरोध दर्शविणारी, स्वतंत्र विचार मांडणारी व ऐहिक सुखाची वारस म्हणून प्रतिपादन करणारी बनायला लागली होती. कॅथलिक चर्चचे पायस पोप बारावे यांच्या मृत्यूने रिकामी झालेल्या जागेवर नवीन विचाराचे पोप म्हणून उत्तर इटलीतील बेर्गामो या भागात जन्मलेले व रंगेल व्हेनिस येथील भागाचे प्रमुख कार्डिनल अँजेलो जूझेप्पे रॉन्कॉली यांची अनपेक्षित निवड झाली होती. त्यांनी पोप जॉन तेविसावे हे नाव धारण केले. अवघ्या नऊ महिन्यांत, म्हणजे २५ जानेवारी १९५९ या दिवशी पोप जॉन तेविसावे यांनी चर्चमध्ये व्हॅटिकनची दुसरी परिषद जाहीर केली. कोण्या विशिष्ट वादविवादाच्या मुद्द्याची दखल घेण्यासाठी नव्हे, कोण्या चुकीच्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी नव्हे, तर समोर ठाकलेल्या नव्या जगाच्या परिस्थितीशी सुसंगतपणे राहून जे जे काही उदात्त, सुंदर, मंगल व सत्य असेल त्यांची कास धरून चर्चची वाटचाल व्हावी; चर्चमधील आधीची संकुचित वृत्ती (Exclusivism) सोडून देऊन त्या ठिकाणी आधुनिकतेचे वारे वाहावेत आणि नवे चैतन्य संचारावे या हेतूने ही परिषद भरविण्याचा त्यांचा मनोदय होता.

दुसरी व्हॅटिकन विश्वपरिषद आणि पुनरुज्जीवनाचे वारे : चर्च कारभाराचे सर्वांगीण नूतनीकरण व्हावे म्हणून पोप जॉन तेविसावे यांनी ही परिषद भरविण्याची घोषणा केली आणि म्हणाले, ‘‘चला, आपण ख्रिस्तसभेची खिडकी उघडूया; जगातून थोडी ताजी हवा आत येऊ द्या!’’ सोबतच ‘पाचेम इन तेरीस’ (पृथ्वीवर शांती) या विश्व परिपत्रकात न जन्मलेल्या भ्रूणालाही जगण्याचा हक्क आहे, हेही त्यांनी जगाला ठणकावून सांगितले. ही परिषद १९६२ ते १९६५ या कालावधीत संपन्न झाली. या धर्मपरिषदेसाठी सुरुवातीला फक्त कॅथलिक धर्मपंडित व धर्माधिकारी उपस्थित असत. दुसऱ्या धर्मपरिषदेसाठी मात्र जगभरातून कॅथलिक बिशप्स, ईशज्ञानी, विविध ख्रिस्ती धर्मपंथी यांचे प्रतिनिधी (ईस्टर्न ऑर्थोडॉक्स, प्रॉटेस्टंट), यहुदी आणि निवडक तज्ज्ञ प्रापंचिक यांचा सहभाग होता.

जगाला त्या काळी करुणेचे बाळकडू पाजण्याची गरज होती. पोप जॉन तेविसावे यांनी त्यांचे विचार स्पष्ट करून सर्वतोपरी तयारी सुरू केली. अपूर्ण विषयांवर संपलेल्या पहिल्या व्हॅटिकन धर्मपरिषदेनंतर शंभर वर्षांनी, म्हणजे ११ ऑक्टोबर १९६२ रोजी उद्घाटनाप्रसंगी ‘गाऊदेते मातेर एक्सेलिया’ (ख्रिस्तसभा उल्हास कर) असा आनंदाचा संदेश जगाला देऊन व्हॅटिकन परिषदेला त्यांनी आशीर्वाद दिला. दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेचे पहिले सत्र १९ ऑक्टोबर १९६२ ते ८ डिसेंबर १९६२ या कालावधीत संपन्न झाले; पण दुसरे सत्र सुरू असतानाच जॉन पोप तेविसावे यांचे देहावसान झाले. त्यानंतर ती धुरा उत्तर इटलीतील ब्रेशिया येथे जन्मलेले पोप पॉल सहावे (मूळनाव जोव्हान्नी बाप्तिस्ता मॉन्तिनी) यांच्या खांद्यांवर आली. त्यांनी परिषदेचा दुसरा टप्पा ४ डिसेंबर १९६३ रोजी यशस्वी पूर्ण केला. या टप्प्यात पोप पॉल सहावे यांनी सुसंवादाने प्रचलित जगात सामील होऊन जगाला आतून श्रद्धेचे व नीतिमत्तेचे नेतृत्व देण्यावर भर दिला. तिसऱ्या व चौथ्या टप्प्याच्या मध्ये त्यांनी मुंबईला चार दिवसांची भेट दिली व प्रामुख्याने सर्वधर्मीय नेत्यांबरोबर जिव्हाळ्याचा संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘भारतदेश प्राचीन संस्कृतीची, सर्व जागतिक धर्मांची, परमसत्य चिकाटीने शोधणाऱ्यांची, चिंतन-मौन धारण करणाऱ्यांची आणि गीतांनी परमेश्वराचा गौरव करणाऱ्यांची पवित्र भूमी आहे’’. बृहदारण्यक उपनिषदातील ‘ओम असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योर्मामुतं गमय।।’ (बृ.१,३,२८) ही प्रार्थना त्यांनी स्वत:ची प्रार्थना म्हणून सर्वांपुढे म्हटली आणि आजच्या काळाला ही प्रार्थना तंतोतंत समर्पक असल्याचे त्यांनी जाहीर केले. प्रत्येक अंत:करणात या प्रार्थनेचे निनाद उठले पाहिजेत, असे ते म्हणाले. मानवाच्या इतिहासात बदल होऊन मानवजात जीवनाची मार्गदर्शक तत्त्वे शोधत आहे. फक्त प्रसार-माध्यमांच्या साधनांनीच आपण आज एकमेकांच्या जवळ यावे असे नव्हे (छापून येणाऱ्या बातम्या, रेडिओ, जहाज आणि जेट विमाने यांनी). आज आपण अंत:करणांनी एकमेकांशी जोडलेले, परस्परसंबंधांनी एकमेकांना समजून घेणारे, आदरभावना व प्रीती यांनी गुंफलेले असे एकत्र असणे जगाच्या भवितव्याला उचित ठरेल. पर्यटक म्हणून नव्हे, परंतु अंतिम सत्याकडे एकत्र चालणारे तीर्थयात्री म्हणून, दगडाच्या इमारतीत नव्हे, एकमेकांच्या अंत:करणात विसावा घेणारे आपण असलो पाहिजे, माणूस माणसाला भेटणारे, देश देशाला आलिंगन देणारे, बंधू-भगिनींच्या नात्याने, एका परमेश्वराची लेकरे म्हणून एकत्र येणे अगत्याचे आहे’’.

अशा खुल्या विचारांना धरून चर्चची उपासना, चर्चचे कार्य, चर्चमधील पोपमहोदयांपासून बिशप्स, फादर्स, व्रतस्थ स्वत:ला बांधून घेतलेले व समस्त ख्रिस्ती भाविक यांनी कसे जगावे, दुभंगलेल्या ख्रिस्ती पंथाचे ऐक्य, आंतरधर्मीय सुसंवाद, धर्मस्वातंत्र्य, मांगल्याचे जीवन जगण्याचे पाचारण, प्रसार-माध्यमे इत्यादी विषयांबाबत १६ दस्तऐवज हे दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेचे फळ म्हणावे लागेल.

‘चर्चची स्वत:विषयी ओळख’ व ‘आधुनिक जगातील वास्तव जगणारे चर्च’ हे दोन दस्तावेज प्रामुख्याने अमलात आणण्याची शिफारस फार महत्त्वाची मानली जाते. जगात शांती प्रस्थापित करण्यासाठी चर्चने घ्यावयाची जबाबदारी जगात ख्रिस्ती असण्याला एक नवीन कलाटणी देते.

शेवटचे सत्र १४ सप्टेंबर १९६५ रोजी संपन्न झाले.

कॅथलिक चर्चपासून विभक्त झालेल्या पंथांमधून दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेसाठी उपस्थित असलेले निरीक्षक आणि पाहुणे हे चित्र खूप लक्षणीय व आल्हाददायक दिसत होते. परिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी बहुधर्मीय उपस्थिती खूपच आशादायक वाटली. जशा घराच्या बंद खिडक्या-दारे उघडून कोंडलेले चर्च मोकळ्या हवेचा आस्वाद घेणारे, रंजल्या-गांजल्याची आठवण सतत पुढे ठेवून निर्णय घेणारे आणि जगात बंधूभाव व विश्वशांतीच्या मूळाला धरून कशी राहील या दृष्टिकोणातून दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेचा संपूर्ण विषय हाताळला गेला, हे या २१ व्या परिषदेचे वैशिष्ट्य मानावे लागेल. अधिकारशाहीने चालणारे चर्च आता जगातील सर्व कॅथलिक भाविकांना सोबत घेऊन एकत्र ‘पदक्रमण’ करण्यासाठी सज्ज झाले आहे.

दुसरी व्हॅटिकन परिषद ‘थक्क करणाऱ्या आशावादाने’ ओतप्रत भरली होती. आधुनिक जगातल्या घडामोडीचे विश्लेषण अद्याप बारकाईने व्हायला पाहिजे, असे टीकात्मक उद्गार काही अभ्यासक काढतात. त्यांपैकी ‘पोप सोळावे बेनेडिक्ट’ हे नाव धारण करणारे कार्डिनल राटझिंगर आहेत. त्यांनी एक ‘अधिकारवाणीने बोलणारा कुशल अभ्यासक’ म्हणून संपूर्ण दुसऱ्या व्हॅटिकनच्या तयारीत व पार पडणाऱ्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला होता.

दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेमध्ये संपर्काची भाषा सुरुवातीला लॅटिन होती; परंतु जगातून आलेल्या २,५०० बिशपांमध्ये लॅटिनचे अज्ञान खूप दिसून आले. म्हणून आधुनिक व स्थानिक भाषांमध्ये आपले विचार व्यक्त करण्याची मुभा दिली गेली व प्रथमत:च ‘भाषांतराची यंत्रे’ चर्चने वापरात आणली. त्यामुळे आता कॅथलिक स्त्री-पुरुष, तरुण-तरुणी, मुलगा-मुलगी उपासनेच्या वेळी पवित्र बायबलमधून वाचनपाठ घोषित करू शकतात. समेटाच्या दृष्टीने चर्चच्या विविध पंथियांमध्ये ऐक्य साधण्यासाठी पावले उचलली गेली. चर्च प्रवाहातून विलग झालेल्या विविध पंथियांना सन्मानाने आमंत्रित करून ख्रिस्ती ऐक्याकडे वाटचाल सुरू झाली. शतकांनुशतके ‘यूरोपियन केंद्रित चर्च’ खऱ्या अर्थाने ‘जागतिक चर्च’ बनले. कॅथलिक चर्चमधील सुधारणावादी विचाराला चालना देणारी ही परिषद ठरली. आज पोप फ्रान्सिस यांसारखे धडाडीचे निर्णय घेणारे या दुसऱ्या व्हॅटिकन विश्वपरिषदेचे पुरस्कर्ते ठरतात.

ख्रिस्ती धर्माची शिकवणूक आधुनिक मानवाशी संबद्ध करावी, ही भूमिका दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेत मांडली गेली. चर्चच्या नूतनीकरणाचा, आधुनिकीकरणाचा, व संस्कृतीकरणाचा हा विचार होता. त्याचबरोबर सर्व धर्मांविषयी औदार्याची भावना ठेवून त्यांच्याबरोबरही सुसंवाद साधण्याचा मार्ग मोकळा केला. सगळ्या धर्मात जे जे चांगले आहे, त्यांचा आदर करण्याचा संदेशही दुसऱ्या विश्वपरिषदेने दिला.

संदर्भ :

  • Flanery, Austin, Vatican Council II, Vols. 1 & 2, Mumbai, 2014.
  • Joseph, Teresa; Tixeria, Banzelao, Two Popes who knew How To Pope, Mumbai, 2014.
  • Paul, Pope John II, Redemption Missio, Kochi, 1999.
  • Piarini, Franco, Catechism of Vatican II, Dublin, 1967.
  • Sarah, Robert Cardinal, God or Nothing, San Francisco, 2015.
  • Tornielli, Andrea, Francis : Pope of a New World, Colifornia, 2013.

समीक्षक : फ्रान्सिस कोरिया