(ऑर्थ्रोपोडा). अपृष्ठवंशी प्राण्यांचा एक संघ. या संघातील प्राण्यांच्या पायांना सांधे अथवा संधी असतात, म्हणून या संघाला संधिपाद संघ म्हणतात. या प्राण्यांना सामान्यपणे पायांच्या अथवा पादांच्या अनेक जोड्या असून प्रत्येक पाय अनेक सांध्यांनी बनलेला असतो. प्राणिसृष्टीतील हा सर्वांत जास्त जाती असलेला संघ असून जगातील एकूण प्राण्यांपैकी सु. ८०% प्राणी या संघातील आहेत. या संघातील माहीत असलेल्या जातींची संख्या सु. १० लाखांपेक्षाही जास्त आहे. त्यांच्या आकारमानात विविधता दिसून येते; काही सूक्ष्म, तर काही मोठे असतात. वेगवेगळ्या परिस्थितीत राहण्यासाठी त्यांचे अनुकूलन झालेले असते. त्यांपैकी काही भूचर, काही जलचर असून काही गोड्या, मचूळ किंवा खाऱ्या पाण्यात राहतात. या संघातील अनेक प्राणी मातीत राहतात, तर काही परजीवी आहेत.
शरीररचना : संधिपाद प्राण्यांचे शरीर खंडांनी बनलेले असते. शरीर त्रिस्तरीय असून ते द्विपार्श्वसममित असते. शरीरावर त्वचेचे आवरण असते. त्वचेचे उपत्वचा, अध:त्वचा आणि आधारकला असे तीन स्तर असून ती कायटिन, स्क्लेरोटिन व क्युटिक्युलिन या पदार्थांपासून बनलेले असतात. या तीन पदार्थांमुळे संधिपाद प्राण्यांच्या त्वचेमध्ये दृढता आणि प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण होते. उपत्वचा कठीण असून तिच्यापासून कंकाल अथवा बाह्य सांगाडा बनलेला असतो. कंकालामुळे शरीराचे रक्षण होते, शरीरातील सर्व स्नायू त्याला जुळलेले असतात. त्वचेवर वरच्या बाजूस मेणाचा पातळ थर असतो. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होत नाही. कंकालाचे ठराविक काळाने निर्मोचन होते. या क्रियेला ‘कात टाकणे’ म्हणतात. संधिपाद ज्या परिस्थितीत राहतात त्यानुसार ते हालचाल करतात; पाण्यात राहणारे पोहतात, तर जमिनीवर राहणारे पायांनी चालतात. पोहणे किंवा चालणे यासाठी त्यांची उपांगे अनुकूलित झालेली असतात. बऱ्याच कीटकांना पंख असल्यामुळे ते उडू शकतात, पाय असल्यामुळे चालू शकतात.
शरीराचे साधारणपणे शीर्ष (डोके), वक्ष (छाती) आणि उदर (पोट) असे तीन भाग असतात. अनेक प्राण्यांमध्ये शीर्ष आणि वक्ष एकत्र आल्यामुळे ‘शीर्षवक्ष’ झालेले असते. त्यांच्यात देहगुहा लहान असून तिची जागा रक्तगुहेने घेतलेली असते. रक्तगुहेत रक्तद्रव भरलेला असतो, त्यांत ऊती आणि इंद्रिये डुंबत असतात. रक्तगुहा अभिसरण संस्थेशी जोडलेली असते. अभिसरण संस्थेत हृदय, महाधमनी आणि अनेक गुहिका अथवा कोटरे असतात. हृदय पृष्ठीय असून कप्प्यांनी बनलेले असते. अभिसरण संस्थेत शिरा नसतात. त्याऐवजी उघड्या गुहिका असतात आणि त्या रक्तगुहिकेशी जोडलेल्या असतात. अशा अभिसरण संस्थेला ‘विवृत (खुले)’ अभिसरण संस्था म्हणतात.
पचनसंस्था : पचनसंस्थेत अन्ननलिका आणि पचनग्रंथी असतात. कीटकांमध्ये मुखापाशी मुखांगे असतात आणि ती आहारानुसार विविध प्रकारची असतात. अन्नपदार्थांचे तुकडे करणे, चावणे, द्रव चाटणे यांसाठी ती उपयोगी असतात.
श्रवणसंस्था : पुष्कळ संधिपादांमध्ये रक्त श्वसनक्रियेचे कार्य करत नाही. कारण त्यांच्या रक्तात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड वाहून नेण्यासाठी श्वसनरंजक नसतो. मात्र कवचधारी संधिपाद आणि काही जलचर कीटकांमध्ये श्वसनक्रियेत रक्त भाग घेते. त्यांच्या रक्तामध्ये हीमोग्लोबिन अथवा हीमोसायनिन श्वसनरंजक रक्तात विरघळलेली असतात. संधिपाद प्राण्यांत कल्ले, त्वचा, श्वासनलिका, पुस्तक–फुप्फुसे (बुकलंग) यांद्वारे त्यांच्यात श्वसन होते.
उत्सर्जनसंस्था : उत्सर्जनासाठी विशिष्ट उत्सर्जक इंद्रिये असतात; शृंगिक ग्रंथी, जंभिका ग्रंथी, कक्ष ग्रंथी, हरित ग्रंथी, मालपीगी नलिका या इंद्रियांद्वारे उत्सर्जन होते. अनेक संधिपादांमध्ये निर्मोचन क्रियेत उत्सर्जिते बाहेर टाकली जातात.
प्रजननसंस्था : संधिपाद प्राण्यांमध्ये नर आणि मादी वेगवेगळे असतात आणि बाह्य लक्षणांवरून नर किंवा मादी ओळखता येतात. त्यांच्यात प्रजनन लैंगिक असून बहुतेक संधिपाद अंडी घालतात. काही थोडे संधिपाद पिलांना जन्म देतात. अनेक प्राण्यांत अंड्यातून बाहेर पडणाऱ्या पिलांचे प्रौढ प्राण्याशी अनेक बाबतीत साम्य असते. अनेक कीटकात अंडे, डिंभ, कोश आणि नवीन कीटक असे जीवनचक्र असते. त्यांच्या जीवनचक्रात अर्धरूपांतरण अथवा पूर्णरूपांतरण असते. लैंगिक प्रजनन असले, तरी काही संधिपादांमध्ये अनिषेकजनन घडून येते.
चेतासंस्था : संधिपादांच्या चेतासंस्थेत गुच्छिका अथवा गंडिका असतात. त्यांच्यांत ज्ञानेंद्रियांची विविधता दिसून येते. अशी विविधता अपृष्ठवंशी प्राण्यांच्या इतर कोणत्याही संघात दिसून येत नाही. त्यांच्यात साधे नेत्र अथवा अक्षिका, संयुक्त नेत्र, संतुलन पुटी, स्पर्शेंद्रिये, घ्राणेंद्रिये, रसायनग्राही इंद्रिये अशी ज्ञानेंद्रिये असतात. त्यांद्वारे संधिपाद परिस्थितीनुसार प्रतिसाद देतात.
उपयुक्तता आणि उपद्रव : संधिपादांचे आर्थिक आणि व्यावहारिक महत्त्व फार आहे. झिंगे, खेकडे, कोळंबी, शेवंड, चिंगाटी इत्यादी संधिपाद खाल्ले जातात. स्क्विलासारखे प्राणी खतासाठी वापरतात. कीटकांमुळे फुलांमध्ये परागण घडून येते. मधमाश्यांपासून मध आणि मेण मिळते. रेशीम कीटकांपासून रेशीम मिळते, तर लाख कीटकांपासून लाख मिळते. संधिपाद प्राण्यांतील अनेक कीटक अपायकारक आणि उपद्रवीही असतात. ते अन्नधान्याचा आणि अन्नपदार्थांचा नाश करतात, त्यामुळे दरवर्षी कोट्यावधी रुपयांचे नुकसान होते. संधिपाद प्राणी अनेक रोगांचे वाहक आहेत. सायक्लॉप्स या कवचधारी संधिपादाच्या शरीरात नारूचे डिंभ असतात. पिण्याच्या पाण्यातून सायक्लॉप्स माणसाच्या पचनसंस्थेत जातो व नारू रोग होतो. हिवताप, हत्तीरोग, जपानी मस्तिष्क ज्वर, चिकुनगुन्या, हाडमोड्या या रोगांसाठी डास कारणीभूत असतात. गोचिडे माणसांमध्ये तसेच जनावरांमध्ये त्वचारोग उत्पन्न करतात. कोळी, विंचू, गोम, मधमाशी यांचा डंख विषारी असतो. घरमाश्यांमुळे विषमज्वर, आमांश, पटकी, क्षय, काळपुळी असे रोग माणसाला होतात. काही कीटक अपायकारक कीटकांना खातात, त्यांची संख्या कमी होते आणि त्यांच्या उपद्रवाला आळा बसतो.
वर्गीकरण : संधिपाद संघाच्या वर्गीकरणाबाबत वैज्ञानिकात मतमतांतरे आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या संधिपाद प्राण्यांच्या शरीराचे भाग, पायांची संख्या, श्वसन इंद्रिय यांनुसार चार उपसंघ मानले जातात; क्रस्टेशिया (कवचधारी), मीरिॲपोडा (अयुतपाद), हेक्झॅपोडा (षट्पाद) आणि कलिसराटा. या चार उपसंघातील मुख्य वर्ग अनुक्रमे क्रस्टेशिया, मीरिॲपोडा, इन्सेक्टा आणि अरॅक्निडा हे आहेत. हेक्झॅपोडा उपसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना चालण्यासाठी सहा उपांगे (पाय) असतात. कलिसराटा उपसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या शरीराच्या पुढच्या उपांगाची जोडी चिमट्यासारखी असते. पुढे संधिपाद प्राण्यांच्या चार मुख्य वर्गांसंबंधी माहिती दिलेली आहे.
क्रस्टेशिया (कवचधारी) : या वर्गातील प्राणी प्रामुख्याने जलचर असून ते खाऱ्या तसेच गोड्या पाण्यात राहतात. शीर्ष आणि वक्ष यांच्या एकत्रिकरणाने शीर्षवक्ष तयार झालेले असते. शीर्षवक्षाच्या वरच्या पृष्ठावर पृष्ठवर्म असते, बाह्यकंकाल कायटिनमय असून कॅल्शियम कार्बोनेटमुळे जास्त कठीण असते. त्याला कवच म्हणतात, म्हणून या वर्गाचे नाव कवचधारी आहे. शीर्षावर शृंगिकांच्या दोन जोड्या, जंभांची एक जोडी, जंभिकांच्या दोन जोड्या असतात. प्रत्येक खंडावर पायांची एक जोडी असून काही उपांगे द्विशाखी असतात. रक्तगुहा असते. उदा., झिंगे, खेकडे, बार्नेकल, शेवंड, सायक्लॉप्स, एपस, ब्रँक्रिप्स डॅफ्निया, चिंगाटी (कोळंबी), सॅक्युलायना (परजीवी), लेपस (शिंपाकळी), पाणपिसवा इत्यादी.
मीरिॲपोडा (अयुतपाद) : यांतील प्राण्यांना पायांच्या अनेक जोड्या असतात, त्यामुळे त्यांना अयुतपाद म्हणतात. हे प्राणी भूचर असून त्यांचे शरीर लांब, नलिकाकार आणि खंडयुक्त असते. शीर्ष स्पष्ट असून त्यावर लांब शृंगिका, जंभ आणि जंभिका यांची एकेक जोडी असते. शरीराच्या खंडांवर पायांच्या दोन जोड्या अथवा एक जोडी असते. काही प्राण्यांच्या पायांच्या पहिल्या जोडीच्या टोकावर तीक्ष्ण नख्या असून त्यांना विषग्रंथीही जोडलेल्या असतात. उदा., सहस्रपाद अथवा पैसा प्राणी अथवा वाणी (मिलिपिड), गोम (सेंटिपिड) इत्यादी.
इन्सेक्टा (कीटक) : कीटकांच्या ५० ते ६० लाख जाती असाव्यात, असा अंदाज आहे आणि त्यांपैकी ७ ते ८ लाख जातींचा अभ्यास झाला आहे. कीटक सामान्यपणे जमिनीवर राहणारे असून काही जाती गोड्या अथवा खाऱ्या पाण्यात राहतात. प्रौढ कीटकांच्या शरीराचे शीर्ष, वक्ष आणि उदर असे तीन ठळक भाग असतात. शीर्षावर शृंगिका आणि जंभ यांची एकेक जोडी, तर जंभिकांच्या दोन जोड्या असतात. वक्षावर पायांच्या तीन जोड्या म्हणजे सहा पाय असतात, म्हणून कीटकांना षट्पाद असेही म्हणतात. काही कीटकांना पंखांच्या एक अथवा दोन जोड्या असतात. उदरावर उपांगे नसतात. शीर्ष ६ एकत्रित खंडांचे, वक्ष ३ खंडांचे आणि उदर ११ खंडांचे बनलेले असते. त्यांचे नर आणि मादी बाह्य लक्षणांवरून ओळखता येतात. फलन मादीच्या शरीरात होते. अनेक कीटकांमध्ये रूपांतरण असते. उदा., झुरळे, रातकीडा, उवा, नाकतोडा (चतुर), तुडतुडा, टोळ, घरमाशी, मधमाशी, रेशीमकीटक, काजवा, कसर, खंडोबाचा किडा, वाळवी, डास, त्सेत्से माशी, गांधील माशी, मुंग्या, बोंडकीटक, यष्टीकीटक, लाख कीटक, मिजमाशी, फळमाशी, पिसू, पतंग, पाणविंचू, ढेकूण इत्यादी.
अरॅक्निडा (अष्टपाद) : या वर्गातील प्राणी मुख्यत: भूचर असून काही जलचर आहेत. शरीर खंडयुक्त असून शरीराचे शिरोवक्ष आणि उदर असे दोन भाग असतात. शिरोवक्षावर नखरिकांची एक जोडी, स्पर्शपादांची एक जोडी आणि पायांच्या चार जोड्या म्हणजे आठ पाय असतात. म्हणून या वर्गाला अष्टपाद म्हणतात. शृंगिका आणि पंख नसतात. उदरावर पाय नसतात. श्वसनासाठी कल्ले, श्वासनाल अथवा पुस्तक–फुप्फुसे असतात. मिलनापूर्वी प्रणयाराधन घडते. उदा., विंचू, कोळी, गोचिड, राजकर्कट अथवा राजखेकडा (लिम्युलस). राजकर्कटात सु. ४५ कोटी वर्षांमध्ये कोणतेही बदल झालेले नसल्यामुळे त्याला ‘जिवंत जीवाश्म’ म्हणतात.
संधिपाद संघाशी नाते असलेला एक संघ म्हणजे ऑनिकोफोरो. पूर्वी हा संघ एक वर्ग म्हणून संधिपाद प्राण्यांमध्ये समावेश होत असे. या संघात पेरिपॅटस ही एकच प्रजाती असून या प्रजातीत सु. ७० जाती आहेत. या प्रजातीतील एका प्राण्याचे शास्त्रीय नाव पेरिपॅटस केपेन्सिस आहे. हे प्राणी वेस्ट इंडिज, पश्चिम मेक्सिको, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका, चिली, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, ऑस्ट्रेलिया आणि भारत असे विखुरलेले आढळतात. भारतात ते ईशान्य भागांत विशेषकरून आसाममध्ये आढळतात. पेरिपॅटस या प्राण्यात वलयांकित संघाची आणि संधिपाद संघाची लक्षणे दिसून येतात. त्याच्यात वलयांकित संघाची क्युटिक्युलयुक्त त्वचा, संधी नसलेले पाय, साधे डोळे, खंडीय वृक्कके, साधी अन्ननलिका इ. लक्षणे असतात, तर संधिपाद संघाची रक्तगुहा, पृष्ठीय हृदय, श्वासनलिका, प्रजनन इंद्रियांची रचना इत्यादी लक्षणे असतात. याखेरीज या संघाची स्वत:ची अशी काही लक्षणे दिसून येतात. ती म्हणजे आढळ विखुरलेला असणे, शीर्ष अस्पष्ट असणे, डोळे, मुखअंकुर तसेच प्रस्पर्शिका जोडीने असणे, मुख अधर बाजूच्या मध्यावर असणे आणि मुखाभोवती कायटिनचे जबडे असणे, पाय लहान खुंटीसारखे असणे, देहगुहा अत्यंत लहान असणे इत्यादी. पेरिपॅटस केपेन्सिस हा प्राणी वलयांकित संघ आणि संधिपाद संघ यांना ‘जोडणारा दुवा’ आहे. पेरिपॅटस केपेन्सिस मध्ये सु. ५० लाख वर्षांत कोणतेही बदल झालेले नाहीत, म्हणून त्याला ‘जिवंत जीवाश्म’ म्हणतात.
संधिपाद संघासारखे गुणधर्म असणाऱ्या काही प्राण्यांचा समावेश टार्डीग्राडा या वेगळ्या संघात करतात. हे प्राणी जलचर, अष्टपाद आणि सूक्ष्म असून अस्वलासारखे दिसतात. त्यांच्या सु. १,१५० जाती असून त्या आर्द्र हरिता (मॉस), सपुष्प वनस्पती, वाळू, गोडे पाणी, समुद्र अशा वातावरणात राहतात. त्यांच्या काही जाती पर्यावरणाच्या आंत्यतिक परिस्थितीतही राहू शकतात.