अपोलो हा ग्रीक देवतांपैकी महत्त्वाचा आणि प्रसिद्ध देव मानला जातो. तो झ्यूस आणि लेटो यांचा डीलोस येथे जन्माला आलेला पुत्र होय. झ्यूसच्या पत्नीचा संशयी, मत्सरी आणि संतापी स्वभाव माहीत असल्याने त्याचे अपत्य पोटात असताना लेटोला आश्रय देण्यास कोणतीही भूमी तयार नव्हती. शेवटी तिला ओर्टिजिया नावाच्या प्रवाही बेटावर आश्रय मिळाला. त्याच बेटाला पुढे डेलोस असे नाव मिळाले.
आर्टेमिस या अपोलोच्या बहिणीच्या जन्मानंतर ते बेट स्थिर झाले. आर्टेमिस ही स्त्री शिकारी देवी त्याची जुळी बहीण आहे. तिनेच स्वतःचा जन्म झाल्यानंतर लेटोला अपोलोला जन्म देण्यासाठी मदत केली.
अपोलोचे पोषण अमृतावर झाले आणि जन्म झाल्यानंतर लगेचच तो वाढू लागला व बाल्यावस्थेतून यौवनावस्थेला प्राप्त झाला. त्यानंतर त्याने आपल्या मातेला त्रास देणार्या पायथॉनला डेल्फी येथे ठार मारले. या कामामध्ये हेपेस्टस या धातुशास्त्रामध्ये प्रवीण असलेल्या देवाने त्याला शस्त्रे पुरविली. अपोलो आणि पायथॉन यांच्यातील या नाट्यमय संघर्षाचे स्मरण पुढील काळात ‘सेप्टेरिआ’ हा उत्सव साजरा करून जागविले जाई. या युद्धानंतर झ्यूसने अपोलोला शुद्धीकरणासाठी पाठविले. जिथून परतल्यावर त्याने डेल्फीमधील प्रार्थनास्थळावर जम बसविला.
ग्रीक पुराकथाशास्त्रात डेल्फी येथील अपोलोशी संबंधित भविष्यसूचनाचा अनेकदा उल्लेख येतो. डेल्फी येथील अपोलो, सर्वतोपरी साहाय्यकर्ता असून, तो देवता आणि मानव यांच्यातील दुवा मानला गेला आहे. अगदी स्वजनांच्या रुधिराने कलंकित झालेल्यांनादेखील तो पावन करतो.
इतर ग्रीक देवांप्रमाणॆ याचेही अनेक स्त्रियांवर प्रेम होते. त्या सर्व स्त्रिया काही राजी नव्हत्या. त्यांपैकी डॅफने ही अप्सरा, कोरोनिस, प्रिअम राजाची कन्या कॅसेण्ड्रा तसेच क्रीनी नावाची आणखी एक अप्सरा या महत्त्वाच्या आहेत. त्यांच्यापासून अपोलोला अपत्यप्राप्तीही झाली.
कोरोनिसपासून झालेला ॲस्क्लेपिअस नावाचा पुत्र पुढे वैद्यक विद्येचा अधिष्ठाता दैवत मानला गेला, तर क्रीनी या अप्सरेपासून अपोलोला झालेला ॲरिस्टेअस हा पुत्र पशू आणि शेतीबरोबरच विशेषकरून मधुमक्षिकापालनाचा रक्षक समजला जातो.
अपोलो हा काव्य, संगीत, धनुर्विद्या, ज्योतिषविद्या आणि औषधविद्या या शास्त्रांशी संबंधित आहे. तसेच हा देव पशू तसेच शेती यांच्या सुरक्षेची काळजी वाहतो. काही विद्वानांच्या मते अपोलो हे हेलिओस या सूर्यदेवाचे रूप असून, उत्तर ग्रीकमधील पशुपालक देवतेशी त्याचे एकीकरण झाले असावे. डॉल्फीन मासा आणि कावळा हे त्याच्याशी संलग्न केले आहेत. तसेच लॉरेल हा वृक्ष त्याचे प्रतीक मानला जातो.
सौंदर्याचे प्रतीक मानला गेलेला अपोलो हा ग्रीक देव चिरंतन यौवनात असल्याचे वर्णन येते. सोन्याच्या तंतुवाद्यावर वादन करून मने रिझवणारा, रुप्याचे धनुष्य असणारा, विवेकाचे व न्यायाचेही प्रतीक आहे. तसेच धार्मिक आणि नागरी कायद्याचा अधिष्ठाता दैवत आहे. अपोलो रोगनिवारणाची विद्या जाणणारा आणि ती लोकांनाही शिकवणारा देव आहे. अंधाराचा स्पर्शही नसणारा प्रकाशाचा आणि म्हणूनच सत्याचा दैवत मानला जातो. अपोलोचे व्यक्तिमत्त्व अत्यंत लोभस तसेच गुंतागुंतीचे असल्याने अपोलो हा चित्रकार तसेच मूर्तिकारांचा अतिशय आवडता विषय आहे.
संदर्भ :
- Graves, Robert, The Greek Myths : The Complete and Definitive Edition, UK, 2011.
समीक्षक – सिंधू डांगे