दक्षिण पॅसिफिक महासागरातील सामोआ या द्वीपीय देशाची राजधानी. लोकसंख्या ३७,३९१ (२०२२ अंदाजे). सामोआतील ऊपोलू बेटाच्या उत्तर किनाऱ्यावर वैसिगॅनो नदीच्या मुखाशी हे शहर वसलेले आहे. पूर्वी हे एक लहानसे खेडे होते. आधुनिक शहराची स्थापना इ. स. १८५० च्या दशकात झाली. इ. स. १९०० ते इ. स. १९१४ या कालावधीत ही जर्मन सामोआची राजधानी होती. १९६२ मध्ये सामोआ नावाने स्वतंत्र देशाची निर्मिती होऊन आपीआ हीच त्याची राजधानी राहिली.
देशाचे स्थान ऊष्ण कटिबंधीय हवामान क्षेत्रात येत असले, तरी व्यापारी वाऱ्यांच्या प्रभावक्षेत्रात येत असल्यामुळे येथे विषुववृत्तीय प्रदेशासारखे जास्त तापमान आढळत नाही. वसाहत काळात १६ मार्च १८८९ रोजी तीव्र टायफून वादळाचा तडाखा ऊपोलू बेटाला बसला होता. त्या वेळी आपीआ बंदरातील जर्मन व अमेरिका यांच्या प्रत्येकी तीन युद्धनौका भरकटल्या व नष्ट झाल्या. फक्त ब्रिटिशांची कॅलिओप या युद्धनौकेचा बचाव झाला होता. दुसऱ्या महायुद्धकाळात अमेरिकन नौदलाने आपीआ शहरात अनेक रस्ते आणि एक विमान धावपट्टी बांधली. २९ सप्टेंबर २००९ रोजी येथून सुमारे १९० किमी. दक्षिणेस पॅसिफिक महासागरात रिश्टर मापक्रमाप्रमाणे ८.३ इतक्या तीव्रतेचा भूकंप होऊन निर्माण झालेल्या त्सुनामी लाटांमुळे सामोआ द्वीपसमूहाची, ऊपोलू बेटाची आणि आपीआ शहराची अपरिमित प्राणहानी आणि वित्तहानी झाली होती.
आपीआ शहराची अर्थव्यवस्था नारळाची उत्पादने, विद्युतसाहित्य, फळे, तारो व इतर खाद्यपदार्थ यांच्या निर्यातीवर आणि पर्यटनावर अवलंबून आहे. विविध निर्मिती उद्योगांचे तसेच पर्यटनाचेही हे प्रमुख केंद्र बनले आहे. हे देशातील प्रमुख बंदर असल्यामुळे सतत गजबजलेले असते. फॅलेओला हा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. येथील मूलीनू द्वीपकल्पावर आपीआ वेधशाळा, विधानपरिषद भवन आणि प्रेषण केंद्र आहे. येथे नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सामोआ, युनिव्हर्सिटी ऑफ साउथ पॅसिफिक व ओशियाना युनिव्हर्सिटी ऑफ मेडीसीन ही विद्यापीठे आहेत. येथील सामोआ संग्रहालय, कॅथलिक चर्च उल्लेखनीय आहेत. एकोणिसाव्या शतकातील प्रसिद्ध स्कॉटिश लेखक रॉबर्ट लूई स्टीव्हन्सन हे आपल्या आयुष्यातील अखेरची वर्षे येथे वास्तव्यास होते. त्यांचे येथील निवासस्थान प्रसिद्ध असून सध्या या वास्तूत राज्यप्रमुखांचे निवासस्थान आहे. स्टीव्हन्सन यांचे दफन शहराच्या दक्षिण सीमेवर असलेल्या ४६० मी. उंचीच्या व्हॅइआ टेकडीवर केले आहे.
समीक्षक : वसंत चौधरी