फिंचर, डेव्हिड : (२८ ऑगस्ट १९६२). वेगळ्या धाटणीच्या मानसशास्त्रीय थरारपटांसाठी आणि सांगीतिक चित्र दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध असलेले अमेरिकन दिग्दर्शक व निर्माता. त्यांचे पूर्ण नाव डेव्हिड अँड्र्यू लिओ फिंचर. डेव्हिड यांचा जन्म कॅलिफोर्नियातील सॅन अन्सेल्मो येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच चित्रपट बनवण्यात रूची होती. त्यामुळे याच क्षेत्रात त्यांनी पुढे जायचा निर्णय घेतला. तारुण्यात पदार्पण केल्यानंतर त्यांनी जॉर्ज लुकास यांच्यासोबत साहाय्यक छायाचित्रकार म्हणून काम करायला सुरुवात केली. सोबतच त्यांनी स्वतंत्रपणे लहान-लहान जाहिरातींचे दिग्दर्शन करायलाही सुरुवात केली. १९८९ साली त्यांनी प्रसिद्ध अमेरिकन गायिका मॅडोनाच्या ‘एक्स्प्रेस युवरसेल्फ’ आणि ‘वोग’ (१९९०) या गाण्यांचे चित्रीकरण आणि दिग्दर्शन केले. याचवेळी अमेरिकेतला प्रसिद्ध रॉक बँड ‘एरोस्मिथ’ चे ‘जेनी’झ गॉट अ गन’ (१९८९) या गाण्यांचे दिग्दर्शन व चित्रीकरण केले. यासाठी त्यांना पुरस्कृतही करण्यात आले. ही गाणी अतिशय गाजली. यानंतर ते चित्रपट निर्मितीकडे वळले. १९९२ साली एलियन या चित्रपट मालिकेतील तिसऱ्या एलियन ३ या तांत्रिक करामती असलेल्या थरारक चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड यांनी केले, या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या; पण डेव्हिड यांच्या दिग्दर्शनाचे विविध स्तरांतून कौतुक झाले.
१९९५ साली ब्रॅड पिट आणि मॉर्गन फ्रिमन या कलाकारांसोबत केलेला सेव्हन हा चित्रपट आजही फिंचर यांनी दिग्दर्शित केलेल्या सर्वोत्तम थरारपटांपैकी एक मानला जातो. ख्रिश्चन धर्मात सांगितलेल्या सात पापकर्मांच्या सिद्धांतावर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. यात अभिनेता केविन स्पेसी यांनी एकापाठोपाठ एक खून करणाऱ्या मानसिक विकृत व्यक्तीचे (सिरियल किलर) काम केले आहे. डेव्हिड यांच्या ह्या चित्रपटाला लोकांनी आणि समीक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली. डेव्हिड यांच्या २००८ सालच्या द क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन आणि २०१३ सालच्या गॉन गर्ल या दोन चित्रपटांनी खूप मोठे व्यावसायिक यशदेखील अनुभवले. ‘द क्युरियस केस…’ या चित्रपटातल्या म्हातारपण ते बालपण असा विरुद्ध प्रवास करणाऱ्या पात्राच्या कथेने लोकांना भावुक केले, तर गॉन गर्लच्या कथेने प्रेक्षकांना एका अद्भुत थरारक कथेचा अनुभव दिला.
१९९९ साली ब्रॅड पिट-डेव्हिड फिंचर या जोडीने आणखीन एक वेगळाच चित्रपट लोकांच्या भेटीला आणला तो म्हणजे फाईट क्लब. हा चित्रपट फिंचर यांच्या कारकीर्दीतला आणि अमेरिकन चित्रपटविश्वाच्या इतिहासातला अव्वल दर्जाचा थरारपट म्हणून ओळखला जातो. हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला, त्यावेळेस लोकांनी याकडे पाठ फिरवली, पण नंतरच्या काळात घराघरांतून दूरदर्शनाच्या आणि महाजालकाच्या (इंटरनेट) माध्यमातून हा चित्रपट लोकांनी पाहिला आणि तो प्रेक्षकांनी इतका पसंत केला की, आता त्याला एक ‘कल्ट’ अभिजात चित्रपट अशी ओळख मिळाली आहे. २००८ मध्ये द क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन हा त्यांचा काल्पनिक शृंगारिक चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला ऑस्कर पुरस्काराची १३ नामांकने मिळाली. पैका तीन पुरस्कार या चित्रपटाने जिंकले. याबरोबरच झोदियाक (२००७), द सोशल नेटवर्क (२०१४) असे काही वेगळ्या धाटणीचे चित्रपटसुद्धा डेव्हिड फिंचर यांच्या नावावर आहेत. द सोशल नेटवर्क या चित्रपटातून फेसबुकसारखे महाजालकावरील एक मोठा माहितीचा स्रोत असलेले एक माध्यम आणि त्यामागचा कंपनीचे व्यवस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा थक्क करणारा प्रवास फिंचर यांनी विस्तृतपणे उलगडून सांगितला आहे. या चित्रपटासाठी फिंचर यांना सर्वाधिक पुरस्कारसुद्धा मिळाले. या चित्रपटांसोबतच फिंचर यांनी महाजालकाच्या माध्यमातूनही पदार्पण केले. महाजालकावरील द हाउस ऑफ कार्ड आणि माइंड हंटर या गाजलेल्या चित्रमालिकांसाठी (वेबसिरीज) डेव्हिड यांनी काम केले. द हाउस ऑफ कार्ड या मालिकेच्या पहिल्या अंकाच्या दिग्दर्शनासाठी डेव्हिड यांची खूप प्रशंसा झाली. २०२० मध्ये महाजालकातील माध्यमासाठी डेव्हिड यांनी मंक हा चित्रपट केला. १९४१ सालच्या ऑस्कर पारितोषिक प्राप्त सिटीझन केन या प्रसिद्ध चित्रपटाचे पटकथालेखक हर्मन मॅन्कीवीज यांच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. यालासुद्धा लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. थरारपटापेक्षा काहीतरी वेगळं, हटके विषय हाताळणाऱ्या डेव्हिड यांच्या या चित्रपटाची समीक्षकांनीसुद्धा खूप प्रशंसा केली. पण फक्त थरारपट नव्हे तर वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे चित्रपट त्यांनी तयार केले.
डेव्हिड फिंचर यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे द सोशल नेटवर्क या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट दिग्दर्शनाचा गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि बाफ्ता पुरस्कार, द हाउस ऑफ कार्डसाठी प्राईमटाईम एमी पुरस्कार, द क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन या चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शनाचा लंडन फिल्म क्रिटिक्स सर्कल पुरस्कार इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत.
समीक्षक : आशुतोष जारंडीकर