आचार्य विज्ञानभिक्षु : सांख्य, योग आणि वेदान्त या तीन दर्शनांचे आचार्य. त्यांनी या दर्शनांवर अनेक मौलिक ग्रंथ लिहिले आहेत. त्यांचे निवासस्थान काशी असल्याचे मानले जाते. त्यांच्या माता-पित्याचा किंवा काळाचा निश्चित उल्लेख प्राप्त होत नाही. सामान्यत: इसवी सनाचे चौदावे व सोळावे शतक यातील मधल्या काळात ते होऊन गेले असे मानले जाते. काहीजण त्यांना गौड (बंगाल) प्रांताचा तर काही उत्तर भारताचा रहिवासी मानतात. विज्ञानभिक्षु स्वत:च्या ग्रंथात प्रयाग आणि त्रिवेणीचा उल्लेख वारंवार करतात. त्यामुळे प्रयाग हे त्यांचे जन्मस्थान किंवा निवासस्थान असावे असा तर्क केला जातो. त्यांच्या ग्रंथांमध्ये हिंदी भाषेचा परिणाम झालेल्या संस्कृत शब्दांचे प्रयोग आढळतात. त्यामुळे ते बिहार, उत्तरप्रदेश किंवा मध्यप्रदेश अशा हिंदी भाषिक प्रांतातले असावे असे मानले जाते. त्यांच्या ग्रंथांतील संस्कृत भाषेवरील हिंदी भाषेच्या प्रभावाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे – घोड्यासाठी ते ‘घोटक’ शब्द वापरतात. योगवार्त्तिकामध्ये ‘आवश्यकत्व’ (आवश्यकता), ‘शीघ्रसिद्धि’ (तत्काळ साध्य होणे), ‘विलम्ब-भविष्यता’ (विलंब होणे), ‘शीघ्र-भविष्यता’ (तत्काळ होणे); योगसारसंग्रहात ‘विलग्नसिद्धि’ (वेगवेगळे होणे); सांख्यप्रवचनभाष्यात जमा-खर्चासाठी ‘तुल्य-आयव्ययत्वम्’ हे शब्द त्यांनी वापरले आहेत. तसेच त्यांनी वापरलेल्या वाक्प्रचारांतही हिंदीचा प्रभाव दिसतो.
विज्ञानभिक्षु स्वत:चा उल्लेख ‘भूदेव’ (ब्राह्मण) असा करतात. ते बुद्धिनिष्ठ योगी होते. ब्रह्मसूत्रावरील विज्ञानामृत-भाष्याच्या पुष्पिकेत ते स्वत:चा उल्लेख ‘यति’ (संन्यासी) असा करतात. त्यांनी संन्यास मार्गापेक्षा योगाला प्राधान्य दिले आहे. त्यांचा संन्यास हा चित्तशुद्धीस्वरूप वैराग्य-मार्गावलंबी योगमार्गाचा होता. या अर्थाने ते योगी होते. प्रसादमाधव योगी, भावागणेश आणि दिव्यसिंह मिश्र हे विज्ञानभिक्षूंचे शिष्य होते. त्यांचे सांख्य, योग आणि वेदान्त दर्शनांवर असामान्य प्रभुत्व होते. सांख्यदर्शनावर त्यांनी सांख्यप्रवचन-भाष्यम्, सांख्यसार व सांख्यकारिकाभाष्यम् हे ग्रंथ लिहिले. सांख्यकारिकाभाष्यम् हा ग्रंथ विज्ञानभिक्षूंनी लिहिला आहे का याविषयी मतभेद आहेत. याचे कारण त्यांच्या अन्य रचनांमध्ये या ग्रंथाचा उल्लेख नाही. शिवाय या ग्रंथाच्या शेवटी ‘भाष्यं च गौडपादकृतम्|’ (गौडपादांनी केलेले भाष्य) असा निर्देश आढळतो, त्यामुळे हा ग्रंथ गौडपादांनी लिहिला आहे असे मत प्रचलित आहे. तो विज्ञानभिक्षूंनी लिहिला याचा पुरावा म्हणून हस्तलिखितातील ‘विज्ञानभिक्षुविरचितं-सांख्यभाष्यम्’ असे शब्द प्रस्तुत केले जातात. या ग्रंथात विज्ञानभिक्षूंच्या अन्य ग्रंथांचा उल्लेखही येत नाही, त्यामुळे त्यांचा तो पहिला ग्रंथ असावा किंवा तो ग्रंथ त्यांनी लिहिलाच नसावा असे अनुमान केले जाते. योगदर्शनावर त्यांनी योग-वार्त्तिकम् व योगसारसंग्रह: हे महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले.
सूत्रकार बादरायण (व्यास) यांनी उपनिषदांतील तात्त्विक विचारांवर रचलेली ब्रह्मसूत्रे वेदान्तदर्शनाचा पाया आहेत. ब्रह्मसूत्रांवर विज्ञानभिक्षूंनी ब्रह्ममीमांसाभाष्यम् हा ग्रंथ लिहिला. हे भाष्य विज्ञानामृत – भाष्यम् किंवा ऋजुव्याख्या या नावांनी देखील प्रसिद्ध आहे. विज्ञानभिक्षूंनी कठ, कैवल्य, मैत्रेयी, माण्डूक्य, मुण्डक, प्रश्न, तैत्तिरीय, श्वेताश्वतर आणि बृहदारण्यक या उपनिषदांवर भाष्ये लिहिली. उपनिषदांवरील या भाष्यांना ‘वेदान्तालोक’ असे नाव आहे. त्यांनी वैशेषिकदर्शनावर वैशेषिकवार्त्तिकम् अथवा भिक्षुवार्त्तिकम् (प्रशस्तपादभाष्य-व्याख्यानम्) हा ग्रंथ लिहिला. ईश्वर-गीता-भाष्यम् या त्यांच्या ग्रंथामध्ये वेदान्त व योग यांचा अनोखा संगम आढळतो. या व्यतिरिक्त ब्रह्मादर्श:, उपदेशरत्नमाला व शंकर-विजय-टीका हे देखील ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत.
भाष्यग्रंथांमध्ये विज्ञानभिक्षु स्वमताच्या पुष्टीसाठी शास्त्रीय ग्रंथांव्यतिरिक्त वेद, इतिहास, पुराणे व अन्य ग्रंथ यांचेही दाखले देतात तसेच असंख्य उदाहरणे प्रस्तुत करतात. मुण्डक उपनिषद्, छान्दोग्य उपनिषद्, श्वेताश्वतर उपनिषद्, गोपालोत्तरतापनीय उपनिषद्, महाभारत, भगवद्गीता, विष्णुपुराण, नारदपुराण, भागवतपुराण, कूर्मपुराण, योगवासिष्ठ, नारदीय हरिभक्तिसुधोदय इत्यादी ग्रंथांतील वचनांची रेलचेल त्यांच्या रचनांमध्ये आढळते. सांख्य किंवा योग दर्शनातील पारिभाषिक संज्ञांची व्युत्पत्ती व व्याख्या ते चपखल शब्दात करतात.
योग शब्दाची व्युत्पत्ती ‘युजिर् योगे’ (एकरूप होणे) आणि ‘युज् समाधौ’ (समाधीत स्थित होणे) या दोन वेगवेगळ्या अर्थांच्या धातूंपासून झाली आहे. पहिली व्युत्पत्ती वेदान्तानुसार तर दुसरी व्युत्पत्ती योगानुसार आहे. विज्ञानभिक्षूंनी या दोन्ही व्युत्पत्तींनी निर्दिष्ट होणारा योग प्रतिपादन केला. सर्वच भारतीय दर्शने मूलत: परस्परविरोधी नाहीत हा सिद्धान्त प्रतिपादित करून विज्ञानभिक्षूंनी समन्वयाची भूमिका घेतली.
विज्ञानभिक्षूंच्या काळात वेदान्त आणि भक्तिमार्गाचे प्रस्थ वाढले होते. सांख्यदर्शनाच्या अध्ययनाची परंपरा दुर्मिळ होत चालली असताना तिला पुनरुज्जीवित करण्यासाठी विज्ञानभिक्षूंनी अपरंपार कष्ट केले आणि सांख्यदर्शनाला प्रतिष्ठा मिळवून दिली.
समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर