तुर्कस्तानच्या (सध्याचे नाव तुर्की) दक्षिण ॲनातोलिया प्रांतातील एक पुरातत्त्वीय स्थळ आणि जागतिक वारसास्थळ. नवाश्म व ताम्रपाषाणयुगातील आद्य शेतकऱ्यांची मोठी वसाहत येथे होती. तुर्की भाषेत ‘चताल’ म्हणजे ‘दुभंगलेले’ आणि ‘हुयुक’ म्हणजे ‘टेकाड’.

चतालहुयुक, तुर्कस्तान.

भटकेपणा व शिकारी जीवनानंतर मानवाने एका जागी स्थिर राहण्याची जी सुरुवात केली त्या स्थित्यंतरातील महत्त्वाचे पुरावे चतालहुयुक येथे आढळलेले असून हे ॲनातोलियातील कोन्या पठारावर कोन्या (Konya) या शहरापासून ४० किमी. अंतरावर आहे. या पुरातत्त्वीय स्थळाचे दोन भाग असून पूर्वेकडील मोठ्या टेकाडाची उंची २० मी. असून पश्चिमेकडील छोट्या टेकाडाजवळ बायझंटाइन (Byzantine) काळातीलही वसती होती. दोन टेकाडांच्या मधून पूर्वी कारसंबा ही नदी वाहत होती. नवाश्मयुगातील व ताम्रपाषाणयुगातील वसती या नदीने वाहून आणलेल्या गाळाच्या थरांवर झालेली होती.

तुर्कस्तानातील ॲनातोलिया प्रांतात पुरातत्त्वीय सर्वेक्षण करताना चतालहुयुकचा शोध इंग्लिश पुरातत्त्वज्ञ जेम्स मेलार्ट (१९२५-२०१२) यांना १९५२ मध्ये लागला. या काळात सुपीक चंद्रकोर (Fertile Crescent) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाबाहेर नवाश्मयुगीन संस्कृतींविषयी अत्यंत तुटपुंजी माहिती उपलब्ध होती. मेलार्टनी १९६२ ते १९६५ या काळात चतालहुयुकला पहिले उत्खनन केले. या उत्खननामुळे शेती आणि पशुपालन करण्याच्या नवाश्मयुगीन स्थित्यंतराची सीमा आणखी पश्चिमेकडे सरकली आणि चतालहुयुक हे पुरातत्त्वीय जगात प्रसिद्ध झाले. तथापि १९६५ मध्ये अचानक तुर्की सरकारने मेलार्टला देशाबाहेर घालवून दिल्यामुळे चतालहुयुकच्या संशोधनाला खीळ बसली. यानंतर थेट १९९३ मध्ये केंब्रिजमधील प्राध्यापक इयन हॉडर यांनी चतालहुयुक उत्खननाचा, संवर्धन-जतनाचा आणि वारसास्थळ विकसनाचा आंतरराष्ट्रीय प्रकल्प सुरू केला. हा प्रकल्प २०२० पर्यंत चालू होता.

चतालहुयुक येथील हाताचे ठसे.

चतालहुयुक स्थळावरील पूर्वेकडील मोठ्या टेकाडामध्ये नवाश्मयुगीन वसाहतीचे १९ स्तर आढळले असून तेथे इ. स. पू. ७४०० ते ६००० अशी सलग लोकवस्ती होती. या काळात गावाचा विस्तार १३.५ हेक्टर असल्याचे दिसते. एकावेळी या गावात ३००० ते ८००० लोक राहात असल्याचे अनुमान काढण्यात आले आहे. नवाश्मयुगाच्या अखेरच्या काळात व ताम्रपाषाणयुगामध्ये रहिवासाचे केंद्र पश्चिमेकडील भागात सरकले आणि येथे इ. स. पू. ५५०० पर्यंत लोकवस्ती होती. या वस्तीचा आकार किमान सु. ५.४५ हेक्टर होता आणि मुख्य वस्तीच्या आजूबाजूला विखुरलेल्या स्वरूपात काहीजण राहात असावेत. नवाश्मयुगातील व ताम्रपाषाणयुगातील वस्तींमध्ये कोणताही खंड पडलेला दिसत नाही याचा अर्थ लोकसमूह तेच होते, फक्त त्यांची जीवनशैली बदलली आणि मातीची भांडी बनवण्याचे तंत्र निराळे झाले. पश्चिमेकडील टेकाडावर बायझंटाइन काळात व इस्लामी काळात काही तुरळक दफने झालेली आढळली. परंतु त्यांच्यामुळे नवाश्मयुगातील व ताम्रपाषाणयुगातील घरांना धक्का लागलेला नव्हता.

नवाश्मयुगीन वसाहतीच्या सुरुवातीला मातीची व गवताने शाकारलेली घरे काहीशी विखुरलेली असली तरी पुढील काळात त्यांची दाटी झालेली दिसते. सर्वसाधारणपणे घरे ४५ ते ९० वर्षे वापरात असत आणि मग ती पडल्यावर अथवा मुद्दाम पाडल्यावर त्याच जागी नेमके तसेच घर बांधले जात असे. याचे मुख्य कारण म्हणजे आजूबाजूला विस्तार करण्याजोगी जागाच उपलब्ध नसे. घरांमध्ये मातीचे बाक बनवलेले असत आणि मोठी  चूल सर्वसाधारपणे दक्षिणेकडील बाजूच्या भिंतीला लागून असे. तसेच काही घरांमध्ये छोट्या आकाराच्या चुलीही आढळल्या आहेत. अन्न तयार करण्याच्या जागी उपयोगी वस्तू साठवण्याचे छोटे खळगे केलेले असत. बहुतेक घरांमध्ये दोन ते तीन खोल्या असून लहान खोलीत मातीच्या मडक्यांमध्ये अन्न साठवलेले असे. भिंती व जमीन चिखलाच्या गोळ्यांनी वारंवार लिंपल्याचे पुरावे आढळले आहेत.

चतालहुयुक येथील स्त्री प्रतिमा.

चोपून तयार केलेल्या घरातील जमिनीतच मृतांना पुरण्याची प्रथा येथे नवाश्मयुगीन काळात होती. सर्वसाधारणपणे घरांमध्ये २-३ दफने आढळली. परंतु काही घरांमध्ये तब्बल ६० ते ६५ जणांचे दफन केल्याचे दिसले. नवाश्मयुगीन चतालहुयुकचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे लोकांनी बैल व एडक्यांच्या कवट्या मातीच्या सपाट बाकांवर रांगेत मुद्दाम रोवून आणि भिंतींवर खोचून ठेवलेल्या होत्या. याचा संबंध धार्मिक समजुतींशी असावा. तसेच भिंतींवरील चित्रे वैशिष्ट्यपूर्ण असून त्यांच्यात काहीतरी प्रतीकात्मकता असावी असे दिसते. चित्रांमध्ये हाताचे ठसे, वन्य प्राणी, शिकारींचे प्रसंग वगैरे विषय आहेत. एका चित्रात एक शिरविरहीत माणूस पडलेला असून त्याच्या वरच्या बाजूला एक गिधाडासारखा पक्षी घिरट्या घालत असल्याचे दाखवले आहे. ईशान्य तुर्कस्तानातील ग्योबेक्ली टेपे (Göbekli Tepe) या नवाश्मयुगीन स्थळावर अशाच प्रकारच्या शिरविरहीत माणसाचे चित्रण आढळले आहे. दफनाच्या आधी मृताचे डोके मुद्दाम काढून टाकण्याची प्रथा नवाश्मयुगीन तुर्कस्तानात असावी असे दिसते. चतालहुयुकमधील अनेक सांगाड्यांच्या कवट्या जागेवर नव्हत्या, तर या कवट्या इतरत्र खड्ड्यांमध्ये टाकलेल्या आढळल्या. या प्रकारची प्रथा सिरियातील तेल आस्वाद (Tell Aswad) आणि पूर्व तुर्कस्तानातील चयोन्यू (Çayönü) या नवाश्मयुगीन स्थळांवरही आढळली आहे.

चतालहुयुक येथे मातीच्या छोट्या आकृती व दगडातून कोरलेल्या स्त्री प्रतिमा मिळाल्या आहेत. त्यांचा संबंध जननक्षमतेशी व स्त्रीदेवता पूजनाशी जोडण्यात आला आहे. तुलनेने पुरुष प्रतिमा अल्प प्रमाणात आहेत. इ. स. पू. ६००० काळातील दगडात कोरलेली एक स्त्री प्रतिमा (१७ सेंमी. लांब, वजन १ किग्रॅ.) एका खळग्यात मिळाली असून स्त्री चांगली धष्टपुष्ट आकाराची दाखवलेली आहे. ही प्रतिमा धार्मिकतेशी निगडित असावी असे दिसते.

चतालहुयुक येथील मातृदेवता प्रतिमा.

त्याप्रमाणे या ठिकाणी मिळालेली आणखी एक स्त्री प्रतिमा प्रसिद्ध असून तिचा कालखंड इ. स. पू.  ६००० असा आहे. ही स्त्री दोन सिंहिणी अथवा बिबट्यांची डोकी असलेल्या आसनावर बसलेली असून ती शिरविरहीत आढळली (छायाचित्रातील शिर संग्रहालयात नव्याने बसवलेले आहे). ही मातृदेवता अथवा उत्तम संततीसाठी पूजली जाणारी देवता असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

चतालहुयुकला गाय व बैलांचे अवशेष मिळाले असून नवाश्मयुगीन लोकांनी त्यांचे पालन करण्याची सुरुवात केली, असे मानले जात होते. तथापि ते पाळीव नसून वन्य असल्याचे निदर्शनास आले आहे. चतालहुयुकच्या लोकांचे जीवन मुख्यतः शेळ्या-मेंढ्यांवर अवलंबून होते आणि ते शिकार (रानगाढवे, ससे व हरणे) व मासेमारीही करत असत. तसेच ते गहू, बार्ली, राय व वाटाणे यांची लागवड करत असत. धान्ये कुटून त्यांच्यापासून ब्रेड बनवला जाई आणि धान्ये भरडून त्यांचे खिरीच्या स्वरूपातही सेवन केले जात असे.

 

 

 

 

संदर्भ :

  • Balter, M., ‘The Goddess And The Bull : Catalhoyuk : An archaeological journey to the dawn of civilization’, Free Press, New York, 2005.
  • Çamurcuoğlu, Duygu Seçil, ‘The Wall Paintings of Çatalhöyük (Turkey): Materials, Technologies and Artists’, Ph.D. Thesis, University College, London, 2015.
  • Farid, Shahina, ‘Çatalhöyük comes Home’, ‘Archaeology International’ 13/14: 36-43. DOI: http://dx.doi.org/10.5334/ai.1313, 2009-2011.
  • Farid, Shahina, ‘Çatalhöyük’, ‘Encyclopedia of Global Archaeology’ (Ed. Smith, Claire), pp. 1896-1903, Springer. 2020.
  • Hodder, Ian, ‘Çatalhöyük: The leopard’s tale, revealing the mysteries of Turkey’s ancient ‘town’’, Thames and Hudson, London, 2006.
  • Mellaart, J. ‘Çatal Hüyük: A Neolithic town in Anatolia’, Thames and Hudson, London, 1967.
  • https://www.newworldencyclopedia.org/entry/Catal_Huyuk

छायाचित्रे स्रोत :

१. चतालहुयुक, तुर्कस्तान. (स्रोतः http://www.ian-hodder.com/)

२. चतालहुयुक येथील हाताचे ठसे. (स्रोतःhttps://whc.unesco.org/)

३. चतालहुयुक येथील स्त्री प्रतिमा. (स्रोतः http://www.sci-news.com/archaeology/female-figurine-catalhoyuk-04203.html)

४. चतालहुयुक येथील बसलेली मातृदेवता प्रतिमा.

समीक्षक : श्रीनंद बापट