फ्रेझर, सर स्टुअर्ट मिटफर्ड : (२ जून १८६४ – १ डिसेंबर १९६३). ब्रिटिशांकित भारत सरकारमधील एक वरिष्ठ अधिकारी, राजनीतिज्ञ तसेच कोल्हापूर संस्थानचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भावनगर संस्थानचे भाऊसिंहजी महाराज (द्वितीय) आणि म्हैसूर संस्थानचे कृष्णराज ओडेयर महाराज (चौथे) यांचे सरकारनियुक्त शिक्षक-पालक. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. प्राथमिक शिक्षण ब्लंडेल स्कूल येथे आणि महाविद्यालतीन शिक्षण ऑक्सफर्डच्या बॅलिअल कॉलेजमध्ये झाले. वयाच्या अठराव्या वर्षी ते तत्कालीन भारतीय नागरी सेवा (आय. सी. एस.) परीक्षा उत्तीर्ण झाले (१८८२) आणि अधिकारी म्हणून ब्रिटिश सरकारच्या मुंबई इलाख्यात त्यांची नियुक्ती झाली.
फ्रेझर यांनी नाशिक येथे सहायक जिल्हाधिकारी; डांग, सुरगाणा तसेच काही काळ ग्वाल्हेर येथे राजकीय प्रतिनिधी (पोलिटिकल एजंट); धारवाड (कर्नाटक) येथे सहायक न्यायाधीश (ऑक्टोबर १८९५ – मार्च १८९६); कलकत्ता (कोलकाता) व शिमला येथे परराष्ट्र विभागात उपसचिव आदी पदांवर कार्य केले. गव्हर्नर जनरल लॉर्ड कर्झन यांनी फ्रेझर यांना वरिष्ठ आयुक्त (एच. एम. कमिशनर) म्हणून अँग्लो-तिबेटियन अधिवेशनामध्ये चीनबरोबर तिबेट सीमाप्रश्नासंबंधी चर्चा करण्यासाठी पाठवले. या काळात तिबेट ब्रिटिशांबरोबर व्यापारी संबंध ठेवू इच्छित नव्हता, मात्र ब्रिटिशांना चीनमध्ये व्यापार वाढविण्यासाठी तिबेटच्या सीमावादावर तोडगा काढणे जिकिरीचे होते. फ्रेझर यांनी हा प्रश्न कुशलतेने हाताळला आणि अँग्लो-तिबेट यांच्यात एक करार घडवून आणला (१९०४). तिबेटमधील यशस्वी कामगिरीनंतर फ्रेझर यांची म्हैसूरचे राजप्रतिनिधी (रेसिडेंट) आणि कूर्ग प्रांताचे मुख्य आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.
फ्रेझर हे छ. शाहू महाराज यांच्यासह त्यांचे बंधू, कागलचे जहागीरदार बापूसाहेब महाराज, भावनगरचे भाऊसिंहजी महाराज यांचेही शिक्षक होते (१८८९-१८९४). फ्रेझर यांनी धारवाड येथून या राजकुमारांच्या शिक्षणाला सुरुवात केली. त्यांनी छ. शाहू महाराजांना राज्यकारभाराबरोबरच कायदा, न्यायदान पद्धती, भारतीय दंड संहिता (इंडियन पिनल कोड) यांसंबंधीचे शिक्षण दिले. फ्रेझर आणि छ. शाहू महाराज यांच्यातील पत्रव्यवहारांवरून या गुरुशिष्यांतील घनिष्ठ संबंधांचा प्रत्यय येतो. महाराजांच्या जीवनातील विषप्रयोगाचे प्रकरण, वेदोक्त प्रकरण, ब्रिटिश प्रतिनिधींशी बिनसलेले संबंध, ब्राह्मणेतर पक्ष आणि सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन आदींबाबत बराच तपशील या पत्रव्यवहारांत दिसून येतो. फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली छ. शाहू महाराज व इतर राजपुत्रांनी उत्तर भारतात दोन व दक्षिणमध्ये एक अशा तीन सफरी पूर्ण केल्या. फ्रेझर यांनी ‘थ्री टुअर्स इन इंडिया अँड सिलोन’ (१८९४) या ग्रंथात या प्रवासाचे सविस्तर वर्णन दिले आहे. फ्रेझर यांच्या आग्रहामुळेच छ. शाहू महाराज इंग्लंडच्या राजाच्या राज्यारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहिले. या निमित्ताने छ. शाहू महाराजांना यूरोपमधील प्रगती, नवीन शहरे, कारखाने, लोकजीवन आणि संस्कृती जवळून पाहता आली. छ. शाहू महाराज व फ्रेझर दोघांनाही शिकारीची आवड होती. त्यांच्यातील याबाबतच्या पत्रांमध्ये विविध रोमांचकारी हकिकती आहेत. राजर्षी छ. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात जे अनेक कायदे केले, राजकीय निर्णय घेतले त्यांवर फ्रेझर यांचा प्रभाव जाणवतो. विशेषतः जमीन महसूल, न्याय, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुधारणा आदी प्रगतीशील धोरणे राबविण्यास फ्रेझर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. तत्कालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांनी शाहू महाराजांचे शिक्षक म्हणून फ्रेझर यांच्या कार्याचा गौरवपूर्वक उल्लेख केला.
फ्रेझर यांनी म्हैसूर संस्थानचे कृष्णराज ओडेयर महाराज यांचेही शिक्षक-पालक म्हणून काम केले (१८९६-१९०२). म्हैसूर संस्थानात त्यांनी प्रशासकीय, शैक्षणिक, औद्योगिक सुधारणा तसेच व्यापार वाढीसाठी प्रोत्साहन दिले. संस्थानातील धोरणात्मक निर्णयांवरून फ्रेझर आणि कृष्णराज ओडेयर महाराज यांच्यात बऱ्याचदा मतभेद होत असत; तथापि परस्परांबद्दल आदर मात्र कायम होता. फ्रेझर यांच्या सन्मानार्थ बंगळुरू येथे ‘सर स्टुअर्ट मिटफर्ड फ्रेझर टाउन’ स्थापन करण्यात आले (१९०६).
फ्रेझर पुढे काश्मीर संस्थान आणि अखेर निवृत्तीपर्यंत (१९१९) हैदराबाद संस्थानात राजप्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. काश्मीर संस्थानात प्रतापसिंग महाराज यांच्या काळात (१९००-१९०५) त्यांनी काश्मीरचे प्रशासन, न्यायव्यवस्था आणि पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण यांबाबत सुधारणा सादर केल्या. येथील जातीय सलोखा वाढविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच महसूल संकलन, जमिनीची मालकी आणि कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी मूलभूत मार्गदर्शन केले; तथापि फ्रेझर आणि महाराजा प्रतापसिंग यांच्यातही मतभेद होते.
फ्रेझर हैदराबाद संस्थानात राजप्रतिनिधी म्हणून कार्यरत असताना पहिले महायुद्ध सुरू झाले (१९१४). आंतरराष्ट्रीय घडामोडींत तुर्कस्थान जर्मनीच्या बाजूने युद्धात सामील झाले. तुर्कस्थानचा शासक सुन्नी पंथीय असल्याने भारतीय मुस्लीमही ब्रिटिशांविरोधात उठाव करतील अशी शंका होती. या कठीण परिस्थितीमध्ये हैदराबाद संस्थानचे शासक उस्मान अली खान आणि निजाम सातवा असफजहा यांचा विश्वास संपादन करून त्यांचा पाठिंबा मिळवण्यात फ्रेझर यांची भूमिका महत्त्वाची ठरली. ब्रिटिश सरकारने फ्रेझर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘नाइट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इंडिया’ (के सी एस आय ) या सन्मान्य पदवीने गौरविले. निवृत्तीनंतर ते मायदेशी इंग्लंडला परतले.
इंग्लंड येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- Ernst, Waltraud; Pati, Biswamoy, Eds., Indias Princely States: People, princes and colonialism, Routledge, 2007.
- Ikegame. Aya, Princely India Re-imagined : A historical anthropology of Mysure from 1799 to the present, Routledge, 2012.
- पवार, जयसिंगराव, संपा., ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ’, महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी, कोल्हापूर, २००१.
- लठ्ठे, आ. बा., ‘श्रीमच्छत्रपती शाहुमहाराज यांचे चरित्र’, बेळगाव, १९२५; पवार, जयसिंगराव, संपा., शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, २००८.
- संगवे, विलास; खणे, बी. डी.; पवार, आप्पासाहेब (संपा.) ‘राजर्षी शाहू पेपर्स’, खंड १ ते ४, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, १९७८.
- छायाचित्र संदर्भ : https://www.npg.org.uk/collections/search/person/mp80827/sir-stuart-mitford-fraser
समीक्षक : अवनीश पाटील