सहगल, जोहरा : (२७ एप्रिल १९१२—१० जुलै २०१४). नृत्यक्षेत्रात आणि चित्रपटक्षेत्रात दीर्घकाळ काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका. नृत्य मंडळाच्या सदस्या म्हणून सहगल यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात केली. तर १९४०च्या दशकापासून त्यांनी अभिनय क्षेत्रात आपली कारकीर्द सुरू केली. सहा दशकांहून अधिक काळ सहगल यांनी अनेक हिंदी व ब्रिटिश चित्रपट, दूरदर्शन कार्यक्रम आणि बॉलिवूड निर्मित कार्यक्रमात विविधांगी भूमिका केल्या.

जोहरा यांचा जन्म उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे पारंपरिक मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे वडील मुमताजुल्ला खान आणि आई नातिका बेगम यांना झाकुल्ला, हजरा, जोहरा, इक्रमुल्ला, उझरा (उझरा बट), अण्णा आणि सबीरा ही सात मुले. या सात मुलांपैकी जोहरा या तिसऱ्या होत्या. त्यांचे पूर्ण नाव साहिबजादी जोहरा मुमताजुल्ला खान बेगम असे असून त्यांचे पालनपोषण उत्तराखंड राज्यातील चक्राता येथे झाले. जोहरा लहानपणी खूप अवखळ होत्या. झाडावर चढणे आणि मैदानी खेळ खेळणे हे त्यांचे आवडते छंद. जोहरा लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. यानंतर जोहरा आणि त्यांच्या बहिणींना पुढील शिक्षणासाठी लाहोरच्या ‘क्वीन मेरी महाविद्यालया’मध्ये घातले. या संस्थेत कडक परदा पद्धत पाळण्यात येत असे; मात्र तेथे विविध तज्ज्ञांची व्याख्याने व चर्चासत्रे आयोजित केली जात असत. सर्व मुलींना ही व्याख्याने व चर्चासत्रे पडद्यामागून ऐकण्याची परवानगी देण्यात येत असे. अशा पारंपरिक वातावरणात जोहरा यांचे बालपण व किशोरवयीन जीवन व्यतित झाले.

पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जोहरा यांनी जर्मनीतील ड्रेझ्डेन येथे प्रख्यात जर्मन नर्तकी व नृत्यशिक्षिका मेरी विग्‌मान यांच्या ‘विग्‌मान स्कूल’ या नृत्यशिक्षणसंस्थेमध्ये बॅले नृत्यप्रकार शिकण्यासाठी प्रवेश घेतला. त्यांनी या नृत्यप्रकाराची प्रवेश परीक्षा पूर्वीचा या नृत्याचा कोणताही अनुभव नसताना उत्तीर्ण केली आणि या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. ज्या काळात भारतीय स्त्रियांना अनेक बंधने होती, अशावेळी त्यांनी परदेशात जाऊन नृत्य शिकण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. त्यांच्या हितचिंतक काउंटेस लाइबेन्स्टाइन यांच्या घरात राहून पुढची तीन वर्षे आधुनिक नृत्य शिकण्यासाठी त्या ड्रेझ्डेनमध्ये राहिल्या. जागतिक कीर्तीचे भारतीय नर्तक उदय शंकर यांच्या शिवपार्वती बॅलेच्या सादरीकरणावेळी जोहरा यांची त्यांच्याशी भेट झाली. उदय शंकर यांनी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर व भारतात परतल्यावर जोहरा यांना संधी देण्याचा शब्द दिला. ही संधी त्यांना ऑगस्ट १९३५ मध्ये मिळाली. जोहरा उदय शंकर यांच्या जपान दौऱ्याच्या नृत्यसमूहगटात सामील झाल्या. यानंतर त्यांनी जपान, इजिप्त, यूरोप आणि अमेरिकेच्या अनेक भागांचा दौरा केला. फ्रेंच नागरिक असलेल्या मादाम सिमकी यांच्याबरोबर जोहरा यांनी लवकरच स्वत:ला मुख्य नर्तक म्हणून सिद्ध केले. १९४० मध्ये त्या भारतात परतल्या. उदय शंकर यांच्या अलमोडा येथील “इंडिया कल्चर सेंटर” येथे त्या नृत्यशिक्षिका म्हणून काम करू लागल्या. येथेच त्यांची भेट इंदूर येथील तरुण शास्त्रज्ञ, चित्रकार आणि नर्तक आणि त्यांचे भावी पती कामेश्वर सहगल यांच्याशी झाली. कुटुंबियांचा विरोध सहन करून त्या दोघांनी १४ ऑगस्ट १९४२ रोजी विवाह केला. या दोघांची ओडिसी नर्तिका किरण सहगल आणि डब्ल्यूएचओ या संस्थेसाठी कार्यरत पवन सहगल ही दोन अपत्ये होत. जोहरा व त्यांचे पती कामेश्वर यांनी विवाहानंतरही तेथेच काम करण्याचा निर्णय घेतला. याचबरोबर या दोघांनीही विविध सांस्कृतिक कार्यक्रमात काम सुरू केले आणि स्वत:ला नृत्य दिग्दर्शक म्हणून सिद्ध केले. यादरम्यान त्यांनी नृत्यनाट्यांमध्ये अनेक नवनवीन प्रयोग केले.  या दोघांनी लाहोरला जाऊन तेथे स्वत:च्या ‘जोहरेश नृत्य अकादमी’ची स्थापना केली; पण तेथे फाळणीच्या पार्श्वभूमीवर असलेल्या जातीय तणावातून ते आपली एक वर्षाची मुलगी किरण हिच्यासह मुंबईला आले. यानंतर जोहरा सहगल १९४५ मध्ये ‘पृथ्वी थिएटर’ या नाट्यसंस्थेमध्ये अभिनेत्री म्हणून रूजू झाल्या. या नाट्यसंस्थेसमवेत त्यांनी संपूर्ण भारतभर दौरा केला.

१९४५ मध्ये जोहरा सहगल यांनी इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा) या संस्थेद्वारे निर्मित अनेक नाटकांमध्ये भूमिका केल्या. १९४६ मध्ये त्यांनी ख्वाजा अहमद अब्बास दिग्दर्शित व इप्टा निर्मित धरती के लाल या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले; त्यानंतर त्यांना इप्टा निर्मित नीचा नगर  (१९४६) या चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली. चेतन आनंद दिग्दर्शित आणि रफीक अहमद व उमा आनंद अभिनीत हा चित्रपट भारतीय उपखंडातील समांतर चित्रपट चळवळीचा पहिला प्रकल्प होता. कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो प्रदर्शित करण्यात आला. या महोत्सवातील जागतिक दर्जाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा “पाल्मे डी’ऑर” हा पुरस्कार त्याने जिंकला. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाची प्रशंसा झाली आणि त्याचा त्यांचा अभिनयातील कारकीर्दीलाही फायदा झाला.

मुंबईत राहिल्यानंतर जोहरा सहगल यांची अनेक नाट्यगृहे आणि चित्रपटातील व्यक्तिरेखांशी ओळख झाली. इब्राहिम अल्काझी यांच्या दिन के अंधेरे या नाटकामध्ये त्यांनी ‘बेगम कुदसिया’ची यशस्वी भूमिका साकारत त्यांचा नाटकातील असलेला आपला सहभाग कायम ठेवला. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शक म्हणूनही काम केले. ज्यात प्रसिद्ध दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या बाझी आणि राज कपूर यांच्या आवारा (१९५१) या चित्रपटांचा समावेश आहे. पृथ्वीराज कपूर यांच्या ‘पृथ्वी थिएटरमध्ये’ त्यांनी १४ वर्षे नृत्य दिग्दर्शक म्हणून काम केले.

जोहरा सहगल यांचे पती कामेश्वर सहगल यांचे १९५९ मध्ये निधन झाले. यानंतर सहगल दिल्लीला गेल्या आणि तेथे नव्याने स्थापन झालेल्या नाट्य अकादमीचे संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली. जवळपास तीन वर्षे त्या पदावर त्यांनी काम केले. १९६२ मध्ये त्यांना नाट्य शिष्यवृत्ती मिळाली. त्यामुळे त्यांना लंडन येथे जाण्याची संधी मिळाली. तेथे त्यांनी भारतीय भरतनाट्यम् नर्तक व नृत्य दिग्दर्शक राम गोपाल संचालित भारतीय नृत्य व संगीत अकादमीमध्ये काही काळ नृत्य प्रशिक्षक म्हणून काम केले. लंडनमध्ये त्यांनी प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक रड्यर्ड किपलिंग यांची कथा The Rescue of Pluffles (‘द रेस्क्यू ऑफ प्लफल्स’; १९६४) या  मालिकेद्वारे ब्रिटिश दूरदर्शनवर पदार्पण केले. या मालिकेमध्ये त्यांनी अयाह नावाच्या घरकाम करणाऱ्या महिलेची भूमिका केली होती. १९६० — ७० मध्ये त्यांनी तेथे अनेक मालिकांमध्ये किरकोळ भूमिका केल्या, तसेच त्यांनी ब्रिटिश दूरदर्शनवरील Neighbours (‘नेबर्स’; १९७६-७७) या मालिकेच्या २६ भागांचे निवेदन केले. यादरम्यान त्यांनी तेथील चित्रपटांमध्येही भूमिका केल्या. The Courtesans of Bombay (‘द कोर्टसन ऑफ बॉम्बे’; १९८३) हा त्यांनी अभिनित केलेला माहितीपट. या चित्रपटामध्ये मुंबईच्या एका पुलाखाली घडणाऱ्या अनेक गोष्टीच्या अनुषंगाने दिवसा गाणे-बजावणे आणि नृत्य करून आपली कला जोपासणाऱ्या आणि चरितार्थासाठी शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांचे व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या पुरुषांचे चित्रण केलेले आहे. अशाच एका स्त्रीची जोहरा यांनी यात वास्तवदर्शी भूमिका केली आहे. The Jewel in the Crown (‘द ज्वेल इन द क्राउन’; १९८४) या प्रसिद्ध मालिकेमध्ये त्यांनी लेडी चॅटर्जीची महत्त्वपूर्ण भूमिका केली. ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटच्या सर्वोत्कृष्ट १०० ब्रिटिश दूरदर्शन कार्यक्रमांमध्ये या मालिकेची गणना २२ व्या स्थानी केली जाते.

१९९०च्या मध्यामध्ये जोहरा सहगल भारतात परतल्या. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपट, नाटके आणि दूरदर्शन मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. रविशंकर यांनी उदय शंकर यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी सर्वप्रथम कविता सादर केली. तेव्हापासून त्यांना वेगवेगळ्या प्रसंगी कविता सादर करण्यास आमंत्रित केले जाऊ लागले. ‘इव्हनिंग विथ जोहरा’ या कार्यक्रमासाठी त्या पाकिस्तानमध्ये गेल्या. रंगमंचावरील कार्यक्रमानंतर त्यांना प्रेक्षकांकडून हाफीझ जालंधरी यांची प्रसिद्ध गझल ‘अभी तो मैं जवान हूँ’च्या गायनासाठी अनेकवेळा सांगितले जात असे, इतके त्याचे कविता सादरीकरण प्रसिद्ध झाले होते. १९९३ मध्ये ‘एक थी नानी’ या नाटकामध्ये त्यांनी त्यांची बहीण उझरा बट्ट यांच्यासोबत अभिनय केला होता. हे नाटकही खूप प्रसिद्ध झाले. त्यांच्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये नीचा नगर (१९४६), अफसर (१९६६), भाजी ऑन द बीच (१९९२), दिल से….(१९९८), हम दिल दे चुके सनम (१९९९), दिल्लगी (१९९९), चलो इश्क लडाये (२००२), वीर जारा (२००४), सावरिया (२००७) आणि चीनी कम (२००७) इत्यादी विविध चित्रपटांचा समावेश होतो. तर दूरदर्शन मालिकांमध्ये ‘द ज्वेल इन क्राउन’ (१९८४), ‘तंदूरी नाईट्स’ (१९८५ – ८७) आणि ‘अम्मा अँड फॅमिली’ (१९९६) इत्यादी मलिकांचा समावेश आहे.

जोहरा सहगल यांनी हिंदी व हॉलिवुडमधील अनेक चित्रपट व दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले. त्याचबरोबर हिंदी व परदेशातील दूरदर्शनवरील अनेक कार्यक्रमांमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. सुरुवातीपासूनच नृत्य आणि नाट्य यांवर त्यांची हुकूमी पकड होती. त्यामुळे त्यांनी केलेल्या भूमिका उठावदार असतच; पण त्यातील वेगळेपणामुळे त्या प्रेक्षकांच्या नजरेत भरत. शब्दांची अर्थ समजून केलेली अचूक फेक आणि त्याच्या जोडीला बहारदार मुद्राभिनय यांमुळे त्यांच्या भूमिका स्मरणात राहात आणि त्याला प्रेक्षकांची वाहवा मिळे.  त्यांनी हिंदी चित्रपटात सादर केलेली खेळकर आजीची भूमिका नेहमीच्या आजीच्या भूमिकेला वेगळे परिमाण देणारी ठरली. त्यांनी हिंदीमधील त्या-त्या काळातील अनेक दिग्गज व प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केले.

जोहरा सहगलच्या यांना त्यांच्या अभिनयातील व नृत्यातील उल्लेखनीय कारकीर्दीसाठी अनेक मानसन्मान देण्यात आलेले आहेत. त्यांच्या नृत्यविषयक कारकीर्दीसाठी त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार (१९६३) व त्यांच्या एकूणच कलाविषयक कार्याकरिता भारत शासनाकडून पद्मश्री (१९९८), पद्मभूषण (२००२), पद्मविभूषण (२०१०) या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. याशिवाय त्यांना कालिदास सन्मान (२००१), संगीत नाटक अकादमीची अधिछात्रवृत्ती (२००४) देण्यात आली. जोहरा सहगल यांचे चरित्र त्यांची मुलगी किरण सहगल यांनी फॅटी या नावाने लिहिलेले आहे.

जोहरा सहगल यांचे नवी दिल्ली येथे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले.

संदर्भ :

  • Joan L. Erdman; Segal, Zohra Stages : The Art and Adventures of Zohra Segal, 1996.
  • Segal, Kiran; Segal, Zohra, Fatty, 2012.