(स्थापना : १९३५). भारतीय रासायनिक जीवविज्ञान संस्थान अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायॉलॉजी-सीएसआयआर : आयआयसीबी-ही संस्था जीवविज्ञानातील काही जागतिक महत्त्वाच्या प्रश्नावर संशोधन करणारी संस्था आहे. भारतात या संस्थेची स्थापना जीवशास्त्रीय संशोधन करणारे अनधिकृत केन्द्र म्हणून झाली. १९५६ मध्ये ही संस्था सीएसआयआरच्या अधिपत्याखाली आली. सध्या या संस्थेमध्ये राष्ट्रीय महत्त्वाच्या जीवशास्त्रीय प्रश्नावर संशोधन केले जात आहे. या संस्थेतील संशोधक रसायन विज्ञान, जीवरसायन विज्ञान, पेशी विज्ञान, रेणवीय जीवविज्ञान, चेताविज्ञान आणि प्रतिक्षमता विज्ञान यांतील उत्पादक आंतरशाखेतील प्रश्नाची उकल करतात. त्यातल्या त्यात लौशमॅनियता या एकपेशीय परजीवी आणि कॉलरा आजारावर नव्या तंत्राने निदान, रसायन उपचार आणि प्रतिक्षमता चाचण्या यांवर संशोधन केले जाते. भारतीय पारंपरिक वनस्पती उपचारावर संशोधन करण्यासाठी स्वतंत्र विभाग या संस्थेमध्ये स्थापन केलेला आहे.

मूलभूत संशोधनातील कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आयआयसीबी संस्थेमध्ये आणखी एक विभाग सुरू करण्यात आला. या विभागाचे नाव ट्रू (TRUE)  अर्थात ट्रान्स्लेशनल रिसर्च युनिट ऑफ एक्सलन्स असे आहे. ट्रान्सलेशनल रिसर्च (मराठीत – स्थानांतरी संशोधन) ही सध्याच्या काळाची गरज आहे. यानुसार प्रयोगशाळेतील संशोधन उपचार पद्धतीत वापरून वैद्यकीय उपचार आणखी सुलभ व सामान्य व्यक्तीस परवडणारे कसे होतील हे पाहिले जाते. यासाठी आवश्यक तांत्रिक सहकार्य औद्योगिक संस्था आणि संशोधन संस्था यांनी संयुक्तपणे केलेले असते.

सीएसआयआर- आयआयसीबी या संस्थेमध्ये असलेल्या आधुनिक विभागामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन करण्यात येते. यातील काही विभाग पुढीलप्रमाणे :

(१) कर्करोगविज्ञान आणि प्रक्षोभक विकृती (Inflammatory disorder) : नव्याने सुरू केलेल्या या विभागामध्ये सहा तज्ञ संशोधक आणि पन्नास संशोधक साहाय्यक यांद्वारे कर्करोग विषयक संशोधन करण्यात येते. या विभागाचे लक्ष्य कर्करोगाच्या विविध पातळीवरील रेणवीय आणि जनुकीय कारणांचा अभ्यास करण्याकडे आहे. कर्करोगग्रस्त पेशीमुळे पेशी पातळीवर झालेले प्रतिक्षमता बदल आणि क्षोभविकृती यांचा अभ्यास केला जातो. या केंद्रामध्ये फुप्फुस, मुख कर्करोग, मेंदू, स्तन, स्वादुपिंड, गर्भाशय मुख आणि काही रक्ताच्या कर्करोगावर संशोधन केले जाते. रसायनोपचाराबरोबर पारंपरिक आयुर्वेदातील वनस्पतींचासुद्धा उपचार पद्धतीत समावेश करण्यात येतो. विविध कर्करोगग्रस्त पेशींवर वनस्पतीचे अर्क त्यांची वाढ थांबवू शकतात का? यावरील संशोधन प्रगतीपथावर आहे. कर्करोगाच्या मूळ पेशीवरील संशोधन लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी रासायनिक रेणू, जैव माहिती तंत्रज्ञान आणि प्राणी प्रारूपावरून परवडणारे उपचार करण्यास उत्तेजन दिले जाते.

(२) पेशी विज्ञान आणि शरीरक्रिया विज्ञान : पेशी विज्ञान विभागातील या प्रयोगशाळेत पेशी अंगके आणि पेशी संकेत (Singling) आणि सामान्य शरीरक्रिया यांचा आजाराशी असलेला संबंध यांचा शोध या विभागात घेतला जातो. चेतासंस्थेचे आजार, प्रजनन अवयव, ह्रदयाचे आजार, मधुमेहातील गुंतागुंत, काही चयापचय विषयक आजार आणि परजीवी आजार यांच्या उपचारावरील संशोधन या विभागात केले जाते.

(३) सांसर्गिक आजार आणि प्रतिक्षमता विज्ञान विभाग :  सीएसआयआर- आयआयसीबी येथे संशोधक आणि त्यांना मदत करणारे सहसंशोधक मूलभूत विज्ञान व उपयोजित विज्ञान यांच्या साहाय्याने कॉलरा, लौशमॅनियता (लौशमॅनियता या संसर्गजन्य एकपेशीय आदिजीव संसर्गामुळे झालेला आजार), मलेरिया, जठर व्रण आणि डेंग्यू, चिकुनगुन्या, हर्पिस (नागीण) आणि हिपॅटायटिस-बी यांसारख्या विषाणुजन्य आजाराचे निदान व उपचार केले जातात. अब्जांश तंत्रज्ञानाने औषधांचे सूक्ष्मकण बनवून हे उपचार करण्यात येतात.

कॉलरा संशोधनामध्ये आश्रयी व कॉलरा जीवाणूमध्ये होणाऱ्या परस्पर क्रियेचा आजाराच्या तीव्रतेशी असलेला संबंध, कॉलरा नियंत्रणाशी व विविधा तीव्रतेचा अभ्यास आणि कॉलरा जीवविषावर संशोधन येथे केले जाते. पचन मार्गातील जीवाणू उदा., हेलिओबॅक्टर पायलोरी (जठर व्रणाचा कारक जीवाणू) संसर्ग होण्यातील सहघटकावर महत्त्वाचे संशोधन येथे झाले आहे. हिवताप संसर्गामध्ये जठररस स्त्रवण्याचे प्रमाण कमी होते. प्रोटिएझ विकरावर हळदीमधील कुर्कुमीन या द्रव्याचे उपचार करण्याचा प्रयत्न येथे केला जाणार आहे.

बिहार आणि ओडिशामध्ये काला आजार या विषाणुजन्य आजाराचे प्रमाण अधिक आहे. प्रतिक्षमता चाचण्याच्या आधाराने याचे वेळीच निदान करून काला आजार, लेशमानिया यांवर लस तयार करण्याबद्दल संशोधन यशस्वी झाले तर एक मोठा जागतिक प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. विषाणुजन्य आजारातील संसर्गजन्य डेंग्यू, हर्पिस आणि हिपाटायटीस-बी यांचा समावेश आहे. या विभागातील एक महत्त्वाचे संशोधन म्हणजे डेंग्यूची प्रतिद्रव्याची (अ‍ॅंटिबॉडी) सार्स कोव्ही-2 बरोबर प्रतिक्रिया होते.

(४) रेणवीय आनुवंश विज्ञान : भारतीय लोकसंख्येमध्ये सामान्यपणे आढळणाऱ्या आजारांची रेणवीय आनुवंशिकता काय आहे, परजीवी जीवाणू, विषाणू यांच्या जनुक व्यक्ततेविषयक संशोधन या विभागात केले जाते. तसेच अधिक सुधारित जनुकीय बदल केलेल्या पिकांच्या वाणांची निर्मिती हे आणखी एक उद्दीष्ट ठेवलेले आहे. डोक्याच्या व मानेच्या कर्करोगाचा रेणवीय नियामक जनुक व कर्करोग कसा विकसित होतो यावर येथे संशोधन झाले आहे. जठर व आद्यांत्र यातील हेलिओबॅक्टर पायलोरी व संबंधित आजार, हिमोफिलिया (रक्तगळ) ग्लॅकोमा, विल्सन आजार, डोळ्याशी संबंधित काही विकार, पाण्यातील अर्सेनिकमुळे होणारे विकार (यांचे प्रमाण पश्चिम बंगाल मध्ये अधिक आहे). ब्लॅक-टी या वनस्पतीतील पॉलिफिनॉल आणि थिआफ्लेविन आणि थिआअरुबिजिन यांचा उत्परिवर्तन प्रतिबंधक आणि कर्करोग प्रतिबंधक परिणामांचा अभ्यास या विभागात केला जातो. मानवी पचनसंस्थेतील अंत:त्वचा व्हिब्रिओ कॉलरी संसर्गाशी कसा परिणाम करते याचे या विभागातील संशोधन जवळ जवळ पूर्ण झाले आहे.

(५) कार्बनी आणि औषधी रसायनविज्ञान :  औषधी वनस्पतीतील घटक वेगळे करणे, त्यांचा परिणाम शोधणे आणि शक्य झाल्यास त्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करणे. जीवाणू किंवा विषाणूंची वाढ थांबवणे किंवा त्यांचा कर्करोग प्रतिबंधक उपयोग करणे. नव्या ग्लायकोबायोलोजी आणि ग्लायको सायन्स शाखेतील आजपर्यंत वापरात न आलेल्या रेणूंचा परिणाम पाहणे. प्रति-हत्तीरोग व प्रति-लेशमानिया म्हणून क्विनोलीन गटातील रेणू वापरणे असे नवे प्रयोग या प्रयोगशाळेत केले जातात.

कळीचे शब्द : #कर्करोग #संसर्गजन्य रोग #संशोधन संस्था

संदर्भ :

समीक्षक : किशोर कुलकर्णी