प्राचीन मानवी जाती (स्पीशीझ). अवघ्या काही दशकांपूर्वी मानवी उत्क्रांतीच्या चर्चेत आधुनिक मानव ही एकमेव मानवी जात काही लक्ष वर्षांपासून अस्तित्वात असल्याचे मानले जात होते. रशियातील अल्ताई पर्वतरांगेत असलेल्या डेनिसोव्हा गुहेत मिळालेले मानवी जीवाश्म हे वेगळया जातीचे असल्याचे सिद्ध झाल्यानंतर डेनिसोव्हा मानव ही आणखी एक जात उजेडात आली. तथापि या जातीचे मानव निअँडरथल मानव व आधुनिक मानव यांच्याबरोबरीने अस्तित्वात असल्याने मानवी उत्क्रांतीच्या कहाणीत वाढलेली गुंतागुंत आणखी एका जातीमुळे अधिकच वाढली आहे. या नवीन जातीला सन २०२४ मध्ये जुलूएन मानव (Homo juluensis) असे नाव देण्यात आले असून या नावाचा अर्थ ‘मोठ्या डोक्याचा मानव’ असा आहे.

जुलूएन मानवाचे जीवाश्म

चीनमध्ये सापडलेल्या एका मोठ्या कवटीवर ही जात आधारित आहे. ही जाती ३,००,००० वर्षांपूर्वी पूर्व आशियामध्ये अस्तित्वात होती आणि सु. ५०,००० वर्षांपूर्वी गायब होण्यापूर्वी जगण्यासाठी दगडी हत्यारे बनवीत होती, प्राण्यांच्या कातड्यांवर प्रक्रिया करत होती, त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे अस्तित्व टिकून राहण्यास मदत होत असावी, असे काही संशोधकांचे निष्कर्ष आढळतात.

जुलूएन मानवाचे जीवाश्म सर्वांत आधी चीनच्या उत्तर मध्य भागातील शान्सी (Shanxi) प्रांतातील झुजियाओ (Xujiayao) या पुरातत्त्वीय स्थळावर मिळाले होते (१९७६). नंतरही झुजियाओ येथे अनेकदा उत्खनने झाली (१९७७, १९७९, २००७, २००८). या ठिकाणी एकूण २० जीवाश्म मिळाले. तथापि अनेक वर्षे त्यांचे वर्गीकरण कोणत्या जातीत करायचे हे निश्चित होत नव्हते. मात्र २०२४ मध्ये चिनी पुराजीववैज्ञानिक झिउजी वू (Xiu-Jie Wu) आणि ख्रिस्तोफर जे बे (Christopher J Bae) यांनी चीनमधील झुजियाओ आणि झूचांग (Xuchang) या ठिकाणी आधी मिळालेल्या जीवाश्मांचा नव्याने अभ्यास करून जुलूएन मानव ही नवी जात सुचवली. झिउजी वू या चिनी विज्ञान अकॅडमीमध्ये पुराजीववैज्ञानिक म्हणून काम करतात, तर ख्रिस्तोफर जे बे हे अमेरिकेत होनोलूलू (मानोआ) येथील हवाई विद्यापीठामध्ये मानववंशशास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत.

झूचांग हे स्थळ झुजियाओ या पुरातत्त्वीय स्थळाच्या दक्षिणेस ६५० किमी. अंतरावर असून तेथे मिळालेले अवशेष मोठ्या डोक्याच्या मानवांचे असल्याचे दिसते. झूचांग-१ या कवटीचे आकारमान १८०० घ. सेंमी. तर झुजियाओ-६ या कवटीचे आकारमान १७०० घ. सेंमी. आढळले आहे. हे आकारमान निअँडरथल मानवांच्या कवटीच्या आकारापेक्षा (१०६५ ते १७४० घ. सेंमी.) जास्त आहे.

झुजियाओ या ठिकाणी जुलूएन मानवाच्या जीवाश्मांबरोबरच प्राण्यांचे जीवाश्मही मोठ्या प्रमाणात (५०००) मिळाले असून त्यांत १९ जातींचा समावेश आहे. त्यांच्यातील बहुसंख्य जीवाश्मांवर हाडे तोडल्याच्या व कापल्याच्या खुणा आहेत. उपलब्ध पुराव्यांवरून असे दिसते की, जुलूएन मानव शिकार करत होते. शिकार केलेल्या प्राण्यांमध्ये प्रझेवाल्स्की या प्रजातीचे रानघोडे (Przewalski’s Horse,  मंगोलियन रानघोडे) आणि रानगाढवांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या ठिकाणी मिळालेल्या पुरावशेषात (३००००) दगडांची अनेक अवजारे असून त्यांत १००० पेक्षा जास्त गोल गोटे आढळले. बहुधा रानघोडे व रानगाढव अशा मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी ते फेकून मारले जात असावेत.

जुलूएन मानवांच्या एकूण उपलब्ध जीवाश्म अस्थींची तुलना इतर जीवाश्मांशी केल्यावर असे दिसते की, झुजियाओ व झूचांग येथील मानवांच्यात काही अप्रगत तर काही अधिक प्रगत नवीन शारीरिक वैशिष्ट्ये असल्याने त्यांचा समावेश इरेक्टस मानव, निअँडरथल मानव अथवा बोडो मानव अशा कोणत्याही गटात करता येत नाही. दात व कवटीची रचना काही प्रमाणात निअँडरथल मानवांच्या कवटीप्रमाणे आहे, तर काही वैशिष्ट्ये आधुनिक मानवांप्रमाणे दिसतात. त्यामुळे जुलूएन मानवांचे मानवी उत्क्रांतीच्या वृक्षावरील नेमके स्थान निश्चित झालेले नाही.

संदर्भ :

  • Bae, C. J., The Paleoanthropology of Eastern Asia, University of Hawaii Press, Honolulu, 2024.
  • Norton, C. J.; Gao, X., ‘Hominin-carnivore interactions during the Chinese Early Paleolithic: Taphonomic perspectives from Xujiayao’, Journal of Human Evolution, Vol. 55, pp. 164-178, 2008. https://doi.org/10.1016/j.jhevol.2008.02.006
  • Wu, Xiujie ; Bae, C. J., ‘Xujiayao Homo: A New Form of Large Brained Hominin in Eastern Asia, Paleoanthropology, 2024.
  • चित्रसंदर्भ : जुलूएन मानवाचे जीवाश्म (संदर्भः झिउजी वू आणि ख्रिस्तोफर बे, २०२४)

समीक्षक : मनीषा पोळ


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.