अभिजात शास्त्रीय नृत्यप्रकार आणि नाट्यप्रकारांचे प्रशिक्षण देणारी भारतातील एक प्रमुख संस्था. या संस्थेला केंद्रशासनाच्या विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अभिमत (डीम्ड) विद्यापीठाचा दर्जा मिळालेला आहे (२००६). या संस्थेची स्थापना आधुनिक मलयाळम् साहित्यातील महान कवित्रयींपैकी एक कवी व मोहिनीआट्टम्, कथकळी या नृत्यांचे पुनरुद्धारक वळ्ळत्तोळ नारायण मेनन यांनी १९३० साली केली.

भारतामध्ये ब्रिटिशांच्या आगमनानंतर स्वातंत्र्यपूर्व काळात राजाश्रय संपुष्टात आल्याने केरळच्या पारंपरिक नृत्य व नाट्य यांचा समावेश असलेल्या कलांचे परंपरागत स्वरूप नष्ट झाले आणि त्यांना उत्तान व बेगडी स्वरूप प्राप्त झाले. या कलांना पुन्हा पूर्वीची प्रतिष्ठा मिळावी आणि त्यांचे संवर्धन, जतन व्हावे म्हणून वळ्ळत्तोळ मेनन यांनी कलामंडलम ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या संस्थेच्या स्थापनेत तेथील धनिक व राजघराण्याचे सदस्य असलेल्या मनक्कुलम मुकुंद राजा आणि कुंजुन्नी थंबुरान (कक्कद करनवप्पद) यांचे त्यांना खूप पाठबळ मिळाले. सुरुवातीस संस्थेचे कामकाज कलापारखी असलेल्या कुंजुन्नी थंबुरान यांच्या वाड्यामध्ये चालू झाले. सहा महिन्यांनी मुकुंद राजा यांच्या अंबालापुरम येथील श्रीनिवास या बंगल्यामध्ये ही संस्था नेण्यात आली. कोचीनच्या महाराजांनी १९३६ साली या संस्थेला जागा दिली आणि त्रिसूर (त्रिचूर) जिल्ह्यातील चॅरुतुरुत्ती या छोट्या गावामध्ये ही संस्था स्वत:च्या जागेत वसली.

केरळच्या प्राचीन कला वारशाचे जतन करणे हे कलामंडलमचे उद्दिष्ट आहे. केरळच्या पारंपरिक कलेच्या सर्व क्षेत्रांमधील सांस्कृतिक परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी आणि त्या समृद्ध करण्यासाठी; सक्षम तसेच अष्टपैलू कलाकारांच्या निर्मितीसाठी; येथील विविध कला क्षेत्रांमध्ये ज्ञानाचे उच्च शिक्षण निर्माण करण्यासाठी व केरळच्या संस्कृतीवर आणि कला सादरीकरणावर सैद्धांतिक आणि व्यावहारिक संशोधनाची परंपरा विकसित करण्याच्या हेतूने या संस्थेची स्थापना करण्यात आली. येथे भारतात परंपरागत चालत आलेल्या गुरुकुल शिक्षण पद्धतीद्वारे भारतीय कला सादरीकरणाचे अध्यापन केले जाते. ‘‘नवीन युगातल्या ज्ञानाची भावना आत्मसात करून पारंपरिक पद्धतीने एक मजबूत शिक्षण प्रणाली तयार करा.’’ हे या संस्थेचे बोधवाक्य आहे.

कलामंडलममध्ये सुरुवातीला मोहिनीआट्टम् या नृत्यप्रकाराचे पुनरुज्जीवन करण्याच्या हेतूने प्रशिक्षण देण्याकरिता वळ्ळत्तोळ यांनी या कलेतील पारंगत स्त्रियांना संस्थेमध्ये बोलाविले व प्रतिष्ठित घरातील मुलींना त्यांना शिक्षण द्यायला लावले. यानंतर कथकळी हा नृत्यप्रकार आणि कुडियाट्टम् या पुरातन संस्कृत नाटकांची पार्श्वभूमी असलेल्या नाट्यप्रकाराच्या प्रशिक्षणासही संस्थेमध्ये सुरुवात करण्यात आली. अशारीतीने कलामंडलमच्या स्थापनेमुळे केरळमधील तीन प्रमुख शास्त्रीय कलाकृतींना पुनरुज्जीवन मिळाले. सुरुवातीच्या दिवसांत संस्थेमध्ये तकाझी कुंजू कुरुप्पू, कोप्पन नय्यर, पट्टीकमथोडी रवुन्नी मेनन, तिरुविल्लवामाला वेंकचन स्वामी, मुंडया वेंकटकृष्ण भागवतर, थोट्टासेरी चिन्नमू अम्मा यांसारख्या या क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी विद्यार्थ्यांना शिकविले.

१९७५ मध्ये कलामंडलमने अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १९९० मध्ये विविध कलाविषयांच्या प्रशिक्षणाबरोबरच इयत्ता आठवीपासूनचे शालेय शिक्षणाचे वर्गही येथे सुरू झाले. सद्यस्थितीत केरळ कलामंडलममध्ये (१) रंगभूमी व पारंपरिक कला, (२) संगीत, (३) नृत्य व (४) मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे या चार प्रमुख विद्याशाखांमधून विविध कलाप्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते. ते पुढीलप्रमाणे – (१) रंगभूमी व पारंपरिक कला या विद्याशाखेमधून कथकळी वडक्कन शैली, कथकळी थेक्कन शैली, कथकळी संगीत, थूल्लाल व कूटियाट्टम हे नृत्यनाट्यप्रकार, यांसाठी जी रंगभूषा व वेशभूषा केली जाते ती ‘चुट्टी’; कथकळी चेंडा, मड्डलम (मदालम), मिझावू, थिमिला हे तालवाद्यप्रकार; पंचवाद्यम् हा पाच पारंपरिक तालवाद्यांचा ऑर्केस्ट्रा या कलाप्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते. (२) संगीत या विद्याशाखेमधून कर्नाटक संगीत, मृदंगवादन व व्हायोलिनवादन याचे प्रशिक्षण दिले जाते. (३) नृत्य या विद्याशाखेमधून मोहिनाआट्टम्, भरतनाट्यम्, कूचिपूडी या नृत्यप्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते; तर (४) मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे या विद्याशाखेमधून संस्कृत, मलयाळम् व इंग्लिश या भाषांचे शिक्षण दिले जाते. या सर्व विद्याशाखांमध्ये कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासह पदवी, पदव्युत्तर, एम.फील., पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमांमधून केरळ, भारत व भारताबाहेरील अनेक कलावंत आणि कलाप्रेमी विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.

केरळ कलामंडलम या विद्यापीठाच्या कुलपती पद्मभूषण डॉ. मल्लिका साराभाई या असून साजी चेरियन हे प्रति कुलपती आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. बी. अनंतकृष्णन हे आहेत. विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळावर केरळमधील नृत्य व नाट्याशी संबंधित दिग्गज कलाकार मंडळी आहेत.

कलामंडलमच्या समृद्ध ग्रंथालयामध्ये विविध कलाप्रकारांशी निगडित अशी अनेक दुर्मीळ हस्तलिखिते, ग्रंथ, नृत्यनाट्य, वाद्य व वादन इत्यादींची माहिती देणाऱ्या अनेक दृकश्राव्यफिती आहेत. संस्थेमध्ये गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जात असल्याने येथे विद्यार्थ्यांसाठी निवासाची व भोजनाची सोय आहे. येथे विविध निमित्ताने वर्षभर नृत्य व नाट्याशी संबंधित अनेक कार्यक्रम होत असतात. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना व्यासपीठ तर मिळतेच. त्याचबरोबर या कलाप्रकारांशी संबंधित देशविदेशातील अनेक कलाकार या व्यासपीठावर आपली कला सादर करतात. यासाठी संस्थेचे स्वत:चे सुसज्ज असे ‘कुटम्बलम्’ हे सभागृह आहे. याची रचना नाट्यशास्त्रातील निर्देशानुसार केलेली असून सभागृहात असलेल्या काळ्या ग्रॅनाईटातील १०८ स्तंभावर वेगवेगळ्या नृत्यमुद्रांची शिल्पे दर्शविली आहेत. संस्थेच्या परिसरात कवी वळ्ळत्तोळ मेनन यांचे प्रकाशित व अप्रकाशित साहित्य, त्यांच्या कविता, पत्रे, छायाचित्रे, हस्तलिखिते, वैयक्तिक वस्तू इत्यादींचा संग्रह असलेले ‘वळ्ळत्तोळ संग्रहालय’ आहे.

२०१० मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने कलामंडलमला ‘अ’ मानांकन दिले. कूडियाट्टम् या नृत्यनाट्यप्रकारास यूनेस्कोने मौखिक आणि अमूर्त वारशाचा पारंपरिक रंगभूमीचा उत्कृष्ट भारतीय प्रकार म्हणून मान्यता दिलेली आहे. याचे जतन आणि संवर्धन येथे केले जाते.

कलामंडलमने केरळच्या पारंपरिक कलेशी संबंधित अशी नृत्य, नाट्य व रंगभूषा-वेशभूषा, नेपथ्य यांची माहिती असणारी खालील पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. यामध्ये लीला नंबूथिरीपाद यांचे ‘कलामंडलम हिस्ट्री’; राजशेखरन यांचे ‘कथकली थेक्कनचित्ता’; पद्मनाभन नायर यांचे ‘चोल्लीअट्टम’; पी.एम.राममोहन यांचे ‘नेपाध्याम’; शंकर वारियार यांचे ‘मद्दलमेण्णा मंगलवाद्यम्’ इत्यादींचा समावेश आहे.

केरळ कलामंडलममध्ये शिक्षण घेऊन विविध कलाक्षेत्रात प्रसिद्ध झालेल्या काही विद्यार्थ्यांमध्ये कलामंडलम गोपी, कलामंडलम हैदर अली, आर.एल.व्ही.रामकृष्णन, कलामंडलम कृष्णन नायर, के. कल्याणीकुट्टी अम्मा, रमणकुट्टी नायर, कलामंडलम क्षेमवती या काही प्रमुख भारतीय कलावंतांचा समावेश आहे. याशिवाय यूजेनियो बार्बा, पीटर ब्रूक, जेर्झी ग्रोटोवस्की यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या कलावंतांनीही येथे प्रशिक्षण घेतलेले आहे.

आज केरळ कलामंडलम हे विद्यापीठ केरळच्या कलात्मक तेजाचे दीपस्तंभ म्हणून उभे आहे, जे पारंपरिक भारतीय प्रामुख्याने केरळच्या कलेचे, सादरीकरणाचे जतन आणि संवर्धन करते. या विद्यापीठाने प्रशिक्षण, प्रदर्शन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांच्या माध्यमातून केवळ या कलाप्रकारांना जिवंतच ठेवले नाही तर भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीलाही समृद्ध केलेले आहे.

 

संदर्भ :

  • www.kalamandalam.ac.in
  • Leela Namboothiripad, Kalamandalam History, Kerala Kalamandalam, Thrissur, 1956.

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.