एक प्रसिद्ध शिवरूप. शिव आणि विष्णूचे एकाच देहात उभयरूप म्हणजे हरिहर. त्यासंबंधी अनेक कथा लोकमानसात प्रचलित आहेत. ‘पद्मपुराण’ असे सांगते की, सृष्टीची उत्पत्ती करणारा ब्रह्मा आणि स्त्रीयोनीस्वरूपात असलेल्या जनार्दनाचे एकत्रित रूप म्हणजे शिवलिंग होय. ‘वायुपुराण’ असे सांगते की, सर्वप्रथम लिंगाचा उद्भव झाला, त्याचा समागम हा विष्णूच्या रूपात दिसलेल्या स्त्रीशी झाला आणि त्यातून हिरण्मयाचा जन्म झाला, त्यापासून पुढे ब्रह्मदेव व सकल सृष्टीची निर्मिती झाली. ‘वायुपुराणा’त पुढे असेही सांगितले आहे की विष्णूचे अस्तित्व हे शिवाच्या डाव्या बाजूस असले पाहिजे. येथे उमा किंवा पार्वतीचे स्थान विष्णू घेतो, त्यामुळे विष्णूला ‘प्रकृति’, ‘ज्ञान’, ‘यज्ञफल’ आणि शिवाला ‘पुरुष’, ‘ज्ञेय’, ‘अनृत’, ‘यज्ञ’ अशी विविध नावे प्राप्त झाली.

‘वामनपुराणा’त विष्णू एका ऋषीला सांगतो की, मी आणि शिव हे एकच आहोत. एवढ्यावर न थांबता विष्णू या अद्वैताचे प्रत्यक्ष दर्शनही घडवतो. ‘भागवतपुराणा’त असा उल्लेख आहे की, विष्णूच्या मोहिनीरूपावर शिवदेखील मोहित झाला. दक्षिण भारतातील समजुतीनुसार शास्ता ऊर्फ ‘अव्य’ हा शिव आणि मोहिनी यांचा पुत्र होय. त्याला ‘हरिहरपुत्र’ असेही म्हणतात; तो मल्याळी लोकांचा रक्षणकर्ता समजला जातो.
मध्ययुगाच्या प्रारंभी शैव आणि वैष्णव पंथीयांमध्ये कायम तेढ, स्पर्धा असे आणि त्याचे पर्यवसान संघर्षात झालेले पाहावयास मिळते. या दोन्ही भिन्न विचारप्रणालीच्या अनुयायांमध्ये सामंजस्य घडवून आणण्याचे अनेक प्रयत्न झाले. त्याचेच एक फलित म्हणजे शिव आणि विष्णू यांची संयुक्त प्रतिमा होय. विश्वाची लय बिघडू न देण्यासाठी शिव आणि विष्णू या दोहोंची आवश्यकता आहे हेच हरिहर प्रतिमा दर्शविते.
अर्धनारीश्वर प्रतिमेप्रमाणे हरिहर प्रतिमासुद्धा उभ्या लंबरेषेने विभागलेल्या असतात. साधारणत: उजवी बाजू शिवस्वरूप असून डावी बाजू विष्णुरूपी असते. शिवरूपात जटामुकुट, चंद्रकोर, त्रिशूळ, परशु, नाग इ. शिवाच्या आयुध-अलंकारांचे चित्रण असते, तर विष्णुरूपाचे अंकन किरीटमुकुट, मकरकुंडले, शंख, चक्र, गदा या सर्वांसह केलेले दिसते. त्यांची वाहने-अनुक्रमे नंदी आणि गरुड योग्य ठिकाणी दर्शविली जातात; क्वचित शिवासह पार्वती आणि विष्णुसह लक्ष्मी याही दाखविल्या जातात. ‘अग्निपुराण’, ‘मत्स्यपुराण’, ‘विष्णुधर्मोत्तरपुराण’, ‘अभिलाषितार्थ चिंतामणी’, ‘पूर्वकारणागम’, ‘उत्तरकारणागम’ अशा अनेक ग्रंथांत हरिहर प्रतिमा कशी असावी याचे वर्णन केलेले आहे. ‘अभिलाषितार्थ चिंतामणी’नुसार हरीच्या हातात शंख, चक्र, गदा असावी, तर हर म्हणजेच शिवाच्या एका हातात शूल व एक हात वरदमुद्रेत असावा. त्याच्या जटेत चंद्रकोर असावी व विष्णूच्या कानात मकरकुंडल आणि डोक्यावर रत्नमुकुट असावा असे सांगितले आहे. ‘अग्निपुराणा’नुसार हातात शूल, तलवार, अक्षमाला/डमरू (शिव), आणि गदा, चक्र (विष्णू) असावेत; सोबत गौरी आणि लक्ष्मीदेखील असाव्यात. ‘चतुर्वर्गचिंतामणी’, ‘रूपमंडन’, आणि ‘विष्णुधर्मोत्तरपुराण’ या ग्रंथांत वाहन म्हणून नंदी आणि गरुडाचाही उल्लेख आहे.
हरिहराच्या संयुक्त प्रतिमा इसवी सनाच्या चौथ्या शतकानंतर भारतभर सर्वत्र घडविलेल्या दिसतात. विदिशा (मध्यप्रदेश) येथील प्रतिमा सर्वांत प्राचीन समजली जाते. मात्र तिचे चारही हात भग्न झालेले आहेत. याच काळातील एक प्रतिमा कोलकात्याच्या (कलकत्ता) बिर्ला अकादमी वस्तुसंग्रहालयात आहे. ही चतुर्भुज असून तिच्या वरील दोन हातांत त्रिशूळ व चक्र धारण केले आहेत, तर खालील हातांत अक्षमाला आणि शंख आहेत. या मूर्तीचे शिरोभूषण उल्लेखनीय आहे, त्याचा अर्धा उजवा भाग जटास्वरूप असून त्यावर चंद्रकोरही दिसते, तर डावा भाग मुकुटस्वरूप असून त्यावर सिंहमुख आहे. विदिशा येथील प्रतिमेप्रमाणे हीदेखील ऊर्ध्वलिंगी आहे. बादामीच्या लेण्यांमधील हरिहर प्रतिमा ही हर्यार्ध किंवा शंकर-नारायण या नावानेही ओळखली जाते. ही चतुर्भुज प्रतिमा समभंग स्थितीत उभी आहे. उजवीकडील शिवस्वरूपाच्या डोक्यावर जटामुकुट, कानात सर्पकुंडले, हातात नागवेष्टित परशू आणि अभयमुद्रा; तर विष्णुरूपाच्या डोक्यावर किरीटमुकुट, कानात मकरकुंडले, एका हातात शंख तर एक हात कमरेवर आहे. डोक्यामागे प्रभावळ आहे. उजव्या बाजूला नंदी आणि त्यापलीकडे पार्वती तर डावीकडे गरुड आणि त्यापलीकडे लक्ष्मी यांचे अंकन आहे. या प्रतिमेखाली शिल्पपट्टावर नाचणारे गण आहेत.
अलाहाबाद वस्तुसंग्रहालयात एक वैशिष्ट्यपूर्ण हरिहर मूर्ती आहे. ही गुप्त काळातील असून तिच्या आयुधांपैकी त्रिशूळ व चक्र हे मानवस्वरूपात (आयुधपुरुष) दिसतात. बर्लिन येथील भारतीय कला वस्तुसंग्रहालयात एक सुरेख व उल्लेखनीय हरिहर प्रतिमा आहे. ही मुळची नवव्या शतकातील काश्मीरमधील प्रतिमा असून तिला सहा हात व तीन मुखे आहेत. त्यांपैकी उजवीकडील मुख शिवाचे, मधले विष्णूचे आणि डावीकडील वराहाचे आहे. मात्र सहा हातांपैकी उजवीकडील त्रिशूलपुरुषाच्या डोक्यावर ठेवलेला हातच फक्त शिल्लक आहे. या त्रिशूलपुरुषाच्या हातातही त्रिशूळ आहे. हरिहराच्या दोन पायांच्या मध्ये एक स्त्रीप्रतिमा आहे. ती बहुदा पृथ्वी असावी. खिद्रापूर (जि. कोल्हापूर, महाराष्ट्र) येथील कोप्पेश्वर मंदिराच्या बाह्यांगावर एक सुरेख हरिहर प्रतिमा आढळते. ती पद्मासनात बसलेली असून चतुर्भुज आहे. मागील उजव्या व डाव्या हातात अनुक्रमे त्रिशूळ व गदा असून अक्षमाला धारण केलेला पुढचा उजवा हात अभयमुद्रेत आहे; तर पुढील डाव्या हातात चक्र आहे. अलंकारांमध्ये वैविध्य नसले तरी हरिरूपी विष्णूचे सौम्य भाव आणि हररूपी शिवाचे तीव्र भाव या प्रतिमेच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतात.
संदर्भ :
- Kramrisch, Stella, Manifestations of Shiva, Philadelphia Museum of Art, Philadelphia, 1981.
- Rao, T. A. G., Elements of Hindu Iconography, Vol. II, Part I, Motilal Banarsidass Publishers Pvt. Ltd., Delhi, 1914; 1997.
- खरे, ग. ह., ‘मूर्तिविज्ञान’. भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९३९; २०१२.
- जोशी, नी. पु., ‘भारतीय मूर्तिशास्त्र’, प्रसाद प्रकाशन, पुणे, १९७९; २०१३.
- देगलूरकर, गो. बं., ‘शिवमूर्तये नमः’, स्नेहल प्रकाशन, पुणे, २०१४.
समीक्षक : श्रीकांत गणवीर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.