भारताला ८,००० किमी. हून अधिक लांबीचा जैवविविधतेने समृद्ध असा सागरकिनारा लाभलेला आहे. हा किनारा मत्स्योत्पादनाचा शाश्वत स्रोत तर आहेच, परंतु हे उथळ किनारे इतर विविध प्रकारच्या समुद्री जीवांसोबत, समुद्री कच्छपांसाठीही भक्ष्यपूर्ती आणि प्रजोत्पादनासाठी महत्त्वाच्या जागा आहेत. भारतामध्ये किनारी भाग आणि समुद्री बेटांवर पाच प्रजातींच्या कच्छपांचे अस्तित्व आढळते. त्यांची नावे पुढीलप्रमाणे : ऑलिव्ह रिडले (लेपिडोचेलीस ऑलिव्हेशिया), हॉक्सबिल (एरीटमोचेलीस इम्ब्रिकाटा), लॉगरहेड (कॅरेटा कॅरेटा) आणि लेदरबॅक (डर्मोचेलीस कोरीआशिया) अशी आहेत. यांपैकी लॉगरहेड कच्छप वगळता उर्वरित चार प्रजाती भारतीय किनाऱ्यांवर अंडी घालण्यासाठी वाळूत घरटी करतात.

आहार : जल कच्छपांची वर्तणूक तसेच जीवनक्रमावर प्रभाव टाकणाऱ्या नैसर्गिक घटकांबद्दल अजून फारसे काही ज्ञात नसले, तरी हे जीव अन्नसाखळीत मोलाची भूमिका बजावतात एवढे मात्र निश्चित आहे. त्यांचा आहार मिश्र प्रकारचा आहे. त्यात पफर मासा, कवचधारी प्राणी, स्पंज व टुनिकेटसारख्या मृदुकाय जीवांसोबतच समुद्री गवत व शैवालाचाही समावेश होतो. कच्छपांच्या असाधारण खाद्य सवयीमुळे, समुद्री गवताने अत्यंत समृद्ध अशा समुद्री अधिवासातून समुद्राकाठच्या बेरड वाळूपर्यंत, विविध पोषकतत्त्वांचे आपसूकच वहन होते आणि यातून कच्छप पोषकतत्त्वांची समुद्रातून जमिनीकडे फिरवण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडतात.

प्रजनन : ऑक्टोबर ते एप्रिल या दरम्यान भारताच्या पूर्व किनारपट्टीवरच्या ओदिशा राज्याच्या किनाऱ्यांवर, ऑलिव्ह रिडले जातीची कच्छपे फार मोठ्या प्रमाणात अंडी घालण्यासाठी येतात. या जातीच्या कच्छपांचे हे जगातील सर्वांत मोठ्या संमेलनांपैकी एक संमेलन असून याला स्थानिक भाषेत ‘अरिबाडा’ असे म्हणतात. या कच्छपांच्या जगभरात असलेल्या विविध प्रजनन स्थानांपैकी तीन महत्त्वाची प्रजनन स्थाने ओदिशामध्येच आहेत आणि ही तिन्ही ठिकाणे मिळून सहा लाखांपेक्षा अधिक कच्छपे इथे या काळात अंडी घालण्यासाठी येतात. यामुळेच या कासवांच्या जागतिक पातळीवरील संवर्धनाच्या दृष्टीने हे किनारे अत्यंत महत्त्वाचे आहेत.
समुद्री कच्छपांचा इतिहास पाहिला तर सुमारे १२ कोटी वर्षांपासून त्यांचे अस्तित्व आहे. आजमितीला या कच्छपांच्या जगभरात एकूण सात प्रजाती असल्या तरी खूप पूर्वी याहून अधिक प्रजाती होत्या ज्या काळाच्या ओघात नष्ट झाल्या.

शरीररचना : कच्छपांचा समावेश सरीसृपांच्या वर्गात होतो, ज्यामध्ये साप, सरडे, पाली, मगरी अशा जीवांचा समावेश होतो. या वर्गाची प्रमुख शारीरिक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :
१) खवलेदार त्वचा : याच्या साहाय्याने शरीरातील आर्द्रता योग्य प्रमाणात राखली जाते.
२) अनियततापी : सरीसृप वर्गातील सजीवांचे तापमान परिसरानुरूप बदलते. त्यांना  बाह्य उष्णता स्रोताच्या मदतीने शरीराचे तापमान कमी अधिक करावे लागते.
३) सर्व सरीसृपांमध्ये श्वसनासाठी  फुफ्फुसे आढळतात ज्यांच्या साहाय्याने ते मुक्त हवेतील ऑक्सिजन घेतात.
४) अंडज : काही अपवाद सोडले तर बहुतांशी सरीसृप अंड्यांद्वारे प्रजनन करतात.

आ. १. टेस्टुडियन उपवर्ग

सरीसृप वर्गातील शरीरावर कवच असणाऱ्या सजीवांचा वेगळा टेस्टुडियन नावाचा उपवर्ग केला आहे. अशा सजीवांना मराठीत सरसकट कच्छप किंवा कासव म्हणतात. या उपवर्गात तीन मुख्य प्रकाराची कासवे आहेत. इंग्लिशमध्ये टर्टल (turtle), टेरापीन (terrapin) आणि टॉर्टीस (tortoise) असे म्हणतात. या सर्वांच्या मिळून जगभरात ३१० प्रजाती आहेत.

१) टर्टल : समुद्री कच्छपांना टर्टल असे म्हणतात. अंडी घालण्याचा काळ सोडल्यास ही कच्छपे समुद्र सोडून जमिनीवर अगदी क्वचितच येतात. यांचे पाय वल्ह्यासारखे चपटे असतात. यांना मराठीत जलकच्छप असे नाव दिले आहे. यांचे शरीर पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित झाले आहे.
२) टेरापीन : गोड्या पाण्यातील कच्छपांना टेरापीन असे म्हणतात. ही कच्छपे मुख्यत्वे पाणी व काही प्रमाणात जमीन अशा दोन्ही ठिकाणी वावरतात. यांच्या पायांच्या बोटांना जोडणारी एक पातळ त्वचा असते तसेच बोटांना नखेही असतात.
३) टॉर्टीस : कोरड्या जमिनीवर राहणाऱ्या कासवांना टॉर्टीस असे म्हणतात. यांचे पाय काहीसे चपटे असून जमिनीवर चालण्यास अनुकूलित असतात.

सर्व कच्छपांना शरीराच्या वर आणि खाली कठीण कवच असते. काही प्रजातींमध्ये ते जाड त्वचेसारखे असते तर काहींमध्ये ते ढालीसारखे टणक असते. समुद्री कच्छपांची दृष्टी जमिनीवर जरी अधू असली तरी पाण्यात ती उत्कृष्ट काम करते. त्यांना अतिनील किरणांच्या माध्यमातून रंग, रचना, आकार आदी ओळखता येतात. या कच्छपांना जरी बाह्यदर्शी कान नसले, तरी त्यांना कमी वारंवारतेच्या ध्वनिलहरी ऐकू येतात हे प्रयोगांमधून समजले आहे. तसेच खोल समुद्रात शिरताना त्यांना पाण्याचा दाब समजण्यासाठी आणि जवळपास होणारी धोकादायक हालचाल ओळखण्यासाठी या अंतःकर्णांचा उपयोग होतो. या कच्छपांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, ती पाण्यात असताना नाकपुड्या फेंदारतात आणि तोंडाची उघडझाप करून घशातून नाकाच्या दिशेने पाणी ढकलतात. नाकामध्ये असलेल्या संवेदनाग्रंथी या पाण्यात विरघळलेल्या गंधांची त्यांच्या मेंदूला ओळख करून देतात. या क्रियेला ‘कंठ श्वसन’ (Throat pumping) असे म्हणतात.
समुद्री कच्छपांचे वैशिष्ट्य म्हणजे ठराविक वर्षांनी ती जन्मस्थळी अचूकपणे पोहोचतात. नर आणि मादी अशा दोघांमध्येही ही क्षमता असते. याची एक शक्यता अशी आहे की, अंड्यातून बाहेर पडलेले पिल्लू किनाऱ्यावरून जेव्हा समुद्रात शिरते, तेव्हा ते आपल्या स्थानाचा व प्रवासाचा चुंबकीय नकाशा आपल्या मेंदूत नोंदवून ठेवते. पक्षी स्थलांतरादरम्यान अशा चुंबकीय नकाशांचा वापर करीत असल्याचे प्रयोगातून सिद्ध झालेले आहे. याचसोबत सागरी कच्छपांच्या हजारो लाखो माद्यांनी एकाच वेळी एकाच किनाऱ्याकडे प्रस्थान करणे यातून त्यांना कालमापनाचेही अचूक भान असावे असा अंदाज बांधता येतो.

आ. २. समुद्री कच्छप : जीवनक्रम

समुद्री कच्छपांचा जीवनक्रम : समुद्री कच्छपांचा थोडक्यात जीवनक्रम पुढीलप्रमाणे :

  • मादी किनाऱ्यावर येऊन वाळूत खड्डा खणते आणि त्यात १०० ते २०० अंडी घालते. त्यानंतर समुद्रात निघून जाते.
  • ४० – ६० दिवसांत अंडी फलित होऊन त्यातून पिले बाहेर पडतात.
    पिले जन्मापासूनच स्वतंत्र असतात आणि ती आपल्या जन्मदात्यांना कधीच भेटत नाहीत.
  • बाहेर पडलेलं पिल्लू शक्य तितक्या वेगाने समुद्राच्या दिशेने खुरडत जाते. पाण्यात शिरेपर्यंत त्याची पक्षी व प्राण्यांकडून शिकार होते.
  • समुद्रात शिरलेली पिले पाण्यावर तरंगणाऱ्या शैवालाच्या आश्रयाने राहतात आणि अशा वेळी त्यात राहणारे छोटे जीव हे त्यांचे अन्न असते.
  • काही वर्षांनंतर पौगंडावस्थेतील पिले किनाऱ्याच्या दिशेने सरकतात. प्रौढावस्थेत पोहोचेपर्यंत त्यांना सु. ३० वर्षांचा कालावधी लागतो.
  • प्रौढ कच्छपे आपल्या चराऊ क्षेत्रातून प्रजनन क्षेत्राकडे प्रस्थान करतात आणि प्रणयक्रीडेनंतर परत चराऊ क्षेत्राकडे येतात.
  • माद्या दर २-३ वर्षांनी आपल्या जन्मस्थळी अंडी घालण्यासाठी येतात.
  • समुद्री कच्छपांचा प्रौढत्व गाठण्याचा दर हजार पिलांपैकी एक इतका कमी आहे.
  • मादीने घातलेल्या अंड्यांमध्ये बहुपितृत्व असू शकते कारण मादी अनेक नरांचे शुक्राणू अंडाशयामध्ये सुरक्षित साठवून ठेऊ शकते.

भारताच्या सभोवती असलेल्या अरबी समुद्र तसेच प्रशांत महासागराच्या हद्दीत सहा प्रकारची समुद्री कच्छपे आढळतात. विविध देशांच्या आढळणारी त्यांची संख्याही वेगवेगळी आहे. जसे की ग्रीन सी टर्टल आणि हॉक्सबील टर्टल या प्रजाती मालदीव आणि केन्याच्या किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात आढळतात तर ओमानच्या किनाऱ्यावरती लॉगरहेड कासवांची सर्वांत मोठी जननभूमी आहे. ऑलिव्ह रिडले भारताच्या किनाऱ्यांवर मोठ्या संख्येने जननासाठी येतात तर लेदरबॅक कच्छपे दक्षिण आफ्रिका, मोझँबीक आणि अंदमान-निकोबारचे किनारे पसंद करतात. चपटपृष्ठीय समुद्री कच्छप (फ्लॅटबॅक सी टर्टल, Natator depressus) मात्र फक्त ऑस्ट्रेलियन समुद्राच्या हद्दीत आढळतात.

भारतीय सागरी क्षेत्रात खालील जलकच्छपांची नोंद झाली आहे :

आ. ३. हरित समुद्री कच्छप

हरित समुद्री कच्छप : (ग्रीन सी टर्टल, Chelonia mydas). कठीण कवचधारी समुद्री कच्छपांपैकी हरित समुद्री कच्छप हे सर्वांत मोठे आहे. या सागरी कासवाची लांबी सु. १३४ सेंमी. व वजन १३५ —२५० किग्रॅ. इतके असते. या  कच्छपाचा रंग हिरवट पिवळा तसेच राखाडी तपकिरी असतो. मालदीव बेटांजवळ आढळणाऱ्या या जातीच्या कच्छपांचा रंग प्रशांत महासागरात इतरत्र आढळणाऱ्या कच्छपांपेक्षा अधिक गडद असतो. कवचाचा आकार अर्धवर्तुळाकार हृदयासारखा असतो तर खालील बाजू पिवळसर पांढऱ्या रंगाची असते. आययूसीएन संस्थेच्या अहवालानुसार ही प्रजाती २००४ पासून धोक्यात आलेली आहे.

आ. ४. श्येनमुखी समुद्री कच्छप

श्येनमुखी समुद्री कच्छप : (हॉक्सबिल सी टर्टल, Eretmochelys imbricata) :  समुद्री कच्छपांच्या सर्वांत लहान प्रजातींपैकी ही एक प्रजाती आहे. ससाण्याच्या चोचीच्या आकाराचे यांचे तोंड असल्यामुळे ह्यांना हॉक्स-बिल असे संबोधले जाते. या कच्छपांची लांबी ७५ — ९५ सेंमी.  व वजन ७० — ९० किग्रॅ. असते. भारतीय सागरी हद्दीतील हॉक्स बिल कासवे अटलांटिक व पॅसिफिक महासागरातील हॉक्सबिल पेक्षा तुलनेने लहान असतात. यांचे वैशिष्ट्य म्हणजे यांच्या कवचावर मोठ्या आकाराचे खवले असून ते घराच्या कौलांसारखे एकावर एक रचलेले असतात. ही कच्छपे सुंदर काळपट पिवळ्या रंगाची असून त्यांच्या संपूर्ण अंगावर गडद ठिपके असतात, ज्यामुळे ते  सागरी पाण्यात सहज मिसळून जाते. आययूसीएनच्या अहवालानुसार २००८ पासून यांची संख्या अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजातीमध्ये करण्यात आली आहे.

आ. ५. समुद्री ऑलिव्ह लघुकच्छप

समुद्री ऑलिव्ह लघुकच्छप : (ऑलिव्ह रिडले सी टर्टल, Lepidochelys olivacea) :  समुद्री कच्छपांपैकी हे सर्वांत लहान कच्छप असून याची सरासरी लांबी ८० सेंमी. तर वजन ५० किग्रॅ. हूनही कमी असते. या कच्छपांच्या कवचाचा आकार बदामासारखा व रंग ऑलिव्ह या फळासारखा गडद शेवाळी असतो, ज्यामुळे त्यांना ऑलिव्ह रिडले (रिडले म्हणजे छोटे कच्छप) असे संबोधले जाते. ही कच्छपे फार मोठ्या संख्येत आढळतात. या कच्छपाचे नर व मादी एकाच आकाराचे असतात. याच्या रंगावरून याचे नाव ऑलिव्ह रिडले पडले आहे. भारतात दरवर्षी मोठ्या संख्येने मादी ऑलिव्ह रिडले अंडी घालण्यास ओदिशा किनाऱ्यावर येतात. त्यांची अंडी गोळा करून खाण्याने त्यांची संख्या २००८ पासून धोक्याच्या पातळीमध्ये आली होती. सध्या गोवा व चिपळूण वेळास येथील किनाऱ्यावर त्यांची अंडी सांभाळून पिले समुद्रात जाईपर्यंत काळजी घेण्याचे काम स्वयंसेवी संस्था करीत आहेत. त्यांची अंडी नष्ट करणे हा आता गुन्हा आहे. असे किनारे आता पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध झाले आहेत.

आ. ६. बृहत्शीर्ष समुद्री कच्छप

बृहत्शीर्ष समुद्री कच्छप : (लॉगरहेड सी टर्टल, Caretta caretta). मोठ्या आकाराच्या डोक्याला इंग्लिशमध्ये लॉगरहेड म्हणतात. या कच्छपांचे डोके इतर समुद्री कच्छपांच्या तुलनेत मोठ्या आकाराचे असल्यामुळे यांना सदर नाव मिळाले आहे. याची सरासरी लांबी ६५ — ११५ सेंमी. असते आणि वजन ४० — १८० किग्रॅ. इतके असते. याचे कवच गडद भगवा, विटकरी, पिवळसर तपकिरी अशा विविध रंगाचे असून कवचाचा आकार बदामासारखा असतो. यांच्या कवचावर व डोक्यावर बारर्नॅकलसारखे संधिपाद प्राणी कवचासहित  चिकटलेले असतात. २०१५ पासून लॉगरहेड कच्छप धोक्याच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहेत.

आ. ७. चर्मपृष्ठी समुद्री कच्छप

चर्मपृष्ठी समुद्री कच्छप : (लेदरबॅक सी टर्टल, Dermochelys coriacea). समुद्री कच्छपांमध्ये ही आकाराने सर्वांत मोठी प्रजाती आहे. यांच्या कवचाचे आवरण चिवट चर्माने बनलेले असते. अधिक बळकटीसाठी त्वचेखाली हजारो अस्थींसारख्या टणक चीपांचा आधार असतो. चामड्याचे कवच असलेले हे एकमेव समुद्री कच्छप आहे. वल्ह्याप्रमाणे असलेल्या पायांना नख्या असतात.  प्रजातीचे प्रौढ नर आणि माद्या दोन मीटरहून अधिक मोठे वाढतात आणि त्यांचे वजन ९०० किग्रॅ.हून अधिक भरते. १९१३ पासून धोक्याच्या यादीत या प्रजातीचे नाव आहे.

जमिनीवर अंडी घालण्यास आलेल्या जलकच्छपांचे जवळून निरीक्षण केले असता त्यांच्या डोळ्यातून सतत पाणी वाहल्यासारखे दिसते. त्यामुळे कासव अंडी घातलेल्या ठिकाणी येऊन रडते अशी समजूत आहे. प्रत्यक्षात सागरी कच्छपांच्या डोळ्याखाली क्षार ग्रंथी असतात. अन्नाबरोबर शरीरातील गेलेले रक्तातील अतिरिक्त क्षार या ग्रंथीमधून (Salt glands) बाहेर येतात.

संवर्धन : भारतामध्ये या कच्छपांना विविध संकंटांशीही सामना करावा लागतो. यातील सर्वांत मोठा धोका म्हणजे किनारी प्रदेशांचा विस्कळीत विकास हा आहे. यामध्ये मुख्यत्वे बंदरे, किनाऱ्यांवर प्रकाशव्यवस्था, पर्यटन तसेच वनीकरणाचा समावेश होतो. याच्याच जोडीने मासेमारीच्या जाळ्यांमध्ये अडकून होणारे मृत्यू, मासेमारी कायदे व संरक्षित भागांच्या नियमांचे न होणारे पालन आणि काही प्रमाणात मांस व अंड्यांसाठी होणारी शिकार हेही धोके आहेतच. याशिवाय अजून एक धोका म्हणजे समुद्रात तरंगणाऱ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या जेली-फिश समजून ही कासवे भक्षण करतात आणि प्लॅस्टिक पोटात अडकून त्यांचा मृत्यू होतो. परिणामी कच्छपांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, प्लॅस्टिक कचरा कमी करणे तसेच जनजागृती यांद्वारे कच्छपांचे संवर्धन करणे आवश्यक आहे.

पहा : दिकचालन; भूकच्छप; सरीसृप वर्ग.

संदर्भ :

  1. आययूसीएन –https://www.iucn.org/
  2. https://en.wikipedia.org/wiki/Sea_turtle
  3. https://oliveridleyproject.org/sea-turtles/sea-turtles-of-the-indian-ocean
  4. IUCN Red List of Threatened Species

 

  समीक्षक : मद्वाण्णा, मोहन 


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.