पक्षी समूहाने एकत्र येतात त्या एकत्रीकरणाला पक्ष्यांचे समूहन किंवा पक्ष्यांचा थवा (Bird flocking) असे म्हणतात. थव्याने राहणे ही अनेक पक्ष्यांच्या प्रजातींमधील एक सहज प्रवृत्ती आहे. उदा., कावळ्यांच्या थव्याला ‘मर्डर’ (Murder), तर मैनांच्या थव्याला ‘मर्म्युरेशन’ (Murmuration) म्हणतात.

पक्षी समूहाने एकत्र येण्याची कारणे वेगवेगळी आहेत. अनेक पक्षी अन्न शोधण्यासाठी, विश्रांतीसाठी किंवा एकत्र स्थलांतर करण्यासाठी थवे तयार करतात. पक्ष्यांचे थवे हे आकाराने लहान किंवा मोठे असतात. उदा., मानवी वस्तीत सामान्यपणे आढळणारी कबुतरे, चिमण्या या पक्ष्यांचे लहान थवे आढळतात; तर विशेषत: हिवाळ्यामध्ये मैनांचे हजारांच्या संख्येत मोठे थवे आढळतात. दरवर्षी ३०,००० ते ४०,००० फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे स्थलांतर करतात. बहुतेक वेळा जोड्यांमध्ये किंवा कौटुंबिक गटांमध्ये राहणारे सँडहिल क्रेन हे पक्षी स्थलांतराच्या वेळी ४,००,००० ते ६,००,००० इतक्या मोठ्या संख्येत थवे तयार करतात. एकाच जातीच्या पक्ष्यांचे थवे जसे आढळतात तसेच दोन किंवा अधिक पक्ष्यांच्या जातींचे थवे देखील आढळतात, यास मिश्र थवे असे म्हणतात. पक्ष्यांच्या भिन्न वर्तुणुकीमुळे असे थवे निर्माण होतात. त्यामुळे पक्ष्यांना अन्न मिळवणे व त्यासोबत स्वत:चे संरक्षण करणे सोपे होते. काही मिश्र थवे एकत्र उडतात आणि विश्रांती घेतात. परंतु, खाण्याच्या वेळी ते वेगळे होतात. उदा., टिट्स (Tits) आणि गोल्डक्रेस्ट (Goldcrest) यांसारख्या जंगलातील पक्ष्यांमध्ये अशाप्रकारचे लहान मिश्र थवे आढळतात. उत्तर अमेरिकेतील वुड वॉर्बलर पक्षी अधिकतर मिश्र थव्यांमध्येच आढळून येतात. विशेषत: संकटग्रस्त प्रजाती मिश्र प्रजातींचे थवे तयार करताना आढळून येतात. पक्ष्यांच्या काही प्रजाती वर्षभर लहान लहान थव्यांमध्येच राहतात, यास पक्ष्यांचे कायमस्वरूपी समूहन म्हणतात; तर पक्ष्यांच्या काही जाती केवळ अन्न शोधण्यासाठी मिश्र थव्यांची निर्मिती करतात, यास पक्ष्यांचे हंगामी समूहन म्हणतात.

प्रजनन काळात बहुतेक पक्षी फारसे सामाजिक नसतात आणि इतर कोणत्याही प्रजातीच्या पक्ष्यांशी कमीत कमी संपर्क ठेवून आपल्या पिलांचे संगोपन करण्यावर लक्ष केंद्रित करतात. तथापि, अनेक प्रजातींमध्ये एकदा त्यांची पिले उडण्यायोग्य झाली की ते मोठ्या गटांमध्ये एकत्र येऊ लागतात. मिश्र थवे भक्षकांपासून प्रभावी संरक्षण देतात, कारण लहान पक्ष्यांना मोठ्या पक्ष्यांमध्ये आश्रय घेता येतो. तसेच प्रजननाचा हंगाम संपल्यानंतर विविध प्रजातींचे पक्षी नियमितपणे एकत्र येऊन अन्न खातात. उदा., दरवर्षी प्रजननानंतर स्थलांतराच्या काळात दक्षिण आशियातून आफ्रिकेकडे जाणारे साधारण दहा लाख अमूर ससाणे आढळतात.
पक्ष्यांच्या समूहनाचे पुढीलप्रमाणे फायदे आहेत –
(१) भक्षकांपासून संरक्षण : समूहनामुळे शिकारी पक्ष्यांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी अनेक डोळे व कान एकाच वेळी उपलब्ध असतात. घोळक्यात असल्याचा फायदा म्हणजे मोठ्या विस्तृत क्षेत्रात रडार वापरल्यासारखा होतो. धोका ओळखण्यासाठी सरळ संवादाची आवश्यकता नाही. थव्याच्या एका टोकास धोक्याची जाणीव झाली म्हणजे पूर्ण थवा एखाद्या वावटळीप्रमाणे क्षणार्धात आपली दिशा बदलतो. तसेच शिकार करण्यासाठी भक्षकाला समूहातील केवळ एका भक्ष्यावर लक्ष केंद्रित करणे अवघड जाते. (पहा आ. ३.) थोडक्यात पक्ष्यांचे मोठ्या गटासोबतचे एकत्रीकरण त्यांच्या दीर्घकालीन जगण्यास मदत करते.
(२) अन्नाचा शोध : थव्यामध्ये प्रत्येक पक्षी अन्नाची उपलब्धता तसेच ठिकाणाबद्दल माहिती देण्यासाठी आवाज आणि देहबोलीद्वारे एकमेकांशी संवाद साधतात. या संकेत देण्याच्या पद्धतीमुळे पक्ष्यांना अधिक कार्यक्षमतेने अन्न शोधता येते. एकट्याने अन्न शोधणाऱ्या पक्ष्यांपेक्षा पक्ष्यांचे मोठे थवे अधिक जास्त क्षेत्र व्यापू शकतात, ज्यामुळे त्यांना अन्नाचा चांगला स्रोत मिळण्याची शक्यता वाढते. समूहनात अन्न शोधताना पक्ष्यांची वेळेची तसेच ऊर्जेची देखील बचत होते.

(३) ऊर्जा बचत : समूहात अनेक पक्षी (उदा., हंस, बदक, बगळा, करकोचा इ.) आकाशात उडताना इंग्रजी ‘V’ आकारात उडतात. या रचनेत मागे असलेल्या पक्ष्यांना पुढच्या पक्ष्यांच्या पंखांमुळे निर्माण होणाऱ्या ऊर्ध्वप्रवाहाचा आणि उचल शक्तीचा फायदा होतो आणि त्यामुळे त्यांना उडताना जास्त ऊर्जा खर्च करण्याची गरज भासत नाही. परिणामत: ते लांब अंतर सहज पार करू शकतात.
(४) सहज स्थलांतर : हजारो किलोमीटरचा प्रवास करताना थव्यातील पक्षी एकमेकांना दिशा दाखवण्यास मदत करतात. लांबच्या उड्डाणांदरम्यान थव्यातील सदस्य गटात नियमितपणे आपली जागा बदलतात, ज्यामुळे त्यांना हवेत असताना थोडा वेळ विश्रांती घेता येते किंवा कमी ऊर्जा खर्च होते. थव्याच्या मध्यभागी असलेले पक्षी कडेच्या पक्ष्यांपेक्षा कमी दक्ष राहू शकतात.
पक्ष्यांच्या समूहन वर्तनाचे कार्यतंत्र (Mechanism of bird flocking) : पक्ष्यांच्या समूहन वर्तनाचा अभ्यास केला असता पक्षी एकमेकांशी कसे संवाद साधतात, थवे कसे संघटित होतात, मोठ्या थव्यातील सदस्यांची भूमिका काय असते, थव्यांचे मार्गक्रमण कसे निश्चित केले जाते, काही पक्षी थव्यामध्ये सामील न होण्याचा निर्णय का घेतात याची माहिती मिळते. यामुळे नैसर्गिक अधिवासातील पक्षी समाजाची रचना आणि परिसंस्थेच्या श्रेणीरचना समजून घेण्यास मदत होते.

समूहन हे एकत्रित लहान किंवा मोठ्या संख्येने केले जाणारे स्वयं प्रेरित किंवा स्वयं प्रणोदित (self – propelling) वर्तन आहे. हे वर्तन गणितीय प्रारूपानुसार समजावून घेता येते. तीन सोप्या नियमांनुसार समूहन वर्तन घडते – पहिला नियम : शेजारील सजीवाच्या दिशेने जाणे, दुसरा नियम : शेजारील सजीवाच्या जवळ राहा आणि तिसरा नियम : शेजाऱ्याशी टक्कर टाळा. (पहा आ. ४.)
आकृती ४. नुसार समुदायातील अंतर प्रारूपाप्रमाणे घोळक्यात मध्यवर्ती सजीव (पिवळ्या रंगाचा) याच्याकडे सर्व जवळच्या सजीवांचे लक्ष वेधून घेतो. हे लहान तांबड्या रंगाच्या क्षेत्रात परिणामकारक असते. याच्या बाहेरील फिकट तांबडे व त्याबाहेरील अधिक फिकट तांबूस रंगाचे क्षेत्र यातील सहा ते सात हिरव्या रंगाचे सजीव अंतराचा परिणाम न होता परस्परांवर लक्ष ठेवतात.
वरील नियमांवरून क्रेग रेनोल्ड (Craig Reynolds) यांनी १९८६ मध्ये बोईडची आज्ञावली (Boids algorithm) विकसित केली होती. या नियमांचा आधार घेऊन आणखी काही आज्ञावल्या विकसित केल्या गेल्या. या सर्वांचा आधार घेऊन सकेंद्री मंडलाचा विचार केलेला आहे. यामध्ये पहिले मंडल प्रतिसारण क्षेत्र (Zone of repulsion) असून यात असलेला पक्षी त्याच्या अधिक जवळ दुसऱ्या पक्ष्याला येऊ देत नाही. परस्परांची टक्कर टाळण्यासाठी ही योजना असते. प्रतिसारण क्षेत्राच्या बाहेर पंक्तिबद्धता क्षेत्र (Alignment zone) असते, यात येणारे पक्षी त्यांच्या स्थानाबाहेर थोडे अंतर राखू शकतात. सर्वांत बाहेरील क्षेत्र म्हणजे आकर्षण क्षेत्र (Zone of attraction) असून हे क्षेत्र कितीही मोठे होऊ शकते. मध्यवर्ती पक्ष्याजवळ जाण्याची संधी या क्षेत्रातील पक्ष्यांना असते.
पक्ष्यांच्या समूहाने उडण्याच्या पद्धतीस द्रायुगतिकी (Hydrodynamics – Fluid dynamics) नियम लागू पडतात असे भौतिक वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. समूहाने उडणारा प्रत्येक पक्षी जरी स्वतंत्र असला तरी द्रायुगतिकी नियमानुसार त्याचे समूह वर्तन होते.
संपर्क क्षेत्राचा आकार इंद्रियांच्या क्षमतेप्रमाणे बदलतो. उदा., पक्ष्याच्या दृष्टीस मागचे काही दिसत नाही. मैना पक्ष्यांवरील संशोधनामधून असे आढळले की, प्रत्येक पक्षी त्याच्या सभोवती असलेल्या पाच ते सहा पक्ष्यांप्रमाणे आपली जागा बदलतो. याचा अर्थ त्यांची थव्यातील जागा स्थलरूपिकीप्रमाणे (Topology) बदलते. ही पद्धत पडताळून पाहण्यासाठी सामूहिक स्थलांतर करणाऱ्या सस्तन प्राण्यांचा वेगवान कॅमेऱ्याच्या साहाय्याने छायाचित्रण करून पाहिले असता पक्ष्यांच्या थव्यातील वर्तन आणि झेब्रा, हरीण यांसारख्या प्राण्यांतील सामूहिक वर्तन यात सारखेपणा होता.
समूहन वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिकांनी उत्क्रांती प्रारूपे पडताळून पाहिली. या अभ्यासात जनुकीय रीतीचा (Algorithm) समावेश केल्यावर अनेक पिढ्यांतील उत्क्रांती अनुरूपे समजली. त्यावरून अनेक सिद्धांत पडताळून समूह आणि भक्षकास गोंधळात पाडणे, समूह विखरणे आणि एकाच वेळी अनेक डोळ्यांनी धोका पडताळणे यावर एकमत झाले आहे.
समूह बुद्धिमत्ता : पक्ष्यांचे थवे समूह बुद्धिमत्ता या एका घटकावर अवलंबून असतात, ज्यामुळे खाद्य मिळवण्यासाठी किंवा स्थलांतर करण्यासाठी ते समन्वितपणे एकत्र काम करू शकतात. समूहातील प्रत्येक सदस्यांमधील परस्पर संवाद आणि एकजुटीतून तसेच आपल्या सर्वांत जवळच्या पक्ष्यांच्या हालचालींना प्रतिसाद देऊन समूह बुद्धिमत्ता विकसित होते.उदा., वेगाने दिशा बदलताना देखील पक्ष्यांचे थवे एकसारखे व सुसंगत अंतर राखतात. पक्ष्यांच्या थव्यातील सामूहिक बुद्धिमत्ता ही कुठे उडावे किंवा कुठे उतरावे याबद्दल सूचना देणाऱ्या एका प्रमुख ज्येष्ठ सदस्याच्या श्रेणीरचनेवर अवलंबून नसते. त्याऐवजी संपूर्ण गटाची सामूहिक बुद्धिमत्ताच त्याला प्रभावी बनवते आणि सामूहिक निर्णय घेण्यास प्रवृत्त करते, ज्यात समूहातील सर्व सदस्य आपापली भूमिका बजावतात. सामूहिक वर्तन ही एक विकेंद्रित स्वयंनियंत्रित पद्धत असून ही पद्धत कृत्रिम बुद्धिमत्ता या कल्पनेवर अवलंबून आहे. गेरार्डो बेनी (Gerardo Beni) आणि जिंग वांग (Jing Wang) यांनी १९८९ साली या पद्धतीचा प्रारंभ सेल्युलर रोबोटिक्समध्ये केला. यास त्यांनी स्वॉर्म इंटेलिजन्स (Swarm Intelligence) असे नाव दिले.
पक्ष्यांप्रमाणे मधमाशा, टोळ, वाळवी, वास्प, मुंग्या यांसारख्या कीटकांमध्येही संघटन (Swarm) आढळते. यामध्ये कीटकांचा खूप दाट परंतु, असंरचित किंवा असंघटित समूह असतो की जो कोणत्याही दिशेने फिरत असतो. कीटकांचे गट अनेकदा गोंधळलेले, विशिष्ट जागेत एकत्र जमलेले किंवा विखुरलेले असतात. स्वत: नियंत्रित होणाऱ्या जीवविज्ञानातील संकल्पना सामूहिक जीवन जगणाऱ्या काही सजीवांमध्ये विकसित झालेल्या आहेत. उदा., राणी मधमाशी कोणतीही सूचना कामकरी किंवा आक्रमक माशांना देत नाही. परंतु, पोळ्यातील सर्व माशा रासायनिक संकेतानुसार नियंत्रित होतात. मुंग्या गंधखुणांच्या पाठोपाठ वारूळातून बाहेर पडतात किंवा आत जातात. याचप्रमाणे अनेक कीटकांमधील संघटन मादीच्या शरीरातून सोडल्या जाणाऱ्या फेरोमोनमुळे शक्य होते. त्यामुळे मध्यवर्ती नियंत्रण नसताना सुद्धा सर्व समूह एकत्रित वर्तन करतो.
समूहन वर्तनात परिसरातील एखादा घटक पुढील कृती ठरवतो. वरवर पाहता एका पाठोपाठ झालेल्या कृती वेगळ्या कृतीस जन्म देतात. या कृती उस्फूर्त आणि सुसंगत असून यास स्वयंनियंत्रण म्हणतात. पक्ष्यांमध्ये स्मृती, बौद्धिक क्षमता किंवा शेजारील सजीवाची जाणीव नसताना देखील अत्यंत सोप्या पद्धतीने हे नियंत्रण होते.
पक्षीच नव्हे तर सस्तन प्राणी, सरीसृप, उभयचर, मासे तसेच कीटक, जीवाणू अशा सजीवांमध्ये समूहन आढळते. पुरेसे अन्न उपलब्ध होणे आणि दुसऱ्याचे भक्ष्य न होणे यासाठी समूहन हा उत्तम उपाय आहे. थोडक्यात विविध प्रजातींमधील समूहन हे त्यांचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी मदत करते.
पहा : पक्ष्यांचे स्थलांतर; समूहन, माशांचे.
संदर्भ :
- https://blog.mybirdbuddy.com/post/bird-flock
- https://en.wikipedia.org/wiki/Swarm_behaviour
- https://framesofnature.com/blog/flocking-birds/
- https://www.birdfact.com/bird-behavior/social-structures/flocking-behavior
- https://www.sciencedirect.com/science/article/pii/S0960982220300130
- https://www.scienceofbirds.com/blog/mixed-species-bird-flocks
समीक्षक : निनाद शहा
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
