सदाशिव म्हणजे परमोच्च, निर्गुण, निराकार, अनाकलनीय आणि सर्वव्यापी तेज. हे सर्वोच्च दैवत साऱ्या चराचराचे मूळ आणि अंत मानले जाते. सदाशिव हा साक्षात विश्वस्वरूप आहे, सर्व उत्पत्तीचे कारक, स्थितीचे द्योतक व संहाराचे प्रतीक. सदाशिवतत्त्व हे सकल-निष्कल मानले जाते. आगम ग्रंथ असे मानतात की, सदाशिवमूर्ती ही सर्वसामान्य मर्त्य मानवांच्या आकलनापलीकडची आहे. ‘शैवागमा’नुसार ही शिवाची सर्वोच्च श्रेणीची मूर्ती होय. ही मूर्ती तीन स्वरूपांत आढळते: व्यक्त, अव्यक्त आणि व्यक्ताव्यक्त. शैव सिद्धांतानुसार शिव, सदाशिव आणि महेश ही तीन रूपे ती परमेश्वराच्या अनुक्रमे निष्कल/सूक्ष्म, सकल-निष्कल/स्थूल-सूक्ष्म व सकल/स्थूल या तीन तत्त्वांचे प्रतिनिधित्व करतात.

सर्वसाधरणत: शिवप्रतिमेला चार किंवा पाच मुखे असल्यास तिला सदाशिव आणि त्याहून अधिक असल्यास महासदाशिव असे संबोधले जाते. ‘विष्णुधर्मोत्तर’ पुराणानुसार पाच दिशांना असलेली ही पाच मुखे पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतात :
तत्पुरुष – पूर्व – वायुतत्त्व
अघोर – दक्षिण – अग्नीतत्त्व
वामदेव – उत्तर – जलतत्त्व
सदयोजात – पश्चिम – पृथ्वीतत्त्व
ईशान – आकाश – आकाशतत्त्व
या पाचही शिवरूपांना मिळून ‘पंचब्रह्म’ असेही म्हटले जाते. ही पाच मुखे शिवाच्या पाच अवस्थिती असून ती आत्मा, भौतिक जग, बुद्धी, अहंकार आणि मन यांचे प्रतिनिधित्व करतात.
‘उत्तर कामिकागम’ या ग्रंथानुसार सदाशिवमूर्ती ही रंगाने पांढरी असून तिला पाच मुखे व दहा हात असतात. त्यांपैकी पाच उजव्या हातात शक्ती, शूल, खट्वांग, अभयमुद्रा आणि प्रसाद (?) धारण केलेले असतात, तर डाव्या हातात भुजंग, अक्षमाला, डमरू, नीलोत्पल फूल आणि मातुळुंग फळ धारण केले जाते. महासदाशिवाच्या प्रतिमेला पंचवीस मुखे आणि पन्नास बाहू असतात. त्या सर्व हातांनी शक्य ती सर्व वैविध्यपूर्ण आयुधे आणि मुद्रा धारण केलेल्या असाव्यात. ‘मानसार’ या ग्रंथानुसार महासदाशिवाच्या प्रतिमेला पंचवीस मुखे, पंचाहत्तर नेत्र (प्रत्येकी तीन याप्रमाणे) व पन्नास बाहू असावेत. मस्तकावर जटामुकुट व अंगावर सर्पालंकार असावेत. मात्र अशा प्रकारची मूर्ती प्रत्यक्ष पाहायला मिळत नाही.

https://en.wikipedia.org/wiki/Sadashiva#/media/File:Sadashiva.jpg
सदाशिवाची उपासना भारतात जवळजवळ इ. स. पू. दुसऱ्या शतकापासून प्रचलित आहे. ती चतुर्मुख/पंचमुख शिवलिंगपूजनातून उगम पावली असे मानले जाते. भीटा (प्रयागराज, उत्तर प्रदेश) येथे सापडलेले पंचमुख शिवलिंग हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. मांढळ (जि. नागपूर, महाराष्ट्र) येथे चौथ्या-पाचव्या शतकातील तीन व्यक्त मूर्ती सापडल्या आहेत. त्यांपैकी एक चतुर्मुख, दुसरी अष्टमुख आणि तिसरी द्वादशमुख आहे. चतुर्मुख प्रतिमा ‘सदाशिव’ आणि अष्टमुख तसेच द्वादशमुख प्रतिमा या ‘महासदाशिव’ म्हणून ओळखल्या जातात. या तिन्ही मूर्ती उभ्या असून द्विभुज आहेत. चतुर्मुख शिवाची चार दिशांना चार तोंडे आहेत, अष्टमुखी प्रतिमेला मानेवर चार दिशांना चार, दोन्ही बाहूंवर एकेक, आणि दोन मुखे जणू मांड्यांमधून उत्पन्न झाल्याप्रमाणे दर्शविली आहेत. उजवा हात भग्न झाला असून कमंडलू धरलेला डावा हात कमरेवर आहे. तिसऱ्या मूर्तीला बारा मुखे असून ती मानेवर दोन थरांमध्ये आठ, आणि बाकी अष्टमुखी मूर्तीप्रमाणेच दोन्ही बाहूंवर व दोन्ही मांड्यांवर एकेक अशी आहेत. मानेवरील आठ मुखेही अशाप्रकारे घडविली आहेत की, खालच्या थरातील चार तोंडे ही मुख्य दिशांकडे आहेत आणि वरची चार उपदिशांकडे.
बंगालमध्ये सदाशिवाची पूजाअर्चा मुख्यत्वे पाल व सेन राजवटींमध्ये प्रचलित होती. सेन राजांच्या अनेक ताम्रपटांवर त्यांच्या या आराध्यदैवताची मुद्रा आढळते. या दोन राजवंशांच्या काळात सदाशिवाच्या दगड आणि धातूच्या अनेकविध प्रतिमा घडविल्या गेल्या. बहुधा या प्रतिमा दशभुज असून त्यांना चार दिशांना चार मुखे आहेत. कोलकाता येथील आशुतोष वस्तुसंग्रहालयात एक सुंदर सदाशिवमूर्ती आहे. ती द्विभुज असून दोन्ही हात व्याख्यानमुद्रेत छातीजवळ आणले आहेत. डाव्या हातात डमरू व सर्प असून कपाळावर तिसरा डोळा दिसून येतो.
घारापुरी (जि. रायगड, महाराष्ट्र) येथील मुख्य लेणीतील सुमारे सात मीटर उंचीची प्रचंड सदाशिव प्रतिमा ही अतिशय देखणी व सुप्रसिद्ध अशी आहे. अघोर, तत्पुरुष, वामदेव आणि सदयोजात ही चारही मुखे चार दिशांना एकेक याप्रमाणे कोरलेली आहेत. या मूर्तीला पूर्वी महेशमूर्ती असे संबोधले जाई. स्टेला क्रॅमरिश यांनी ही सदाशिव प्रतिमा असल्याचे सिद्ध केले.
खजुराहो (जि. छतरपूर, मध्यप्रदेश) आणि मार्कंडा (जि. गडचिरोली, महाराष्ट्र) येथे इ. स. सुमारे १०-११ व्या शतकातील चतुष्पाद सदाशिवाच्या विलक्षण मूर्ती सापडल्या आहेत. या दोन्ही मूर्तींचे पुढील दोन पाय पद्मासनात असून मागील दोन पाय आसनाखाली सोडलेले दिसतात. गो. बं. देगलूरकर यांच्या मते चर्या, क्रिया, योग आणि ज्ञान हे शैवसिद्धांताचे चार पाय किंवा आधार होत. योग आणि ज्ञान यांचा पाया म्हणजे चर्या आणि कार्य. या चारही पायांवर धर्म उभा राहतो. त्यामुळे मोक्षाचे ज्ञान देणाऱ्या शैवसिद्धांताचे प्रत्यक्ष मूर्त स्वरूप म्हणजे ही चतुष्पाद सदाशिव मूर्ती होय.
संदर्भ :
- Deglurkar, G. B. ‘A Unique Ashtamurti Image from Mandhal’, Proceedings of the Indian History Congress, (43), 786-789, 1982.
- Deglurkar, G. B. ‘Dvadasa Sarvaparsvamukha Siva Murti from Mandhal (Maharashtra)’, Proceedings of the Indian History Congress, (50), 841–843,1989.
- Rao, T. A. G., Elements of Hindu Iconography, Vol. II, Part I, Motilal Banarsidass Publishers Pvt. Ltd., Delhi, 1914; 1997.
- खरे, ग. ह., ‘मूर्तिविज्ञान’. भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९३९; २०१२.
- जोशी, नी. पु., ‘भारतीय मूर्तिशास्त्र’, प्रसाद प्रकाशन, पुणे, १९७९; २०१३.
- देगलूरकर, गो. बं., ‘शिवमूर्तये नमः’, स्नेहल प्रकाशन. पुणे, २०१४.
समीक्षक : श्रीकांत गणवीर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
