ग्रीक पुराणकथेतील सौंदर्य, प्रेम आणि इच्छेचा देव. तो त्याच्या अत्यंत देखण्या रूपासाठी ओळखला जातो. ‘ॲडोनिस’ हे नाव सेमिटिक भाषेतील ‘ॲडॉन’ किंवा ‘ॲडोनाई’ (अर्थ : प्रभू, स्वामी) या शब्दावरून आले असल्याचे मानले जाते. ग्रीक पुराणकथेत तो मर्त्य असूनही त्याला देवतेसमान स्थान होते. तो मुख्यतः तरुणाई, वनस्पतींची वाढ, ऋतुचक्र आणि पुनर्जन्म यांच्याशी संबंधित असलेला देव होय. त्याचा जन्म फिनिशियन (आधुनिक लेबनॉन) संस्कृतीत झाला होता; परंतु नंतर ग्रीकांनी त्याला आपल्या देवतांच्या यादीत समाविष्ट केले. एका प्रसिद्ध कथेनुसार त्याची आई मिर्राने एका शापामुळे आपल्या वडिलांशी संबंध ठेवले. सत्य उघड झाल्यावर देवतांनी तिला मिर्राच्या वृक्षात रूपांतरित केले. त्या वृक्षाच्या खोडातून नंतर ॲडोनिसचा जन्म झाला. ही कथा नैतिक पतन, दैवी शिक्षा आणि नवजीवन यांचे प्रतीक मानली जाते. तो वसंत ऋतू, निसर्गाचे नूतनीकरण आणि सुफलतेचा प्रतीक मानला जातो.
ॲडोनिसची कथा ही प्राचीन भूमध्यसागरीय संस्कृतींतील मृत्यू आणि पुनर्जन्माच्या मिथकांचे सुंदर उदाहरण मानली जाते. त्याच्यावर ग्रीक सौंदर्यदेवी ॲफ्रोडाइटी आणि ग्रीक पाताळदेवी पर्सेफोनी या दोघींनाही प्रेम होते. एका शिकारीदरम्यान रानडुकराच्या हल्ल्यात त्याचा अकाली मृत्यू होतो. त्यामुळे ॲफ्रोडाइटी खूप दुःखी होते. ॲडोनिसच्या रक्तापासून ‘ॲनिमोन’ नावाचे फूल तयार होऊन त्याला दरवर्षी मृत्यू आणि पुनर्जन्माच्या चक्रातून जावे लागते. जे निसर्गाच्या बदलाशी (हिवाळा ते वसंत ऋतू) जोडले जाते. प्राचीन ग्रीक स्त्रिया त्याची पूजा करीत असत आणि त्याच्या सन्मानार्थ ‘ॲडोनिया उत्सव’ साजरा केला जात असे. उत्सवात स्त्रिया एका लहान कुंडीत झपाट्याने उगवणारी आणि लवकर कोमेजणारी रोपे लावत असत. जे की, ॲडोनिसच्या अल्पायुषी जीवनाचे प्रतीक मानले जात होते. त्याच्या मृत्यूच्या वर्षदिनी हा उत्सव जाहीर केला असून, दरवर्षी उन्हाळ्याच्या मध्यावर स्त्रियांकडून तो साजरा केला जात असे.
संदर्भ :
- Bulfinch, Thomas, Bulfinch’s Mythology, New York, 1855.
- Graves, Robert, The Greek Myths, London, 1955.
- Hamilton, Edith, Mythology, New York, 1942.
- Kerenyi, Karl, The Gods of the Greeks, London, 1951.
समीक्षक : नवनाथ रासकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
