किड्स्टन, रॉबर्ट (२९ जून १८५२ – १३ जुलै १९२४).
स्कॉटिश पुरावनस्पतीजीववैज्ञानिक. डेव्होनियन कालखंडातील (सु. ४२ ते ३६.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) वनस्पतींच्या जीवाश्मांच्या शोधाकरिता आणि त्याच्या वर्णनाकरिता ते प्रसिद्ध आहेत.
किड्स्टन यांचा जन्म रेनफ्रुशर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण स्टर्लिंग येथे झाले. एडिंबरो विद्यापीठात त्यांनी वनस्पतिविज्ञानाचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी ऱ्हाइने चर्ट (Rhynie Chert) खडकांचा अभ्यास केला. डेव्होनियन (Devonian) कालखंडातील सर्वात व्यवस्थित जीवाश्म स्कॉटलंडमधील या खडकात आढळतात. हे काम ब्रिटिश जिऑलोजिकल सर्वे यांच्यातर्फे त्यांनी केले. त्यांच्या काळातील ते सर्वात प्रसिद्ध पुरावनस्पतीवैज्ञानिक होते. डेव्होनियन आणि कार्बॉनिफेरस (Carboniferus) कालखंडातील वनस्पती जीवाश्मांचे वर्गीकरण त्यांनी केले. त्यांच्या नावावर १८० शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. किड्स्टन यांना १८८० साली ब्रिटिश म्यूझीयममधील पुराजीववनस्पतिसंग्रहाची (पॅलिओझोइक, paleozoic) सूची करण्यास सांगितले. हे काम त्यानी १८८३–१९८६पर्यंत पूर्ण केले. त्यांची एडिंबरो रॉयल सोसायटीच्या सभासद पदी निवड झाली (१८८६). रॉयल सोसायटीचे सचिव पद त्यांनी सात वर्षे (१९०९–१९१६) आणि उपाध्यक्ष पद (१९१७-२०) सांभाळले. रॉयल सोसायटीकडून देण्यात येणारे नील पारितोषिक त्यांना दोनदा देण्यात आला (१८८६-८९; १९१५-१७). त्यांना ग्लासगो विद्यापीठाची आणि मँचेस्टर विद्यापीठाची मानद डॉक्टरेट अनुक्रमे १९०८ आणि १९२१ देण्यात आली.
किड्स्टन यानी ऱ्हाइने चर्टमधील जीवाश्मांच्या बाह्य स्वरूपावर विल्यम हेन्री लॅंग़ (W. J. HenryLang) यांच्यासोबत मॅंचेस्टर विद्यापीठामध्ये काम केले. त्यांनी डेव्होनियन कालखंडातील अपुष्प (flowerless plants) व अबीजी (cryptogams) वनस्पतींच्या जीवाश्मामधील एक वाहिनीवंत अबीजी (vascular cryptogams) वनस्पतींचा नवीन गट व दोन नव्या जेनेरांचा शोध लावला. डेव्होनियन काळातील वनस्पतींचा हा शोध त्यांचे सर्वांत महत्त्वाचे कार्य मानले गेले. त्यांनी फ्लोरा ऑफ द कार्बॉनिफेरस पिरीयड (१९०१) या पुस्तकाचे आणि कार्बॉनिफेरस काळातील ब्रिटिश जीवाश्म वनस्पतीवरील द फॉसील प्लॅंट्स ऑफ द कार्बॉनिफेरस रॉक्स ऑफ ग्रेट ब्रिटन (सहा खंड मृत्यूपूर्वी प्रसिद्ध; १९२३ – २५). या ग्रंथाचे लेखन केले.
किड्स्टन यांचे वेल्स येथे निधन झाले.
संदर्भ :
- https://en.wikipedia.org/wiki/Robert_Kidston
- https://www.britannica.com/biography/Robert-Kidston
- मराठी विश्वकोश खंड ३: https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand3/index.php/khand3-suchi?id=6521
समीक्षक – मोहन मद्वाण्णा