तमिळ, ग्रीक, लॅटिन, संस्कृत, हिब्रू, चायनीज, अरेबिक या जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त अभिजात भाषा होत. त्या भाषांमधील प्राचीन साहित्य हे अभिजात वाङ्मय आहे. अभिजात ही संकल्पना तशी नवीन आहे. ‘जुने ते सोने’ हे समजून आता आपण या भाषा आणि त्यातील साहित्याकडे एक मूल्यवान ठेव म्हणून पाहात आहोत.
कला आणि साहित्यासाठी ‘अभिजात’ ही संकल्पना युरोपीय खंडात पहिल्यांदा वापरली गेली. मध्ययुगात व यूरोपीय प्रबोधनकाळात अभ्यसनीय व अक्षर अशा साहित्यकृतींना व साहित्यिकांना अभिजात मानण्यात आले. ‘अभिजात’ या संज्ञेचा उपयोग, भाषा या शब्दाचे विशेषण म्हणून, ऑल्स जेलियस यांनी इ.स.च्या दुसऱ्या शतकात प्रथम केला. इ.स.पू. सु. ८५० ते ३ रे शतक या कालखंडातील होमर, हेसिअड, पिंडर इ. कवी, नाटककार, सॉक्रेटीस, प्लेटो, अॅंरिस्टॉटल यांसारखे तत्त्वज्ञ व साहित्यशास्त्रकार या सर्वांनी प्राचीन ग्रीक साहित्य संपन्न केले. अभिजाततावादाला अभिप्रेत असणारे आदर्शानुकरण व संकेतपालन हे विशेष प्रथम लॅटिन साहित्यात (इ.स.पू. २४० ते इ.स. ५००) दिसतात.
अभिजात शब्द अभिजन या संकल्पनेशी संबंधित आहे. भव्यता, उदात्त मूल्य, अभ्यासपूर्णता आणि नियमबद्धता अशी याची काही गुणवैशिष्टये. पण त्याच बरोबर आविष्कारातला संयम आणि औचित्य महत्वाचे. व्यंग्यार्थाने सुचवण्याचे कवीचे कौशल्य. यामुळे एकापेक्षा जास्त अन्वय लावता येण्याची, वेगवेगळे अर्थ लावता येण्याची शक्यता अभिजात कलाकृतीत असते. नियमबद्धता पाळूनही स्वतंत्र रचना आणि विविध अर्थ प्रसवणारी कलाकृती अभिजात असते. म्हणूनच ती कालातीतही असते. कलात्मक प्रमाणबद्धता, भव्योदात्त आशय व शाश्वत सत्यांचे प्रतिपादन या बाबतींत आढळते. आदर्श व अनुकरणीय ठरणारे जे साहित्य, ते अभिजाततावादी होय, हा प्रबोधनकाळाचा दृष्टिकोन होता. याउलट लोककलांमधे नियम झुगारून देणारी मुक्त अभिव्यक्ती, उत्तमाचा ध्यास न धरता सहजपणे अभिव्यक्त होणं आणि त्यामुळे जास्त लोकांपर्यंत पोहोचणं ही स्वाभाविक वैशिष्टये दिसतात. तर अभिजाततेत सदभिरुची, प्रातिनिधिक स्वभावचित्रण, सामाजिक उद्बोधन व आशय-अभिव्यक्तीमधील सर्वांगीण औचित्यविचार यांचा प्राधान्याने विचार असतो.
याच आधारावर कालांतराने संस्कृत, चायनीज, जॅपनीज, अरेबिक या प्राचीन साहित्यालाही अभिजात साहित्याचा मान मिळाला. प्राचीन कालखंड, धार्मिक विचार, राजसत्तांचा साहित्यावर प्रभाव आणि पद्यातून अभिव्यक्ती हे या परंपरांचे वैशिष्टय आहे. हीच वैशिष्टये जगभरातील प्राचीन अभिजात वाङ्मयातून प्रगट होतात. अभिजातता कमी-अधिक फरकाने कला, स्थापत्य, भाषा, विज्ञान अशाप्रकारच्या मानवी जीवनाच्या सर्व अंगामध्ये एकाच वेळी अस्तित्वात येते.
संस्कृत या भारतातील प्राचीनतम भाषेचे उदाहरण या संदर्भात पाहणे युक्त ठरेल. ऋग्वेदापासून अथवा त्याच्याही आधीपासून संस्कृतात साहित्याची निर्मिती होऊ लागली. ऋग्वेदाची रचना ही साधे आणि शिथिल छंद आणि व्याकरण यांच्या अनुषंगाने झालेली दिसते. ऋग्वेदापासून उपनिषदांपर्यंतची रचना कमी-अधिक फरकाने याच प्रकारात मोडते. यानंतर निर्माण झालेल्या महाभारत आणि रामायण या ऋषिनिर्मित साहित्यात भाषा अधिक सुघटित झाली. तिच्यातील वैदिक स्वरांचा लोप झाला. या भाषारचनेला व्याकरणाने आणि छंदःशास्त्राने नियमबद्ध केले. त्यानंतर मात्र“जे पाणिनीला ज्ञात नाही ते व्याकरणदृष्ट्या अशुद्ध” असे समजले जाऊ लागले. शिथिल छंदांचेही रूपांतर बांधीव अशा अक्षररगणवृत्तांमध्ये झाले. वृत्तांची लांबी आणि संख्या वाढू लागली. अशाच प्रकारचे निश्चित निकष आणि नियम हे अलंकार, शैली, रस यांच्या संदर्भातही निर्माण झाले.
भारतीय प्राचीन अभिव्यक्तीमध्ये जैन आणि बौद्ध वाङ्मयाची परंपरा समृद्ध करणारे पाली आणि प्राकृत भाषेतील ग्रंथही मौलिक आहेत. त्या साहित्याने भारतीय समाजाला समृद्ध आणि विचारशील केलेच पण हे साहित्य आणि त्यातील विचारधन जगातील अनेक देशांमध्ये फार पूर्वीच स्वीकारले गेले. श्रीलंका, चीन, जपान, थायलंड, म्यानमार, भूतान, कोरिया, व्हिएतनाम, कंबोडिया, सिंगापूर, मंगोलिया, तैवान, हाँगकाँग इत्यादी देशांत बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म म्हणून स्वीकारला गेला. त्या त्या ठिकाणच्या भाषांमध्ये मूळ पाली व संस्कृत ग्रंथ भाषांतरित झाले. त्यातील अनेक ग्रंथांचे आजही वाचन होते. जैन संप्रदायाचे ग्रंथ संस्कृत, प्राकृत तसेच अपभ्रंश भाषांमध्ये आहेत. अनेक राजे, व्यापारी तसेच सामान्यजनांनी देखील या धर्मांचा व त्यातील साहित्याचा स्वीकार मोठया प्रमाणावर केला होता. त्यामुळे पाली, प्राकृत, अपभ्रंश, बौद्ध संकर संस्कृत वाङ्मयाचाही अभिजात साहित्यात समावेश करण्यात येतो.
अभिजात भाषा म्हणजे ‘मृत’ भाषा असे मानण्याची भाषाशास्त्राची रीत आहे. शास्त्रीय परिभाषा तयार करणे आणि धार्मिक कृत्ये या प्रयोजनांव्यतिरिक्त प्राचीन ग्रीक, लॅटिन इत्यादी भाषा आज वापरात नाहीत यामुळे ही कल्पना अस्तित्वात आलेली आहे. या भाषांच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्नही होताना दिसत नाहीत. भारतात मात्र अशी स्थिती नाही. वरील दोन प्रयोजनांव्यतिरिक्त संस्कृतादी प्राचीन भाषा आणि लिपी यांचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न होत आहेत. तसेच भारत सरकारने अभिजात मानलेल्या तमिळ, कन्नड, तेलुगू, हिन्दी इत्यादी भाषांमध्ये लोकव्यवहार आजही सुरू आहे. त्यामुळे अभिजात भाषा म्हणजे सर्वस्वी मृत भाषा ही कल्पना भारतीय भाषांना पूर्णपणे लागू पडत नाही.
५ फेब्रुवारी २०१४ रोजी भारत सरकारने भारतीय भाषांच्या अभिजाततेसंबंधी पुढील नियम निश्चित केले. ती भाषा १५०० ते २००० वर्षांहून जुनी असावी आणि जुने वाङ्मय त्या भाषेत असावे. त्या भाषेतील प्राचीन वाङ्मय मौल्यवान वारसा म्हणता यावे अशा स्वरूपाचे असावे. त्या भाषेला स्वतन्त्र आणि दुसर्या भाषेवर अवलंबून नसलेली वाङ्मयीन परंपरा असावी. जुनी भाषा आणि तिची नंतरची रूपे ह्यांमध्ये अंतर असावे. या कसोटयांवर केन्द्र सरकारने १७ सप्टेंबर २००४ ह्या दिवशी तमिळ भाषा ‘अभिजात’ असल्याचे घोषित केले. २००५ मध्ये संस्कृत, २००८ मध्ये कन्नड व तेलगू, २०१३ मध्ये मल्याळम् आणि २०१४ साली ओडिया या भाषांना अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आला.
या ज्ञानमंडळातून भारतीय तसेच जागतिक अभिजात भाषा आणि त्यातील साहित्य या सर्वांचा समावेश करण्यात आला आहे.