निसर्ग आणि गणित यामधील अतूट संबंध अतिप्राचीन काळापासून मानव शोधत आहे. पशुपक्षी, वनस्पती, मनुष्य यांच्या शरीररचनेत, ते बांधत असलेल्या निवाऱ्यांमध्ये मानवनिर्मित सर्व गोष्टींमध्ये एवढेच नव्हे तर निसर्गात घडणाऱ्या सर्व खगोलीय घटनांमागे गणितीय संकल्पना दडलेल्या आहेत. प्राचीन काळातच निसर्गातील विविध गोष्टींचे निरीक्षण नोंदविताना कधीतरी अंकांचा जन्म झाला असावा आणि त्यातूनच पुढे सर्व शास्त्रांचे मूळ असणाऱ्या गणितशास्त्राचा जन्म झाला असावा.माणसाने गणितशास्त्राची निर्मिती आपल्या आजूबाजूचे जग कसे आहे? त्यात अनेक परस्पर संबंध नसलेल्या ज्या घटना घडत असतात त्यांचा उगम आणि अंत जाणून घेण्यासाठी केला असेही म्हणता येईल.गणितशास्त्र म्हणजे माणसाने निर्माण केलेली आद्य आणि सर्वोच्च विद्या आहे.अतिप्राचीन काळापासून जवळजवळ सगळ्याच संस्कृतींमध्ये गणिताची सुरवात झालेली आढळते. भारताला तर गणिताची महान परंपरा आहे.
गणित या शब्दाची व्याख्या गणेशदेवज्ञ यांनी आपल्या बुद्धिविलासिनी या ग्रंथात पुढीलप्रकारे केली आहे. “गण्यतेसंख्यायतेतद् गणितम्l”म्हणजे ज्याद्वारे परिकलन केले जाते किंवा मोजदाद केली जाते.ते गणित होय. गणित म्हणजे निरीक्षणातून आलेल्या निष्कर्षांची, संकल्पनांची सूत्रबद्धरीतीने मांडणी करून त्यातील सहसंबंध दर्शविणारी सूक्ष्म वैज्ञानिक प्रणाली होय.गणिताशास्त्रात नुसते अंक,चिन्हे एवढेच नसतात तर शून्य,अनंत अशा संकल्पनाही असतात.
गणितशास्त्राचा उपयोग भौतिक, रसायन, खगोल, व्यापार, भूगोल, समाजशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी अनेक शास्त्रांमध्ये होतोच याशिवाय संगीत, चित्रकला इत्यादी कलांमध्येहीहोतो संगणकशास्त्राचा पाया गणितशास्त्रातच आहे. यामुळेच गणितशास्त्रचा अभ्यास करणे अनिवार्य झाले .
“सांख्यिकी म्हणजे संख्यात्मक व वर्णनात्मक माहिती (डेटा) गोळा करणे, त्याची पुनर्मांडणी करणे, त्याचे विश्लेषण करून त्याचा निष्कर्ष काढणे व यांच्या विविध पद्धतींचा शास्त्रीय अभ्यास होय”. नियोजनासाठीसंख्याशास्त्राचा उपयोग अनिवार्य आहे. या नियोजनाच्या युगात सरकार किंवा व्यावसायिक संख्याशास्त्राचा उपयोग करून कामांमध्ये कार्यक्षमता आणतात. आधुनिक काळात संख्याशास्त्राच्या मदतीने विमाशास्त्राचा अधिक विकास झाला व त्यातून विमा गणितशास्त्र ही संख्याशास्त्राची नवीन शाखा उदयास आली.
संख्याशास्त्राचा अर्थशास्त्रात,जीवशास्त्रात,खगोलशास्त्रात, वैद्यकीयशास्त्रात, मानसशास्त्रात अचूक निर्णयासाठी उपयोग केला जातो. संरक्षणशास्त्रातही संख्याशास्त्राचा उपयोग केला जातो. तसेच क्रीडा, कृषी, वाणिज्य, मानव्यविद्या, संगणकशास्त्र, हवामानशास्त्र अशा क्षेत्रातही संख्याशास्त्राचा उपयोग अनिवार्य आहे.विश्वातील एकही क्षेत्र असे नाही, जेथे संख्याशास्त्राचा वापर होत नाही.जीवनातील प्रत्यक घडामोडीत संख्याशास्त्राचे दर्शन होते. जन्मापासून मृत्यू पर्यंत मानवी जीवनाचा संख्याशास्त्राशी संबंध येतो, म्हणून संख्याशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे.
जातस्य हि ध्रुवा संख्या ध्रुवा संख्या मृतस्य च ।
तस्मादपरिहार्येSर्थे संख्याशास्त्रं पठाम्यहम् ॥