भारत देश विविध नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तींना वारंवार बळी पडतो आणि ही संकटे देशाच्या विकासात व्यत्यय निर्माण करतात. घटना घडते तेव्हा प्रतिसाद व्यवस्थापनाला प्रशासकीय व्यवस्था, नागरी समुदाय आणि विविध संस्थांनी मोठ्या प्रमाणात हातभार लावण्याची आवश्यकता असते. प्रतिसाद व्यवस्थापनाचा कृती आराखडा संकटाचे स्वरूप व प्रकार यांवर अवलंबून असतो. संकटादरम्यान संसाधनांच्या अभावाबरोबर विविध यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव आणि विविध सहभागी व खाते प्रमुखांमधील भूमिकेच्या स्पष्टतेचा अभाव ही गंभीर आव्हाने ठरतात. जर प्रतिसाद सुनियोजित असेल आणि सहभागी आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षित असतील, तर कामचलाऊ स्वरूपाच्या उपायांना वाव मिळणार नाही आणि प्रतिसाद वाकबगार व परिणामकारक होईल. जबाबदाऱ्या परिणामकारकपणे पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांची पूर्वनियुक्ती करणे तसेच त्यांना त्यांच्या अपेक्षित भूमिकांबाबत प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

प्रतिसाद प्रक्रियेदरम्यान जाणवणाऱ्या गंभीर स्वरूपांच्या अडचणींना तोंड देण्याचे मार्ग सुचविण्याच्या दृष्टीने भारत सरकारने नेमलेल्या उच्च स्तरीय समितीने याबाबतीत  जागतिक स्तरावरील उत्कृष्ट कार्यप्रणाली म्हणून मानली जाणारी अमेरिकेची ‘Incident Command System’ अनुसरण्याची शिफारस केली होती. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने  आपल्या २००९च्या ‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन धोरणा’त या प्रस्तावाचा समावेश केला. त्याचे नामकरण जरी ‘घटना प्रतिसाद प्रणाली’ असे केले गेले तरीही अमेरिकेच्या ‘Incident Command System’ या प्रणालीची तत्त्वे भारताच्या प्रतिसाद प्रणालीत वापरण्यात यावीत असे नमूद करण्यात आले. जुलै २०१०मध्ये ‘घटना प्रतिसाद प्रणाली’च्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या गेल्या. हया मार्गदर्शक सूचनांमध्ये राज्य व जिल्हा पातळींवर प्रत्येकी दोन आय. आर.एस.चे गट स्थापन करण्यात यावे असा उल्लेख आहे.

सर्व प्रकारच्या आणीबाणी प्रतिसाद घटकांना उपयोगात आणता येईल अशी एकच प्रमाण (Standard) घटक व्यवस्थापन यंत्रणा विकसित करण्याची गरज आहे असे घटना प्रतिसाद प्रणालीत  नमूद करण्यात आले आहे. अशी मानक घटक व्यवस्थापन यंत्रणा अस्तित्वात आल्यानंतर यंत्रणेचे हे घटक कोणत्याही  आपत्ती घटनेदरम्यान भारतात आपण कुठेही वापरू शकू अशी यामागील संकल्पना आहे.

या प्रणालीची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी खालील चार महत्त्वाच्या गोष्टींची आवश्यकता आहे :

  • सर्व प्रकारच्या आणि आकाराच्या घटनांचा/आणीबाणींचा सामना करण्यासाठी संघटनात्मक पातळीवर संघटनेत लवचिकत्व असले पाहिजे.
  • विविध खात्यांमधून आणि विविध भौगोलिक ठिकाणांवरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेगाने सामान्य व्यवस्थापन रचनेमध्ये एकजीव होण्यासाठी यंत्रणेत पुरेशा स्वरूपात प्रमाणीकरण (Standardization) अंतर्भूत असले पाहिजे.
  • व्यवस्था किमान खर्चिक असली पाहिजे.
  • ही प्रणाली दैनंदिन परिस्थितीत उदभवणाऱ्या घटना आणि तसेच अत्यंत गंभीर घटना या सर्वांमध्ये त्याच प्रमाणात उपयोगी पडली पाहिजे.

आपत्तीचा प्रकार, आपत्तीची प्रखरता, हानीचे प्रमाण, धोका वाढण्याची शक्यता, आपत्तीने व्यापलेला भौगोलिक किंवा व्यवस्थापकीय प्रदेश या सगळ्याचा विचार करून या प्रतिसाद प्रणालीचे संगठन केले जाते. संगठना कोणत्या सरकारी स्तरावर राबवायची हा विचारसुद्धा  त्या त्या वेळेस केला जातो. घडलेल्या घटनेचे स्वरूप सारखे बदलत असते. त्यानुसार  घटनाप्रणाली प्रमुखाला  वेळोवेळी आपली व्यूहरचना, उद्दिष्ट आणि

डावपेच बदलावे लागतात. या प्रणालीत प्रत्येक घटकाचे, काम करणाऱ्या व्यक्तींच्या कामाचे आणि वापरलेल्या सामग्रीचे मूल्यमापन होते. प्रत्येक व्यक्तीच्या आणि  घटकाच्या कामाची आखणी काटेकोरपणे होते. या प्रणालीत समन्वयाचे आणि उत्तरदायित्वाचे महत्त्व प्रामुख्याने असल्यामुळे आपत्तींवर नियंत्रण मिळविण्याचे आणि क्षतिग्रस्त समाजाला मदत करण्याचे काम जास्तीत जास्त क्षमतेने होऊ शकते.

संदर्भ :

  • Coppola, Damon, Introduction to International Disaster Management, Oxford, 2015.
  • Government of India Policies and IRS Training Material by National Institute of Disaster Management (NIDM)

समीक्षक – सु. र. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा