प्रस्तावना : विविध आपत्ती संदर्भांत प्रतिबंध, निवारण, पूर्वतयारी, प्रतिसाद, मदत व पुनर्वसन इत्यादी बाबी सुव्यवस्थितपणे हाताळण्यासाठी केंद्र शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा (२००५) दिनांक २३ डिसेंबर २००५ रोजी अमलात आणला. सदर कायद्यातील कलम २५ च्या उपकलम (१) नुसार अधिसूचना जारी झाल्यानंतर अधिकृत राजपत्रात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केले जाते. महाराष्ट्रात दिनांक १ जून २००६ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची रचना खालीलप्रमाणे केली आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची रचना :

अ. क्र. पदनाम प्राधिकरणातील पद
१. जिल्हाधिकारी पदसिद्ध अध्यक्ष
२. अध्यक्ष, जिल्हा परिषद पदसिद्ध सह-अध्यक्ष
३. मुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य
४. जिल्हा पोलीस अधिक्षक सदस्य
५. जिल्हा शल्य चिकित्सक सदस्य
६. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग सदस्य
७. कार्यकारी अभियंता, पाटबंधारे कार्यकारी अभियंता
८. निवासी उपजिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी
९. महानगरपालिका आयुक्त/पोलीस आयुक्त/समादेशक राज्य राखीव पोलीस दल/एन.सी.सी., गृहरक्षक दल व नागरी संरक्षण दल आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी विशेष निमंत्रित

उपरोक्त नमूद व्यवस्था ही केंद्र शासनाचा आपत्ती व्यवस्थापन कायदा (२००५) च्या तरतुदींशी सुसंगत आहे. प्राधिकरणाद्वारे या कायद्याच्या कलम २८ नुसार आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबींसंदर्भात शिफारशी प्राधिकरणाला आवश्यकता असेल, तेव्हा आपत्ती व्यवस्थापनातील तज्ज्ञ आणि प्रत्यक्ष अनुभव असलेल्या व्यक्तींचा समावेश असलेली सल्लागार समिती नेमण्यात येते. ‍

आवश्यकता : जिल्ह्यात गाव पातळीवरील घडलेल्या पत्येक आपत्तींची माहिती तालुक्याकडून लवकरात लवकर प्राप्त करून सदर ठिकाणी तत्काळ मदत पोहोचविणे, आपत्तीग्रस्त तालुक्याशी वारंवार चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेणे, शोध व बचाव कार्यासाठी मदत पाठवणे, एकंदरीत सांगांयचे झाल्यास संबंधित आपत्तीला प्रतिसाद/तोंड देणे, जीवित व वित्त हानी कमी करणे, आपत्तीची पूर्वतयारी करणे, लोकांना आपत्तीसंदर्भात जागृत करणे, प्राधिकरणास आवश्यकता वाटल्यास शासकीय व खाजगी मालमत्तेचे लोकहितासाठी अधिग्रहण करणे इ. कार्यांसाठी प्राधिकरणाची गरज भासते.

संदर्भ :

  • राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५.

समीक्षक : सतीश पाटील