देव, शांताराम भालचंद्र : (९ जून १९२३–१ ऑक्टोबर १९९६). आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पुरातत्त्वज्ञ, भारतीय महापाषाणीय संस्कृतीचे संशोधक आणि पुण्यातील प्रसिद्ध डेक्कन कॉलेजचे (डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, पुणे) निवृत्त संचालक. त्यांचा जन्म पुण्याजवळील तळेगाव ढमढेरे येथे झाला. त्यांनी शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल (१९३९), तर उच्च शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयातून पूर्ण केले (१९३९–४७). फर्ग्युसन महाविद्यालयात असताना ते ब्रह्मे शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले. महाविद्यालयातील आर. डी. वाडेकर या तत्त्वज्ञानाच्या शिक्षकांमुळे त्यांना प्राकृत साहित्य आणि जर्मन भाषेमध्ये रुची निर्माण झाली. पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठातून पाली आणि अर्धमागधी भाषांमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली (१९४७).
देव यांनी डेक्कन कॉलेजच्या संस्कृत शब्दकोश विभागात संशोधन सहायक म्हणून त्यांनी काम केले (१९४८–५२). या संस्थेचे तत्कालीन संचालक आणि पुरातत्त्वज्ञ ह. धी. सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘अभिलेख आणि जैन वाङ्मय यांतून होणारे मुनिजीवनाचे दर्शनʼ (इ. स. पू. तिसरे शतक ते इ. स. अठरावे शतक) (History of Jaina Monachism from Inscriptions and Literature) या विषयात विद्यावाचस्पती (पीएच.डी) पदवी प्राप्त केली (१९५२). हे संशोधन चालू असतानाच सांकलिया यांनी त्यांना शिशुपालगड, ओरिसा येथे पुरातत्त्वीय क्षेत्रसंशोधनाच्या प्रशिक्षणास पाठविले (१९४८). सांकलिया यांनी स्वतःच्या लांघणज, नाशिक, जोर्वे, नावडातोडी इत्यादी विविध उत्खनन-मोहिमांमध्ये देव यांना सहभागी करून घेतले (१९४९–५३). या प्रशिक्षणामुळे त्यांना उत्खननांमध्ये सापडलेले पुरातत्त्वीय अवशेष (खापरे इ.) हाताळणे, त्यांचे वर्गीकरण करणे तसेच संशोधन अहवाल तयार करण्यासाठी उपयुक्त अशा क्षेत्रीय नोंदी करणे इत्यादी गोष्टी तेथे प्रत्यक्ष शिकता आल्या.
देव यांची कठोर मेहनत घ्यायची तयारी आणि सखोल अभ्यासू वृत्ती बघून लवकरच सांकलिया यांनी त्यांना डेक्कन कॉलेजमध्येच अधिव्याख्याता म्हणून सामावून घेतले (१९५४). पुढे त्यांची प्रपाठकपदी पदोन्नती झाली (१९५६). सुरुवातीला त्यांनी १९६३ पर्यंत डेक्कन कॉलेजमध्ये संशोधन व अध्यापनाचे कार्य केले. या काळात नेवासा, नावडातोडी, चांडोली (१९५४–६१) या प्रामुख्याने ताम्रपाषाणीय तसेच अहाड (१९६१-६२) या आद्य ऐतिहासिक पुरास्थळी सांकलिया यांनी राबविलेल्या उत्खनन मोहिमांमध्ये त्यांनी सक्रिय भाग घेतला. यामुळे सिंधू संस्कृती आणि प्राचीन ऐतिहासिक कालखंडाच्या दरम्यान जो तथाकथित संधिकाल (Dark Age) होता, त्या कालखंडातील पुरातत्त्वीय साहित्य उपलब्ध झाले आणि दोन्ही कालखंडांतील अंतर मिटण्यास या अवशेषांची मदत झाली. विशेषतः ऐतिहासिक काळापूर्वीच्या महाराष्ट्राचा अज्ञात सांस्कृतिक इतिहास या संशोधनामुळे उजेडात आला.
देव यांची भारत सरकारने कोलंबो योजनेंतर्गत नेपाळच्या त्रिभुवन विद्यापीठ, काठमांडू येथे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली (१९६३–६५). या कालावधीत त्यांनी तेथे प्राचीन भारतीय संस्कृती व पुरातत्त्व विभाग प्रस्थापित केला आणि दोन सर्वेक्षण-उत्खनन मोहिमा राबविल्या. शिवाय काठमांडू येथे नेपाळच्या काष्ठशिल्पकामाचा आणि मंदिर-स्थापत्यरचनेचा तपशीलवार अभ्यासही केला. यानंतर ते नागपूर विद्यापीठात प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख या नात्याने रुजू झाले (१९६६–७४). तेथे त्यांनी पुरातत्त्वीय विभागाची स्थापना करून शास्त्रीय संशोधनास चालना दिली. या काळात त्यांनी विद्यापीठातर्फे पवनार, टाकळघाट-खापा, पवनी, माहुरझरी, भोकरदन अशा महाराष्ट्रातील विविध आद्य लोहयुगीन महापाषाणीय ते प्राचीन ऐतिहासिक स्थळांचे उत्खनन पार पाडले. या उत्खननांमध्ये पवनी येथे इ. स. पू. तिसऱ्या शतकातील भव्य असा स्तूप उजेडात आला; तर टाकळघाट व माहुरझरी येथे महापाषाणीय दफनस्थळे व वस्तीचे पुरावे मिळाले. तसेच पवनार आणि भोकरदन येथे अनुक्रमे वाकाटक व सातवाहनकालीन अवशेष सापडले.
१९७४ मध्ये ते पुन्हा डेक्कन कॉलेजमध्ये पुरातत्त्व विभागप्रमुख म्हणून रुजू झाले. पुढे सांकलिया यांच्या निवृत्तीनंतर ते कॉलेजचे संचालक झाले (१९७८). याच काळात सदर संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त करून देण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले (१९७८–८५). विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून निधी मिळवून त्याचा उपयोग संस्थेच्या परिसरात नवीन इमारती, संग्रहालये आणि कर्मचारीसंख्या वाढवण्यासाठी केला. तसेच या निधीतून ५ नवीन प्रयोगशाळाही उभ्या केल्या. या दरम्यान त्यांनी डेक्कन कॉलेजमधील इतर सहकारी शास्त्रज्ञांबरोबर लोहयुगीन महापाषाणीय संस्कृतीच्या तसेच इतरही पुरास्थळांचे उत्खननकार्य त्यांनी चालू ठेवले. तेर, आपेगाव (अनुक्रमे प्राचीन ऐतिहासिक आणि ताम्रपाषाणीय पुरास्थळे), नैकुंड, माहुरझरी, बोरगाव, खैरवाडा, भागीमाहरी आणि रायपूर येथे उत्खनन-मोहिमा राबविण्यात आल्या (१९७४–८५). त्यांनी आपले उत्खननकार्य महापाषाणीय संस्कृतीतील फक्त दफनास्थळापुरते मर्यादित न ठेवता त्या लोकांच्या निवासस्थानांविषयी माहिती घेण्यासाठीही केले. उदा., नैकुंड (१९७७-७८) व भागीमाहरी (१९८३-८४) येथील उत्खनन. लोखंडाचा वापर करणाऱ्या दक्षिण भारतातील या लोकांच्या जीवनपद्धतीतील विविध पैलूंवर या उत्खननांमुळे प्रकाश पडला. येथील महापाषाणीय संस्कृतीचा त्यांनी मुळापासून शोध घेतला. त्यासाठी त्यांनी विदर्भ हा भाग निवडला. तेथे प्रदीर्घ अशा सर्वेक्षण-उत्खनन मोहिमा काढल्या (१९६७–८५). त्यांतून प्रकाशात आलेल्या वैदर्भीय महापाषाणीय संस्कृतीचे पैलू हे तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि केरळ येथील महापाषाणीय संस्कृतीशी ताडून पाहिले. यामुळे विदर्भ प्रदेशाला कालक्रमाची एक चौकट प्राप्त झाली. इ. स. पू. सातव्या शतकातील लोखंडी वस्तूचा पुरातत्त्वीय अवशेष याच संस्कृतीतील असल्याचे सिद्ध झाले. विदर्भात लोहतंत्रज्ञान वापरण्याची सुरुवात याच महापाषाणीय संस्कृतीच्या लोकांनी केली असल्याची खात्री त्यांच्या संशोधनकार्यामुळे पटली. देव यांचे पुरातत्त्व व भारतविद्येमधील भरीव कार्य पाहून महाराष्ट्र शासनाने त्यांची डेक्कन कॉलेजमध्येच गुणश्री प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली (१९८५).
पुढे डेक्कन कॉलेजमधून निवृत्त झाल्यावर ते भारत इतिहास अनुसंधान परिषदेचे (ICHR) वरिष्ठ शिष्यवृत्तीधारक म्हणून दोन प्रकल्पांवर कार्यरत राहिले (१९८५-८८;१९९०-९३). यांपैकी एका प्रकल्पामध्ये त्यांनी प्राचीन भारतीय मण्यांविषयीचा प्रबंध पूर्ण केला. पुढे यावर डेक्कन कॉलेजतर्फे इंडियन बीड्स : अ कल्चरल अँड टेक्नोलॉजिकल स्टडी हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले (२०००). दुसऱ्या प्रकल्पात त्यांनी १९९३ पर्यंत मिळालेला विदर्भातील महापाषाणीय संस्कृतीचा पुरातत्त्वीय पुरावा नव्याने तपासून त्याचे वेगळ्या दृष्टीकोनातून विश्लेषण केले. याच काळात त्यांनी दिल्लीच्या भोगीलाल इन्स्टिट्यूट ऑफ इंडॉलॉजीचे संचालक म्हणूनही काम पाहिले (१९८९-९०). देव यांचे जैन धर्म, साहित्य आणि आचारविषयक संशोधनही उल्लेखनीय आहे. हे संशोधन जैन मुनिसंघ, मुनिसंघातील न्यायव्यवस्था, जैन धर्माचे साहित्य या प्रमुख कार्यक्षेत्रासंबंधी होते. जैन धर्माच्या सखोल अभ्यासासाठी त्यांना दक्षिण भारत जैन सभेतर्फे आचार्य श्री विद्यानंदजी साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले (१९९३).
देव यांनी बडोदा, बनारस, धारवाड, मद्रास, म्हैसूर इ. भारतीय विद्यापीठांसह नेपाळ, रशिया, जर्मनी, इंग्लंड, स्वित्झर्लंड, अमेरिका येथील विद्यापीठांत व्याख्याने आणि परिषदांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या सत्रांचे तसेच इतर विविध संस्थांच्या वार्षिक पुरातत्त्वीय परिषदांचे त्यांनी अध्यक्षपद वेळोवेळी भूषविले. ‘आर्यांचा प्रश्न’ (१९९१) व ‘युगायुगांतील नाशिक’ (१९९६) या महत्त्वाच्या परिसंवादांचे ते प्रमुख निमंत्रक होते. तसेच विद्यापीठ अनुदान आयोग, भारत इतिहास अनुसंधान परिषद, भारतीय सर्वेक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य पुराभिलेख व पुरातत्त्व मंडळ, भारत सरकारचे पुरातत्त्वीय केंद्रीय सल्लागार मंडळ, राष्ट्रीय संग्रहालयाची कलाविक्री समिती अशा विविध संस्थांच्या समित्यांवर त्यांनी काम पाहिले.
देव यांची ग्रंथसंपदा विपुल असून त्यांच्या सु. ३५ पुस्तकांतून त्यांचे सखोल संशोधन आणि व्यासंगी अभ्यास दिसून येतो. तसेच विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून त्यांचे सु. १०० संशोधनलेख व विविध पुस्तकांची परीक्षणे प्रसिद्ध झाली आहेत. मराठी विश्वकोशात व काही इंग्रजी विश्वकोशांत त्यांनी पुरातत्त्वीय उत्खननांविषयी अभ्यासयुक्त व अद्ययावत नोंदींचे लेखन केले. त्यांच्या ग्रंथांना विविध पुरस्कार प्राप्त झाले. दै. सकाळ, पुणे यांच्यावतीने जैन संप्रदाय व संस्कृती – काही विचार या पुस्तकासाठी साहित्य पुरस्कार (१९६३); तर महाराष्ट्रातील उत्खनने (१९६३), महाराष्ट्र – एक पुरातत्त्वीय समालोचन (१९७१) व पुरातत्त्वविद्या (१९७९) या पुस्तकांसाठी महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले. त्यांचे महाराष्ट्राचा इतिहास : प्रागैतिहासिक महाराष्ट्र (खंड पहिला, भाग १) हे पुस्तक त्यांच्या मरणोत्तर प्रसिध्द झाले (२००२). त्यांनी सामान्य लोकांसाठी उत्खनन स्थळी प्रदर्शने आयोजित केली, व्याख्याने दिली. तसेच विविध आकाशवाणी केंद्रांवरून एकूण २६ मराठी व इंग्रजी व्याख्याने वेळोवेळी दिली (१९५७-८७). शिवाय दै. सकाळ, दै. केसरी या वृत्तपत्रांमधून संशोधनपर लेखमाला लिहिल्या.
देव यांनी पुरातत्त्व, भारतीय कला, स्थापत्यशास्त्र, पुराभिलेख, नाणकशास्त्र, प्राचीन साहित्य आणि जैन धर्म या विविध विषयांमध्ये भरीव योगदान दिले. त्यांच्या प्रदीर्घ संशोधनकार्याला मानवंदना म्हणून त्यांचे सहकारी, विद्यार्थी व हितचिंतक यांनी स्पेक्ट्रम ऑफ इंडियन कल्चर हा गौरवग्रंथ प्रकाशित केला (१९९६).
त्यांचे पुणे येथे निधन झाले.
संदर्भ :
- Margabandhu, C.; Ramachandra, K. S. Eds., Spectrum of Indian Culture : Prof. S. B. Deo Felicitation Volume (2 Volumes), Delhi, 1996.
- Paddayya, K. Essays in History of Archeology : Themes, Institutions and Personalities, Archaeological Survey of India, New Delhi, 2013.
- Paddayya, K.; Joshi, P. S. ‘Obituary : Dr. S. B. Deoʼ, Man and Environment, Pune, 1996.
- Jamkhedkar, A. P. ‘Obituary : Dr. S. B. Deoʼ, Bulletin of the Deccan College Research Institute, Vol. 56-57, 1996-97.
- Bhaisare, Kanchana, Prof. S. B. Deo’s Contribution to Indian Archaeology and Indology, Pune, 2005.
समीक्षक – कंचना भैसारे-सरजारे