अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी ॲलाबॅमा राज्य (Alabama State) याच्या दक्षिण भागातून वाहणारी एक नदी. लांबी ५१२ किमी., पात्राची रुंदी ४६ ते १८३ मी., खोली १ ते १२ मी., जलवाहन क्षेत्र ५८,५०० चौ. किमी. ॲलाबॅमा राज्याची राजधानी मंगमरी (Montgomery) या शहरापासून उत्तरेस ११ किमी. वर कूसा आणि टॅलापूसा या दोन नद्यांचा संगम होतो. त्यांचाच संयुक्त प्रवाह पुढे ॲलाबॅमा या नावाने ओळखला जातो. मंगमरीपासून सेल्मा शहरापर्यंत ॲलाबॅमा नदी पुढे पश्चिमेकडे वाहते व त्यानंतर नैऋत्येस वाहत जाते. सेल्मापासून २७ किमी. अंतरावर तिला उजवीकडून कहॉब ही ३१२ किमी. लांबीची उपनदी येऊन मिळते. मोबील शहराच्या उत्तरेस ७१ किमी.वर तिला टॉमबिग्बी नदी उजवीकडून येऊन मिळते. ॲलाबॅमा व टॉमबिग्बी यांचा संयुक्त प्रवाह मोबील या नावाने ओळखला जातो. मोबील नावानेच तो मेक्सिकोच्या आखातातील मोबील उपसागराला मिळतो. ॲलाबॅमा नदीमार्गात अनेक नागमोडी वळणे आढळतात.
कूसा-ॲलाबॅमा नद्यांच्या खोऱ्यात उभारलेल्या धरणांचा आणि त्यांच्या जलपाशांचा फायदा राज्याच्या विकासास झाला आहे. ॲलाबॅमा नदीवर बांधलेल्या धरणांमुळे आर. ई. ‘बॉब’ वुड्रफ, विल्यम डॅनली आणि क्लेबर्न हे तीन जलपाश निर्माण झाले आहेत. या जलपाशांतील पाण्याचा उपयोग जलसिंचन व जलविद्युतनिर्मितीसाठी केला जातो. जलवाहतुकीच्या दृष्टीने नदीपात्रात पाण्याची खोली साधारण २.७ मी. राहील या दृष्टीने गरजेनुसार या जलपाशांतून पाणी सोडले जाते. त्यामुळे ॲलाबॅमा नदीच्या संपूर्ण प्रवाहमार्गातून वर्षभर जलवाहतूक होते. सरोवरे आणि जलपाशांचा उपयोग मनोरंजनासाठीही केला जातो. अंतर्गत जलमार्ग वाहतुकीच्या उपलब्धतेमुळेच तिच्या काठावरील मंगमरी आणि मोबील या शहरांचा विशेष विकास झाला आहे. या नदीतून वाळू, रेती, लाकूड, खते, कापूस इत्यादी मालाची वाहतूक केली जाते. नदीखोऱ्यात समृद्ध कृषी आणि वनक्षेत्रे आहेत. कूसा ही उपनदी राज्यातील समृद्ध खनिजक्षेत्रातून वाहते.
स्पॅनिश समन्वेषक एर्नांदो दे सोतो (Hernando de Soto) हे ॲलाबॅमा नदीचे १५४० मध्ये समन्वेषण करणारे पहिले यूरोपीय आहे. फ्रेंच आणि ब्रिटिश फर व्यापाऱ्यांनी अठराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात लहान होड्यांमधून कूसा व ॲलाबॅमा या नद्यांमधून प्रवास केला होता. फ्रेंचांनी १७१४ मध्ये कूसा व टॅलापूसा नद्यांच्या संगमावर तूलूझ किल्ला बांधला. निग्रो गुलामांचा व्यापार करणाऱ्या स्पॅनिश वसाहतकऱ्यांनी ॲलाबॅमा नदीच्या खालच्या खोऱ्यात वृक्षतोड करून बरेचसे क्षेत्र भात व नीळ या पिकांच्या लागवडीखाली आणले होते. मंगमरी, सेल्मा आणि मोबील हे या नदीखोऱ्यातील प्रमुख शहरे आहेत.
समीक्षक – अविनाश पंडित