निवाऱ्यासाठी, संरक्षणासाठी तसेच अंडी घालण्यासाठी व त्यामधून बाहेर येणाऱ्या पिलांची जोपासना करण्यासाठी सजीव प्राणी जी रचना बांधतात व वापरतात त्या रचनेला घरटे म्हणतात. सामान्यपणे प्रत्येक जातीतील सजीवांच्या घरट्यांची शैली विशिष्ट असते आणि त्यानुसार ते सजीव ओळखता येऊ शकतात. अनेक वेगवेगळ्या अधिवासांत घरटी आढळून येतात. काही सजीव मात्र स्वत: घर न तयार करता इतरांनी बनविलेल्या किंवा सोडून दिलेल्या घरट्यांचा वापर करतात.
कीटक सामान्यपणे आपली अंडी जमिनीत उथळ भोक पाडून पुरतात किंवा झाडांच्या सालीच्या भेगांत घालतात. बहुतेक कीटकांच्या मादयांना अंडी घालण्यासाठी अंडनिक्षेपांग असल्यामुळे सालीत किंवा दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात अंडी घालता येतात. काही कीटक अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा तयार करतात. त्याची रचना लांब बोळासारखी असून त्यात भरपूर अन्न साठवून ठेवतात आणि अंडी घालतात.
मधमाश्यांचे घरटे (पोळे) खूप मेहनतीने तयार केलेले असते. घरटे बांधण्याचे काम त्यांच्या फक्त मादया करतात. मधमाश्यांचे पोळे मेणाचे असून त्याची रचना गुंतागुंतीची असते. समाजप्रिय गांधील माश्या (ओरिएंटल पेपर वास्प) वनस्पतिजन्य पदार्थ कुरतडून त्याच्या लगदयापासून पोळे तयार करतात. वाळवीचे वारूळ हे देखील एक घरटे असून ते नर व मादया मिळून तयार करतात. मुंग्यांची घरटी जमिनीत किंवा पानांमध्ये असतात. प्रतिकूल हवामानात व इतर धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी पुष्कळदा त्या कोष व अळ्या यांची जागा बदलतात. मुंगळे जमिनीत बीळ पाडून घरटी तयार करतात. कोळ्यांच्या मादया त्यांची अंडी एका पिशवीत घालतात. मादीच्या विणग्रंथीपासून मिळणाऱ्या रेशमी धाग्यापासून ही पिशवी विणलेली असते. ती झाडांच्या सैल सालीत टांगती ठेवलेली असून मादी त्यावर लक्ष ठेवते.
गवळण (कीटकाची) मादी झुडपांच्या काडयांवर स्वत:च्या स्रावापासून सुबकसे घरटे तयार करून त्यात अंडी घालते. झोळी (बॅग वर्म) कीटकांच्या अळ्या काडयांचा आणि स्वत:च्या शरीरातील स्रावाने बनलेले चिवट धागे यांपासून तयार केलेल्या जुडग्यांच्या घरटयात राहतात. त्या हे घरटे सोबत घेऊन वावरतात.
पृष्ठवंशी प्राण्यांची घरटी
मासे : काही मासे घरटी तयार करतात. स्टिकलबॅक मासे समुद्रात तसेच गोडया पाण्यात राहतात. त्यांचे नर पाण्यातील तणापासून घरटी तयार करतात. त्यांच्या वृक्कापासून स्रवणाऱ्या चिकट स्रावाने ते तणांची टोके चिकटवून घर तयार करतात आणि मादीला आकर्षित करतात. मादीने अंडी घातल्यानंतर नर त्यांचे फलन घरटयात करतो आणि अंडी फुटून पिले बाहेर पडेपर्यंत त्यांची काळजी घेतो.
उभयचर : या वर्गातील अनेक बेडूक (हायला) वृक्षांच्या पानांवर, दुमडलेल्या पानांवर तसेच जलाशयाकाठी असलेल्या खडकांना चिकटून चिवट फेसाची घरटी तयार करतात आणि त्यात अंडी घालतात. या घरट्यातून वळवळणारे डिंभ पाण्यात पडतील, अशी रचना असते. हायला फॅबर नावाचे बेडूक पावसाळ्यात अंडी घालण्यापूर्वी जमिनीवर परातीसारखे चिखलाचे हौदासारखे घरटे तयार करून त्यात अंडी घालतात आणि त्याची राखण करतात. आफ्रिकेतील काही जातीचे भेक मातीत खळग्यासारखे घरटे करून त्यात अंडी घालतात आणि अंड्याशेजारी बसून त्यांना ओलावा पुरवितात.
सरीसृप : या वर्गातील प्रत्येक प्राण्याचा जन्म पाण्याबाहेर होतो. त्यांची घरटी साधी असून ते पाण्याबाहेर मातीत किंवा उथळ जागी अंडी घालतात. घरटे काळजीपूर्वक झाकलेले असल्यामुळे ओळखू येत नाही. पुष्कळ साप अशाच प्रकारे खळग्यात, बिळात किंवा मातीत घरटे करून अंडी घालतात. पाणसर्प तणाच्या ढिगाऱ्याचे घरटे करून त्यात अंडी घालतो. मादी नागराज पालापाचोळा एकत्र करून घरटे तयार करून त्यात अंडी घालते आणि घरटयाचे रक्षण करण्यासाठी पहारा देत राहते. मादी मगर रात्री वाळूत वा जमिनीत सु. ६० सेंमी. खोल बिळाचे घरटे करून त्यात अंडी घालते. बीळ तयार झाल्यावर त्याच्या बुडाशी ती २०-३० अंडी घालते व ती वाळूने अथवा मातीने झाकते आणि नंतर त्यावर पुन्हा अंडी घालते. दुसऱ्या वेळी घातलेल्या अंड्यांची संख्या पहिल्या एवढीच असते. नंतर ती बीळ बेमालूमपणे असे बुजवून टाकते की, बाहेरून त्याची जागा ओळखू येत नाही. समुद्रातील वा गोडया पाण्यातील कासवांची मादी किनाऱ्यावरील वाळूत घरटे खणून त्यात अंडी घालते व ते बुजविते. शत्रूंना चकविण्यासाठी कासव अनेक जागी खड्डे करून बुजविते. परंतु त्यांपैकी काही खड्डयांतच कासव अंडी घालते.
पक्षी : प्रजननाच्या काळात नर व मादीची जोडी जमल्यावर पक्षी घरटे बांधण्याच्या तयारीला लागतात. घरटे ज्या भागात बांधावयाचे ते निवडण्याचे काम नर करतो तर प्रत्यक्ष घरटयाची जागा मादी ठरविते. आपल्या चोचीचा व पायांचा उपयोग करून सामान्यपणे मादी घरटे बांधते. काही थोडया जातींत फक्त नरच घरटे बांधतो, तर काही जातींत नर व मादी दोघेही हे काम करतात. पक्ष्यांची घरटी गवत, काटक्या, झाडांची साल, पिसे, कागदांचे तुकडे, चिंध्या, दोऱ्यांचे तुकडे, चिखल, केस, तंतू इ. पदार्थांचा उपयोग करून बनविलेली असतात.
पक्ष्यांची घरटी विविध प्रकारांची असतात. काही अगदी साधी, तर काही अतिशय कुशलतेने तयार केलेली असतात. टिटवीचे घरटे अगदी साधे असते. मनुष्यवस्तीला सरावलेल्या चिमण्या आणि साळुंक्या घरातील वळचणीच्या जागी किंवा तिरक्या बसविलेल्या फोटोफ्रेमच्या मागे चिंध्या किंवा अन्य तंतुमय पदार्थांचा वापर करून जमेल त्या आकाराची घरटी बांधतात. कबुतरे इमारतींमध्ये मिळेल त्या जागी अंडी घालण्यासाठी काडयाकाटक्यांचा वापर करून आपली ओबडधोबड घरटी तयार करतात. बुलबुल व नर्तक यांची घरटी बागेच्या कुंपणावरील झुडपांत किंवा फांदयांच्या बेचक्यांत पानांच्या आड काटक्या व तंतूंचा वापर करून विणीच्या हंगामात बांधली जातात. ही घरटी वाटयांच्या आकाराची व सुबक असतात. कावळे, घारी, बगळे व करकोचे हे पक्षी विणीच्या हंगामातच झाडांच्या फांदयांच्या बेचक्यांत काडयाकाटक्यांच्या साहाय्याने घरटी बांधतात. वेडयावाकडया काटक्यांपासून कौशल्याने बांधलेली घरटी वाऱ्याने झाड कितीही हलले तरी मोडून पडत नाहीत. येणाऱ्या पावसाळ्याचा अंदाज घेऊन पक्षी झाडांवर वेगवेगळ्या उंचींवर घरटी बांधतात.
कोकिळसारखे पक्षी आपली स्वत:ची घरटी बांधत नाहीत. ते कावळ्यासारख्या अन्य पक्ष्याच्या घरटयात त्यांचे अंडे घालतात आणि मूळ पक्ष्याचे एक अंडे घरटयाबाहेर ढकलून देतात. एकच कोकिळा अनेक कावळ्यांच्या घरटयांत आपले एकेक अंडे घालत असते.
पोपट, घुबड व धनेश हे पक्षी झाडांच्या ढोलीमध्ये घरटी तयार करतात. खंडया व वेडा राघू पक्ष्यांची घरटी जलाशयांच्या काठी उतारावर उघडणाऱ्या बिळांत असतात. बिळांच्या पोकळ जागेत अंडी घालून ती उबविण्याचे आणि पिलांना चारा भरविण्याचे काम नर व मादी करतात. सुतार आणि तांबट हे पक्षी वठलेल्या वृक्षांच्या बुंध्यांचे लाकूड कोरून त्यातील पोकळ घरटयांमध्ये आसरा घेतात. शिंपी पक्षी बदामाच्या पानांसारखी रुंद पाने कौशल्याने जुळवून, त्यांच्या कडा धाग्याने शिवून आपली घरटी तयार करतो. आतील अस्तर कापूस किंवा मऊ पिसे वापरून आरामदायक केलेले असते. त्यांची घरटी जमिनीपासून एक मीटर उंचीपर्यंतच असतात. बरोइंग आउल जातीचे घुबड जमिनीतील बिळात घरटे करून राहते.
स्वॅलो व स्विफ्ट या पक्ष्यांची घरटी लाळमिश्रित चिखलाच्या गोळ्यांनी बनविलेली असून वाडग्याच्या आकाराची असतात. पुलांचे छत व खांब आणि इमारतींच्या भिंती यांना ही घरटी चिकटलेली असतात. नैसर्गिक गुहांमधूनही त्यांच्या वसाहती असतात.
सुगरण तसेच बाया पक्ष्यांची घरटी जलाशय काठावरील झाडांच्या फांदयांना व माडांच्या झावळ्यांना लटकलेली असतात. शत्रू तेथे पोहोचू नये, हा त्यामागे उद्देश असतो. अरुंद मानेच्या, उलट्या टांगलेल्या व फुगीर बाटल्यांसारख्या आकाराच्या या सुबक घरट्यांचे बांधकाम प्रथम नर सुरू करतो. हे काम घरटयाच्या मानेपर्यंत आल्यानंतर माद्यांचा थवा येतो. घरटयाची आणि ते बांधणाऱ्या नराची निवड झाल्यानंतर नर-मादी मिळून घरटे पूर्ण करतात. घरटयाची जागा सुरक्षित नसेल किंवा ते पसंत नसेल तर त्या नराला जोडीदार मिळत नाही. घरटे बांधण्याचे कौशल्य जर नरापाशी नसेल तर त्याची वंशवेल खुंटते. नैसर्गिक निवडीचे हे एक उदाहरण आहे. आफ्रिकेतील सुगरण पक्ष्यांच्या काही जाती झाडांवर एकच मोठी वसाहत उभी करतात. या वसाहतीत अनेक घरटी असून प्रत्यकाला स्वतंत्र दार असते.
काही बदके व जलकपोत हे पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पतिजन्य पदार्थांवर तरंगती घरटी बांधतात. गिधाडांची घरटी उंच कडयाकपाऱ्यामध्ये असतात. गरुडाचे घरटे असेच कडयाकपाऱ्यात किंवा झाडावर उंच ठिकाणी असते. गरुड फांदयांच्या बेचक्यात लहानमोठया झाडांच्या वाळलेल्या काटक्यांचा वापर करून २-३ मी. व्यासाचे खोलगट असलेले भक्कम घरटे बांधतात. आतील बाजूला गवत व पानांचे अस्तर असते. गरुडाचे कुटुंब तेच घरटे नीटनेटके करून पिढयानपिढया वापरते. उंच ठिकाणी असलेल्या या घरटयातून त्यांना आजूबाजूचा मोठा परिसर आणि त्यातील भक्ष्य सहज पाहता येते.
सस्तन प्राणी : शेतातील उंदीर जमिनीतील बिळाचे घरटे करून राहतात. त्यात मोठमोठे कप्पे करून त्यामध्ये भुईमुगाच्या शेंगा, भात इ. साठवितात. काही लहान उंदीर उभ्या पिकावर त्यांच्या पानांचा वापर करून घरटी तयार करतात. घुशी जमीन उकरून त्यात बिळे करतात. कापूस व अन्य तंतुमय पदार्थांचा वापर करून खार झाडांवर घरटे बांधते. सशांच्या परिवाराचे घरटे जमिनीतील बिळांमध्ये असते. बीव्हर जातीचे कृतक पाण्यात वावरतात. मोठया जाडीच्या वृक्षांचे सोट कुरतडून, त्यांचा व अन्य काटक्याकुटक्यांचा वापर करून ते धरणासारखी संरचना तयार करतात व नाल्याचे पाणी अडवितात. याच जलाशयाच्या काठावर घरटे करून ते त्यांच्या कुटुंबासह राहतात. त्यांचे स्थापत्यकौशल्य वाखाणण्याजोगे असते.
अंडी घालणारा सस्तन प्राणी बदकचोच्या जलाशयात वावरतो. तो किनाऱ्यावर बीळ खोदून जमिनीखाली घरटे करतो. त्याच्या बिळाचे एक तोंड पाण्याच्या पातळीखाली उघडते,तर दुसरे तोंड किनाऱ्यावर परंतु पाण्याच्या पातळीच्या वर उघडते.
वाघ व सिंहासारखे मांसाहारी प्राणी घरटी तयार करीत नाहीत. ते झाडाझुडपांच्या दाट जाळीत किंवा खडकांमधील गुहांमध्ये राहतात आणि तेथेच पिलांचे संगोपन करतात. माकडे घरटे बांधत नाहीत कारण ते सहसा एका निश्चित जागी राहत नाहीत. कपी मात्र झाडांवर घरटी बांधतात. चिंपँझी, गोरिला व ओरँगउटान रात्रभर विश्रांतीसाठी फांदयांच्या बेचक्यात डहाळ्या व पानांच्या साहाय्याने घरटे तयार करतात.