ॲरो, केनेथ जोसेफ (Arrow Kenneth Joseph) : (२३ ऑगस्ट १९२१ – २१ फेब्रुवारी २०१७). सुप्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. ॲरो याला सूक्ष्म अर्थशास्त्र विषयातील आर्थिक समतोल व कल्याणकारी व्यवस्था यांसंदर्भातील संशोधनाबद्दल प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ सर जॉन रिचर्ड हिक्स (Sir John Richard Hicks) यांच्या बरोबरीने १९७२ मध्ये अर्थशास्त्र विषयातील नोबेल स्मृती पुरस्कार प्राप्त झाला. आजमितीला वयाच्या एक्कावनाव्या वर्षी नोबेल पुरस्कार मिळविणारे ॲरो हे सर्वांत कमी वयाचे अर्थशास्त्रज्ञ आहेत. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर नवमतवादी विचारसरणीचे व आर्थिक विकासाचे खंदा पुरस्कर्कता म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या आर्थिक विचाराचा प्रभाव गेल्या पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ तत्कालीन अर्थतज्ञावर असल्याचे दिसून येते. ॲरो हे शिक्षणतज्ज्ञ व अर्थतज्ज्ञ अनिता सूमर्स यांचे बंधू, अर्थतज्ज्ञ रॉबर्ट सूमर्स (Robert Summers) व अर्थतज्ज्ञ पॉल अँटनी सॅम्युएल्सन (Paul Anthony Samuelson) यांचे मेहुणे होत.
ॲरो यांचा जन्म न्यूयॉर्क शहरात रोमानियन ज्यू कुटुंबात झाला. त्यांनी शालेय शिक्षण तेथील टाऊनसेंट हॅरीस हायस्कूलमधून पूर्ण केले. १९४० मध्ये त्यांने सिटी कॉलेज ऑफ न्यूयॉर्कमधून सामाजिकशास्त्र विषयात बीएस. सी. पदवी प्राप्त केली. १९४१ मध्ये कोलंबिया विद्यापीठातून गणित विषयात एम. ए. उत्तीर्ण झाल्यानंतर १९४२ – १९४६ या काळात त्यांनी यू. एस. आर्मीमध्ये हवामान अधिकारी म्हणून काम केले. नंतर १९४८-४९ मध्ये शिकागो विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक म्हणून वर्षभर काम केले. त्यांनी १९५१ मध्ये कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळविली. ॲरो यांनी १९४९ – १९६८ या काळात स्टॅनफोर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र व सांख्यिकी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यादरम्यान १९५३ – १९५६ व १९६२-६२ या काळात विद्यापीठात अर्थशास्त्र विभागाचे कार्यकारी प्रमुख हे पदही त्यांनी सांभाळले. नंतर १९६८-६९ मध्ये हार्व्हर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. १९७९ मध्ये ते पुन्हा स्टॅनफोर्ड विद्यापीठात परतले व तेथेच १९९१ मध्ये सन्मानयीय (Emeritus) प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी १९६३-६४, १९७० व १९७३ या काळात चर्चिल कॉलेजचे फेलो म्हणूनही काम पाहिले.
ॲरो यांचे अर्थशास्त्रातील अशक्यतेचा सिद्धांत (Arrow’s Impossibility Theorem) या नावाने प्रसिद्ध असलेला सामाजिक सिद्धांत तसेच साधारण समतोल (General Equilibrium) विश्लेषण उल्लेखनीय मानले जातात. मनुष्यबळ, नावीन्यता व ज्ञान यांतील गुंतवणूकीवर आधारित कोणत्याही बाह्य शक्तीच्या दबावाशिवाय विकासाचे अंतर्गत प्रतिमान (इंडोजिनियस ग्रोथ थिअरी) व माहितीचे अर्थशास्त्र (Economics of Information) या क्षेत्रांतील त्यांचे कामही पायाभूत मानले जाते. साधारण अशक्यतेच्या सिद्धांतामधील सामाजिक निवड व व्यक्तीमूल्ये यांबाबतची विचारधारा त्याच्या पीएच. डी.च्या प्रबंधातून घेतलेली आहे. यातील गृहितकानुसार अनेकदा सामाजिक अग्रक्रम ठरविताना व्यक्तींच्या अग्रक्रमांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. ॲरो यांच्या विचारसरणीचे कल्याणकारी अर्थशास्त्र व न्यायदान यांच्या प्रक्रियेवर लक्षणीय परिणाम संभवतात. त्यांच्या अशक्यतेच्या सिद्धांताचा विस्तार भारतीय अर्थतज्ज्ञ व नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन (Amartya Sen) यांनीही केलेला आहे. स्पर्धात्मक अर्थव्यवस्था व खुल्या बाजारपेठांच्या वातावरणात साधारण समतोल आपोआप साधला जातो. त्यासाठी शासकीय स्तरावर किंमती नियंत्रित करण्याची गरज असते, हे ॲरो यांनी आग्रहाने मांडले. त्यांनी अनिश्चिततेच्या अर्थकारणासंबंधी विश्लेषणही केले आहे.
https://www.youtube.com/watch?v=o0IsXEUaVz0
ॲरो यांनी मोठ्याप्रमाणात लेखन केले असून त्यांचे ग्रंथ पुढीलप्रमाणे : सोशल चॉइस ॲण्ड इंडिव्हिज्वल व्हॅल्यूज (१९५१), एसेज इन दि थिअरी ऑफ रिस्क बिअरिंग (१९५८), स्टडीज इन लिनीअर ॲण्ड नॉन-लिनीअर प्रोग्रॅमिंग (१९५८), स्टडीज इन रिसोर्स अप्लिकेशन (१९६२), पब्लिक इन्व्हेसमेन्ट, दि रेट ऑफ रिटर्न ॲण्ड ऑप्टीमल फिस्कल पॉलिसी (१९७०), सोशल चॉईस : मेनी इंडिव्हिज्वल ऑर मेनी क्रायटेरिया (१९७०), जनरल कॉम्पिटेटीव्ह ॲनॅलिसीस (१९७१), थेरॉटकल इशूज इन हेल्थ इन्शुरन्स (१९७३), लिमीट्स ऑफ ऑर्गनायझेशन (१९७३), दि लिमीट्स ऑफ ऑर्गनायझेशन (१९७४), स्टडीज इन अलोकेशन प्रोसेस (१९७७), एनर्जी दि नेक्स्ट ट्वेंटी इयर्स : रिपोर्ट (१९७९), पेट्रोलीयम प्राइस रेग्यूलेशन (१९७९), जनरल इक्विलिब्रीयम (१९८३), सोशल चॉइस ॲण्ड जस्टीस (१९८३), दि इकॉनॉमिक्स ऑफ इन्फॉर्मेशन (१९८४), अप्लाइड इकॉनॉमिक्स (१९८५), प्रॉडक्शन ॲण्ड कॅपिटल (१९८५), सोशल चॉईस ॲण्ड मल्टी-क्रायटेरियन डिसीजन मेकिंग (१९८६), इशूज इन कॉन्टेम्पररी इकॉनॉमिक्स : मॅक्रोइकॉनॉमिक्स ॲण्ड इकॉनॉमेट्रीक्स (१९९१), व्हॉट इज दि प्रेझेन्ट ओव दि फ्युचर ? : ॲन इकॉनॉमिक ॲण्ड इथिकल पर्स्पेक्टीव्ह ऑन क्लायमेट चेंजेस (१९९६), हँडबूक ऑफ सोशल चॉइस ॲण्ड वेलफेअर (२००२), ऑन इथिक्स ॲण्ड इकॉनॉमिक्स : कॉन्व्हर्सेशन वीथ केनेथ जे. ॲरो (२०१६). शिवाय त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.
ॲरो यांना नोबेल पुरस्काराव्यतिरिक्त आपल्या अर्थशास्त्रातील संशोधन कार्याबद्दल पुढील सन्मान लाभले : जॉन बेट्स क्लार्क पदक (१९५७), फेलो ऑफ अमेरिकन अकॅडेमी ऑफ आर्ट्स ॲण्ड सायन्सेस (१९५९), प्रेसिडेन्ट ऑफ इकॉनॉमेट्रिक सोसायटी (१९५६) व इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट सायन्सेस (१९६३), शिकागो विद्यापीठाची एलएलडी ही सन्मानीय पदवी (१९६७), सिटी युनिव्हर्सिटी न्यूयॉर्कची डॉक्टरेट (१९७२), डॉक्टर ऑफ सोशल ॲण्ड इकॉनॉमिक सायन्सेस युनिव्हर्सिटी ऑफ व्हिएन्ना (१९७१), जॉव वॉन न्यूमन थिअरी प्राइझ (१९८६), नॅसनल मेडल ऑफ सायन्स (२००४).
ॲरो यांचे पलो अल्टो, कॅलिफोर्निया येथे निधन झाले.
समीक्षक – संतोष दास्ताने