ब्यूसेरॉटिडी कुलातील एक पक्षी. हा पक्षी अफ्रिका आणि आशिया खंडांतील उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशांत आढळतो. याच्या जगभरात सु. ५५ जाती आहेत. या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची मोठी व गायीच्या शिंगाच्या आकाराची चोच. या चोचीवरूनच त्याला इंग्रजीत हॉर्नबिल हे नाव पडले आहे. भारतीय उपखंडात प्रामुख्याने आढळणाऱ्या धनेशाच्या जातीचे शास्त्रीय नाव ऑसिसेरॉस बायरोस्ट्रिस आहे. त्याला भारतीय करडा धनेश (इंडियन ग्रे हॉर्नबिल) असे म्हणतात.
करडा धनेश साधारणपणे घारीएवढा असून त्याच्या शरीराची लांबी सु. ६० सेंमी. असते. शरीरावर राखाडी रंगाची पिसे असून पोट फिकट पांढऱ्या रंगाचे असते. चोच मोठी, बाजूने चपटी, वाकडी व काळी असून तिच्यावर नळकांड्यासारखे शिरस्त्राण असते. शेपूट लांब व तपकिरी असून निमुळती होत गेलेली असते. शेपटाच्या प्रत्येक पिसाच्या टोकाजवळ काळा पट्टा असतो व टोक पांढरे असते. नर धनेश मादीपेक्षा आकाराने मोठा असतो. धनेश प्रामुख्याने झाडावर राहतो. फळे हे त्याचे प्रमुख अन्न असून तो वड व पिंपळाची फळे तसेच अंजीर, जांभूळ, करवंदे यासारखी फळे आणि शिरिषाच्या बिया खातो. फळांशिवाय तो नाकतोडे, गांधीलमाश्या, पाली, लहान उंदीर असे प्राणीदेखील खातो.
क्वचितच तो जमिनीवर येतो. कमी उंचीवरून तो संथपणे उडतो. त्याचा आवाज कर्कश असून जातींनुसार तो बदलतो.एप्रिल ते जून हा यांच्या विणीचा हंगाम. नेहमी जोडीने राहणारे हे पक्षी या काळात एकत्र काम करतात. विणीच्या हंगामात नर-मादी उंच वृक्षांची ढोली शोधून काढतात. अंडी घालण्याची वेळ आली की मादी घरट्यात जाऊन बसते. नर जमिनीवरील मातीचे गोळे जमा करतो. तसेच घरट्यासाठी लागणारे साहित्य नर घेऊन येतो. धनेशाची चोच वजनाने हलकी असून घरटे बांधणे आणि भक्ष्य पकडणे यासाठी उपयोगी पडते. योग्य घरटे तयार झाल्यानंतर ओली माती, शेण, विष्ठा इ. मिश्रणाने दोघे मिळून घरट्याचे तोंड बंद करतात. मादीची चोच बाहेर काढता येईल एवढीच फट घरट्याला असते. बंद घरट्यामुळे साप, माकडे, शिकारी पक्षी यांच्यापासून अंड्यांचे आणि पिलांचे संरक्षण होते. मादी एका वेळी दोन किंवा तीन अंडी घालते.
अंडी उबविताना मादीची पिसे झडून जातात. अंडी सहा ते सात आठवड्यांत उबतात. पिले अंड्याबाहेर आल्यावर पिलांना आणि मादीला अन्न आणून देण्याचे काम एकटा नर करतो. पिलांच्या अंगावर नवीन पिसांचे आवरण तयार झाले की घरट्याचे तोंड उघडून मादी बाहेर येते. घरट्याचे तोंड बंद करून नर-मादी दोघेही पिलांना अन्न भरवितात. पिले उडू लागून स्वतंत्र होईपर्यंत नर-मादी पिलांची काळजी घेतात. धनेशाची भारतात आढळणारी आणखी एक जात म्हणजे मलबार करडा धनेश (ऑसिसेरॉस ग्रिसस). हा पक्षी आकाराने सु. १०० सेंमी. लांब असून त्याच्या चोचीवर भारतीय करडा धनेशाप्रमाणे मोठे शिरस्त्राण नसते. त्याला मोठा धनेश म्हणतात. तसेच मलबार पाईड धनेश (अँथ्रॅकोसेरॉस कोरोनॅटस) आढळतो. हा आकाराने मोठा आहे.