सजीवांच्या आहाराच्या प्रकारानुसार ‘स्वोपजीवी आणि परजीवी’ असे दोन प्रकार आढळतात. बहुसंख्य वनस्पती हरितद्रव्याच्या साहाय्याने निसर्गातील मूलद्रव्ये आणि सूर्याच्या ऊर्जेचा वापर करून स्वत: अन्न बनवितात. अन्नाची स्वयंनिर्मिती आणि स्वयंवापर यांमुळे वनस्पती स्वोपजीवी अथवा स्वयंपोषी आहेत. स्वोपजीवी आपले अन्न स्वत: तयार करतात, तर परजीवी हे त्यांचे अन्न इतर सजीव किंवा मृत कार्बनी जैव पदार्थांतून मिळवितात. परजीवी अन्नासाठी इतर सजीवांवर अवलंबून असतात. जे परजीवी इतर सजीवांपासून अन्न आणि पाणी प्रत्यक्षपणे मिळवितात, त्यांना ’जीवोपजीवी’ म्हणतात. काही परजीवी प्राण्यांची मृत शरीरे, मृत वनस्पती, प्राण्यांची विष्ठा यांवर उपजीविका करतात, त्यांना ’मृतोपजीवी’ म्हणतात.
सर्व विषाणू परजीवी आहेत. काही जीवाणू, आदिजीव, कवके, वनस्पती आणि प्राणी यांपैकी काही परजीवी आहेत. प्रोटिस्टा आणि प्राणिसृष्टीत परजीवी ही संज्ञा काही आदिजीव, कृमी आणि पृष्ठवंशी संधिपाद प्राण्यांना लागू होते. यांपैकी अनेक परजीवी मानवामध्ये रोग होण्यास कारणीभूत होतात. परजीवी दुसऱ्या प्राण्यांकडून अन्न, आसरा आणि संरक्षण मिळवितात. ज्या प्राण्यापासून किंवा वनस्पतीपासून परजीवी अन्न व आसरा मिळवितात त्या प्राण्यास किंवा वनस्पतीस यजमान, पोषक, पोषिता, पोशिंदा अथवा आश्रयी म्हणतात. पोषक आकाराने मोठा तर परजीवी आकाराने लहान असतो. ज्या प्राण्याच्या शरीरात परजीवीच्या विकासाच्या प्राथमिक अवस्था घडून येतात त्या पोषकाला मध्यस्थ पोषक म्हणतात, तर ज्या प्राण्याच्या शरीरात परजीवीची वाढ पूर्ण होते किंवा पुनरुत्पादन होते, त्या प्राण्यास अंतिम पोषक म्हणतात. परजीवी पोषकाच्या शरीरात राहून अन्न आणि आसरा मिळवीत असल्यास तो अंत:परजीवी म्हणून ओळखला जातो, तर जो परजीवी शरीराबाहेर राहून फक्त अन्नासाठी पोषकावर अवलंबून असल्यास त्यास बाह्यपरजीवी म्हणतात. परजीवी ही संज्ञा संकुचित अर्थाने कधीकधी फक्त परजीवी प्राण्यांनाच लावलेली आढळते.
पोषकावर मोठ्या संख्येने परजीवी वास्तव्यास असल्यास त्याचे अपायकारक परिणाम होतात. मात्र, पोषकाला एकदम मृत्यू येत नाही, अनेकदा पोषकाच्या ग्रंथीचा नाश होतो किंवा पोषकाची वाढ खुंटते. अनेक कीटकांमध्ये याचा परिणाम पुढील पिढ्या उत्पन्न न होण्यात होतो. पोषकाला अन्नाची तसेच जीवनसत्त्वांची त्रुटी जाणवते. माणसात परजीवींमुळे रोगसदृश लक्षणे दिसून येतात. यात ताप येणे, यकृतास सूज येणे, कावीळ, अतिसार, पांडुरोग, पाय सुजणे, व्रण पडणे, जखमा होणे, रसवाहिन्या व रक्तवाहिन्या तुंबणे, रक्तस्राव होणे, शरीरात हानीकारक सूक्ष्मजीवांचा प्रवेश होणे, गळू, निद्रानाश, इओसिनोफिल या पांढऱ्या पेशींची संख्या वाढणे इत्यादी परिणाम दिसतात. काही वेळा यातून मानवाचा मृत्यू ओढवू शकतो. पोषक सहसा मृत्यू पावणार नाही, याची परजीवी ’काळजी’ घेतो. कारण पोषकाचा मृत्यू झाल्यास परजीवीचे अस्तित्व संपते, त्याला दुसरा पोषक शोधावा लागतो.
परजीवी प्राण्यांमध्ये शरीररचना आणि शरीरक्रियाविज्ञान यांत परिस्थितीनुसार आवश्यक ते बदल घडतात. त्यांचे शरीर चपटे होते आणि पोषकाच्या शरीरावर किंवा शरीरात राहण्यासाठी चूषके, काटे, अंकुश व रोम निर्माण होतात. परजीवींच्या अधिचर्मामुळे पाचकरसांचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. पोषकापासून आयते अन्न मिळत असल्याने ऊर्जेसाठी फारशी हालचाल करावी लागत नाही. अंत:परजीवींना ऊर्जा कमी लागते. ते विनॉक्सिश्वसनातून ऊर्जा मिळवितात. त्यांच्यात हालचालीची उपांगे, श्वसन संस्था, अन्ननलिका, चेतासंस्था, विशिष्ट ज्ञानेंद्रिये इत्यादींचा अभाव आढळतो. लैंगिक द्विरूपता असल्यास मादीचा आकार मोठा तर नराचा आकार लहान असतो. परजीवींची प्रजननक्षमता प्रचंड असते. उदा., एका वर्षात जंताची एक मादी सु. ६ कोटी ४० लाख अंडी घालते, तर पट्टकृमी ८ कोटी अंडी घालते. ज्या परजीवींच्या जीवनचक्रात दोनपेक्षा अधिक पोषक असतात, त्यांना जास्त अंडी घालणे गरजेचे असते, कारण त्यांच्या जीवनचक्रातील वाढीच्या अवस्थांमध्ये असंख्य डिंभ नाश पावतात.
परजीवींची काही उदाहरणे :
परजीवी प्राणी : आदिजीवी संघातील एंटॅमिबा हिस्टोलायटिका व एं.जिआर्डिया हे परजीवी माणसाच्या जठरात, ट्रिपॅनोसोमा व लेशमानिया हे माणसाच्या रक्तात तर बॅलँटिडियम हे बेडकाच्या अवस्करात असतात. चपटकृमी संघातील यकृत पर्णकृमी हे मेंढीच्या पित्तनलिकेत तर पट्टकृमी हे माणसाच्या आणि डुकराच्या लहान आतडयात असतात. गोलकृमी संघातील जंतकृमी माणसाच्या आतडयात, हत्तीरोग कृमी माणसाच्या लसीका ग्रंथींमध्ये, अंकुशकृमी आणि टाचणीकृमी माणसाच्या आतड्यांत तर चाबूककृमी माणसाच्या डोळ्यांत असतात. वनस्पतींमध्ये गोलकृमी संघातील मेलॉइडोगाइन आणि झिफिनेमा वाढतात. वलयांकित संघातील जळू आणि संधिपाद संघातील डास, ढेकूण, पिसवा, ऊ, गोचिड, गोमाशी, घोडामाशी व खरजेचा अष्टपाद हे सर्व बाह्यपरजीवी असून ते सर्व पृष्ठवंशी प्राण्यांच्या शरीरावर वाढतात. पृष्ठवंशी संघातील पेट्रोमायझॉन हा परजीवी मोठ्या माशांच्या शरीरावर वाढतो.
परजीवी वनस्पती : बहुतेक वनस्पती स्वतःचे अन्न स्वत: तयार करतात. म्हणून त्या स्वोपजीवी आहेत. परंतु काही वनस्पती इतर वनस्पतींवर जगतात. अशा वनस्पतींना परजीवी वनस्पती म्हणतात. कीटकभक्षक वनस्पती अंशत: जीवोपजीवी आहेत. अन्नाऐवजी सजीवांपासून फक्त आसरा व संरक्षण घेणाऱ्या वनस्पतींचा कधीकधी परजीवीमध्ये समावेश केला जातो. आपल्या आश्रयीवर राहून फक्त पाणी व खनिजे शोषून घेणाऱ्या बांडगुळासारख्या वनस्पतीला अर्धपरजीवी म्हणतात, तर तंबाखूवर राहून पूर्ण अन्न घेणाऱ्या बंबाखू वनस्पतीला पूर्णपरजीवी म्हणतात. मेंदी, ड्युरांटा, कण्हेर, विलायती चिंच अशा आश्रयी वनस्पतींपासून अमरवेल (कस्कुटा रिफ्लेक्सा ) अन्न घेते. त्यामुळे अमरवेल ही पूर्ण परजीवी आहे.
चंदन व ऑस्ट्रेलियातील न्युइदसिया हे मोठे वृक्ष जवळच्या इतर वनस्पतींच्या मुळात आपली काही मुळे घुसवून पाणी, खनिजे व काही सेंद्रिय द्रव्ये शोषून घेतात. या वनस्पतींना मूलोपजीवी म्हणतात. एक्टोकार्पस रिकार्डिया ही शैवाले लॉरेंशियावर वाढतात. बहुतेक सर्व परजीवी वनस्पतींमध्ये रूपांतरित मुळे असतात. या मुळांना ’शोषक मुळे’ म्हणतात. ती आश्रयीतून अन्नपाणी शोषून घेण्यास मदत करतात. तसेच शोषक मुळे परजीवी वनस्पतीला आधार देतात.
काही कवके वनस्पतींच्या शरीरात राहून अन्न शोषून घेतात. ज्वारीवरील काणी व बाजरीवरील अरगट यांना अंत:परजीवी म्हणतात. पिथियमसारखे कवक ज्यात हरितद्रव्य (कायक वनस्पती) नसते, ते आश्रयी वनस्पतीच्या मृत्यूनंतर मृतोपजीवी बनतात. गव्हावरचा तांबेरा हा रोग ज्या कवकामुळे होतो, ते कवक एकाहून अधिक आश्रयींचा उपयोग करते. या दोन आश्रयी वनस्पती म्हणजे गहू व दारुहळद. काही जीवाणू परजीवी असतात. त्यांच्यामुळे वनस्पतीच्या पानांवर ठिपके येणे, पाने कोमेजून लोंबणे किंवा गळून पडणे, वनस्पतीचे भाग कुजणे, वनस्पतींमध्ये अर्बुद किंवा गाठी येणे इत्यादी परिणाम वनस्पतींमध्ये आढळून येतात. मनुष्यामध्येही जीवाणूंमुळे क्षय, न्यूमोनिया व कुष्ठरोग होतो.