पुरीष म्हणजे विष्ठा. शरीरात तयार होणाऱ्या तीन मलांपैकी एक मल म्हणजे पुरीष. खाल्लेल्या अन्नाचे पचन झाल्यावर त्याचे दोन भाग होतात. एक सार भाग व दुसरा किट्ट (असार) भाग. सार भाग शरीर पोषणासाठी कामात येतो. किट्ट म्हणजेच शरीराला नको असलेला भाग.
पक्वाशयात असलेला अग्नी किट्ट भागातील द्रवांश शोषून घेतो व त्याला घन स्वरूपात आणतो, हेच पुरीष होय. पुरीषाच्या ठिकाणी असलेल्या तिखटपणामुळे तिथे वायूची निर्मिती होते. शोषून घेतलेल्या द्रवांशापासून मूत्राची निर्मिती होते.
पुरीषाची निर्मिती योग्यप्रकारे न झाल्यास किंवा त्यात अपाचीत अन्नघटक असल्यास त्याला ‘साम मल’ म्हणतात. याच्या विपरीत मलाला ‘पक्व मल’ म्हणतात. साम मल जड असल्याने पाण्यात टाकल्यास खाली बुडतो, तर पक्व मल पाण्यावर तरंगतो. मल साम आहे की पक्व आहे ही परीक्षा रोगनिदानाकरिता महत्त्वाची आहे. परंतु, पुरीष जर अतिशय पातळ किंवा घट्ट असेल, अतिथंड व कफदोषयुक्त असेल तर ही साम-निराम परीक्षा लागू होणार नाही.
तयार झालेल्या पुरिषाला शरिरातून बाहेर काढण्याचे काम अपान वायू करतो. ‘अवष्टंभन’ हे पुरिषाचे कार्य आहे. अवष्टंभ म्हणजे देह धारण शक्ती.
दूषित दोष पुरीषाच्या संपर्कात आल्यास पुरीषाची योग्य निर्मिती होण्याआधीच त्याला शरीरातून बाहेर काढतात, तर कधी अशा पुरीषाला शुष्क करून टाकतात. (ज्यामुळे त्याचे खडे बनतात) किंवा त्याच्या ठिकाणी विकृती निर्माण करून त्याचा प्राकृत रंग व गंध बिघडवितात. जाणीवपूर्वक शौच अडवून धरल्यास ओटीपोट, डोके, पोटऱ्या यांठिकाणी वेदना होतात. पोटाला फुगारा येतो. पुरीष अतिप्रमाणात तयार झाल्यास कुक्षीत (पोटात) फुगवटा येतो, पोटात गुडगुड असा आवाज येतो. शरीरात जडपणा जाणवतो, वेदना होतात. पुरीष कमी प्रमाणात तयार झाल्यास वातदोष आवाज करीत इकडे-तिकडे फिरतो. छाती व बरगड्यांच्या ठिकाणीही वेदना होतात.
पहा : मल, मूत्र, मलावरोध, रेचके.
संदर्भ :
- अष्टांग हृदय — सूत्रस्थान, अध्याय ७, श्लोक ८; अध्याय ११, श्लोक ५, १३, २१; अध्याय १२, श्लोक ९; अध्याय २८ श्लोक २२.
- चरक संहिता — चिकित्सास्थान, अध्याय १५, श्लोक ११, ९४.
- चरक संहिता — विमानस्थान, अध्याय १५, श्लोक १८.
समीक्षक – जयंत देवपुजारी