बेरिलियम या मूलद्रव्याची काही महत्त्वाची संयुगे पुढीलप्रमाणे :

(अ) बेरिलियम ऑक्साइड : (BeO).

निर्मिती : बेरिलियम हायड्रॉक्साइड ५०० से. ला तापविले असता हे तयार होते.

गुणधर्म : हे ऑक्साइड उभयधर्मी आहे. वितळबिंदू २,५३० से., वि.गु. ३.००९.

(१) हे सोडियम हायड्रॉक्साइडाबरोबर संयोग पावते व सोडियम बेरिलेट (NaBeO2) तयार होते.

(२) अम्लाबरोबर लवणे तयार होतात. उदा., नायट्रिक अम्लाबरोबर नायट्रेट,  सल्फ्यूरिक अम्लाबरोबर सल्फेट इत्यादी.

(३) हे उच्चतापसह (न वितळता उच्च तापमानाला टिकणारे) द्रव्य असून त्याचे क्षपण करणे कठिण असते.

उपयोग : (१) मऊ चूर्णाच्या रूपात ते तयार करण्यात येते व बेरिलियमाची इतर संयुगे तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

(२) गॅसबत्तीत वापरण्यात येणाऱ्या वेल्सबाख (सी. ए. फोन वेल्सबाख यांनी शोधून आढलेल्या) प्रदीप्त जाळीत इतर ऑक्साइडाबरोबर अल्प प्रमाणात त्याचा उपयोग करतात तसेच काही अनुस्फुरक (fluorescent) दिव्यांत हस्तिदंती रंगाचा प्रकाश निर्माण करणारे अनुस्फुरक द्रव्य म्हणून ते वापरतात.

(३) बेरिलियम ऑक्साइड उच्चतापसह वस्तू (उदा., विटा), तसेच उच्च गुणवत्तेच्या विद्युत् मृत्तिका वस्तू {उदा., विमानातील ठिणगी गुडद्या (इंधन पेटविण्यासाठी त्यात विद्युत् ठिणग्या पाडणारी साधने) व परा-उच्च कंप्रता रडारसाठी वापरण्यात येणारे विद्युत निरोधक} तयार करण्यासाठी वापरण्यात येते. त्याच्या उच्च ऊष्मीय संवाहकता व उच्च-कंप्रतांना उत्तम विद्युत् निरोधकता या गुणधर्मांमुळे त्याचा अनेक विद्युत् व इलेक्ट्रॉनीय साधनांत (उदा., रेडिओतील निर्वात नलिका, दूरचित्रवाणीमधील चित्रनलिकेतील अनुस्फुरक द्रव्ये इ.) उपयोग करतात.

(४) ग्रॅफाइट मुशींना निरांधनासाठी अर्धद्रवरूप बेरिलियम ऑक्साइडाचे अस्तर देतात. यामुळे मुशीतील वितळलेल्या मिश्रधातू व ग्रॅफाइट यांचा एकमेकांशी संपर्क येत नाही. बेरिलियम ऑक्साइडापासून तयार केलेल्या मुशी २,००० से. तापमानालाही वापरता येतात आणि जेथे उच्च शुद्धता अपेक्षित असते किंवा विक्रियाशील धातू वितळवावयाच्या असतात तेथे मुशी मुख्यत्वेकरून वापरतात. बेरिलियम धातूच्या वितळबिंदूपेक्षाही वरच्या तापमानाला कार्य करू शकणाऱ्या अणुकेंद्रीय प्रयुक्ती बेरिलियम ऑक्साइडापासून तयार करता येत असल्यामुळे वर वर्णन केलेल्या धातुच्या अणुकेंद्रीय उपयोगांप्रमाणेच ऑक्साइडाचा उपयोग करण्यात येतो.

(ब) बेरिलियम कार्बाइड : (Be2C).

निर्मिती : बेरिलियम ऑक्साइडाचे सु. १५०० से. तापमानाला क्षपण केले असता बेरिलियम कार्बाइड तयार होते.

2 Be O + 3 C → Be2C + 2 CO

गुणधर्म : वि. गु. २.४४ असून २,१०० से. तापमानाच्या वर ते अपघटन पावते.

उपयोग : कक्ष तापमानालाही (सर्वसाधारण तापमानालाही) पाण्याच्या वाफेचा त्याच्यावर हळूहळू परिणाम होतो. तथापि उच्च तापमानाला मंदायक म्हणून बेरिलियम कार्बाइड व ऑक्साइड यांचा अणुकेंद्रीय विक्रियकांत उपयोग होऊ शकतो कारण बेरिलियमाच्या क्रियेला कार्बन आणि ऑक्सिजन अणूंची मदत होते.

(क) बेरिलियम क्लोराइड : (BeCl2).

निर्मिती : तप्त बेरिलियम धातूवरून कोरडे हायड्रोजन क्लोराइड जाऊ दिल्यास वा उच्च तापमानाला क्लोरीनाच्या झोतात कार्बनाबरोबर बेरिलियम ऑक्साइड तापविले असता हे तयार होते.

गुणधर्म : हे पांढरे, स्फटिकी व आर्द्रताताशोषक घनरूप असून ४०० से. वितळते. पाण्यात ते मोठ्या प्रमाणात विरघळते व त्याचे जलीय विच्छेदन (पाण्याच्या रासायनिक विक्रियेने रेणूचे तुकडे होण्याची क्रिया) होऊन हायड्रोक्लोरिक अम्ल व बेरिलियम ऑक्साइड मिळतात.

उपयोग : बेरिलियम क्लोराइडाचा उपयोग रासायनिक साहाय्यक म्हणून फ्रीडेल – क्राफ्ट्‌स विक्रियेत करतात. हे वितळलेल्या स्थितीतही विद्युत विच्छेद्य म्हणून कार्य करते. याचे गुणधर्म पुष्कळसे ॲल्युमिनियम क्लोराइडासारखे आहेत.

(ड) बेरिलियम हायड्रॉक्साइड : [Be(OH)2].

निर्मिती : बेरिलियम क्लोराइडावर सोडियम हायड्रॉक्साइडाची विक्रिया केल्यास हे तयार होते.

गुणधर्म : हे पांढरे व अस्फटिकी चूर्णस्वरूप असते. हे हायड्रॉक्साइड उभयधर्मी आहे. सोडियम हायड्रॉक्साइडाबरोबर सोडियम बेरिलेट तयार होते.

बेरिलियम : काही महत्त्वाची संयुगे

इतर काही महत्त्वाची संयुगे : बेरिलियमाची बरीचशी संयुगे बेरिलियम मृत्तिका वस्तू, बेरिलियम ऑक्साइड व बेरिलियम धातू तयार करण्याच्या प्रक्रियांमध्ये मध्यस्थ संयुगे म्हणून उपयुक्त असून इतर संयुगे रासायनिक विश्लेषणांत व कार्बनी संश्लेषणांत उपयुक्त आहेत.

बहुवारिकी व सहसंयुजी संयुगे : बेरिलियमाची बहुवारिकी (अनेक साध्या रेणूच्या संयागाने जटिल-गुंतागुंतीच्या-संरचनेचे रेणू असलेली) व सहसंयुजी (अणूमध्ये इलेक्ट्रॉन समाईक असलेली) संयुगेही बनतात. या संयुगाचे ऊष्मीय स्थैर्य चांगले असून त्यांपैकी काही वातावरणीय दाबाला ३०० से. पेक्षाही जास्त तापमानाला अपघटन न होता ऊर्ध्वपातित (तापवून बाष्प करून व नंतर ते थंड करून मिश्रणातील घटक अलग करण्याच्या क्रियेने) करता येतात.

उदा.,  क्षारकीय बेरिलियम कार्बॉक्सिलेटे [Be4O(RCO2)6] व बेरिलियमाची उदासीन ग्राभ संयुगे (chelate compounds). या ग्राभ संयुगांपैकी बेरिलियम ॲसिटिल-ॲसिटोनेट [Be(C5H7O2)2] हे सुपरिचित असून त्याचा शोध १८९४ मध्ये लागला. याचा वितळ बिंदू १०८ से. असून अपघटन न पावता ते २७० से. ला उकळते.

 

कार्बनी –संयुगे :

(१) डायमिथिल बेरिलियम : Be(CH3)2 . क्ष-किरणांच्या साहाय्याने केलेल्या अभ्यासावरून घन डायमिथिल बेरिलियम या संयुगाच्या बहुवारिकी शृंखला तयार होतात आणि त्यात प्रत्येक बेरिलियम अणू चार कार्बन अणूंना चतुष्कोणी रीतीने जोडलेला असून प्रत्येक कार्बन अणू दोन बेरिलियम अणूंना जोडलेला असतो, असे आढळून आले आहे.

हे खरे कार्बनी-धातू संयुग असून त्यात धातूचा अणू कार्बनी मूलकांशी (अणुगटांशी) सरळ जोडला गेलेला असतो. हे संयुग शुभ्र व घन असून त्याचे २०० से. ला संप्लवन (घन अवस्थेतून एकदम बाष्प अवस्था प्राप्त होणे) होते.

(२) डायएथिल बेरिलियम Be(C2H5)2: हे रंगहीन द्रवरूप असून १२ से. ला तें वितळते व ११० से. ला (दाब १५ मिमी.) उकळते.