मध्य मेक्सिकोतील एक सरोवर. पर्वतीय प्रदेशांनी आणि ज्वालामुखींनी वेढलेल्या ‘व्हॅली ऑफ मेक्सिको’ या उंच पठारी प्रदेशात सस.पासून २,२४० मी. उंचीवर हे सरोवर स्थित आहे. प्रत्यक्षात एकमेकांना जोडलेल्या प्रमुख पाच व इतर अनेक सरोवरांची ही मालिका असून तेस्कोको हे त्यातील सर्वांत मोठे सरोवर आहे. तेस्कोकोच्या उत्तरेस झूम्पांगो व हाल्टकान ही सरोवरे, तर दक्षिणेस सोचिमील्को आणि चाल्को ही सरोवरे आहेत. तेस्कोको सरोवराचे क्षेत्रफळ ५,४०० चौ. किमी. असून त्याची कमाल खोली १५० मी. आहे. यातील सोचिमील्को व चाल्को या सरोवरांना भूमिगत गोड्या पाण्याच्या झऱ्यांद्वारे पाणीपुरवठा होतो; तर झूम्पांगो, हाल्टकान व तेस्कोको या सरोवरांना ऊष्ण पाण्याच्या झऱ्यांद्वारे खाऱ्या पाण्याचा पुरवठा होतो. मे ते ऑक्टोबर या पावसाळा ऋतूत जेव्हा पाण्याची पातळी उच्च असते, तेव्हा या सर्व सरोवरांचे सलग एकच सरोवर दिसते. त्या वेळी या सरोवराच्या पृष्ठभागाची सस.पासून उंची २,२४२ मीटर असते. त्यानंतर जेव्हा उन्हाळा हा ऋतू सुरू होतो, तेव्हा ही सर्व सरोवरे वेगवेगळ्या पाण्याचे भाग दिसून येतात. या सरोवर प्रणालीतील तेस्कोको सरोवराची पातळी ही सर्वांत निम्न स्तरावर आलेली असते. सतराव्या शतकाच्या सुरुवातीपासून काढण्यात आलेल्या कालव्यांद्वारे आणि बोगद्यांद्वारे सरोवरातील पाणी पानको नदीकडे वाहून नेले जाते. सरोवराच्या भोवतालचा भाग खाऱ्या दलदलीने व्यापला असून हा भाग सांप्रत मेक्सिको सिटी या शहराच्या पूर्वेस ४ किमी.वर आहे.

पूर्वी व्हॅली ऑफ मेक्सिकोचा बरचसा भाग तेस्कोको आणि त्यालगतच्या इतर सरोवरांमुळे पूरग्रस्त आणि जलमय असायचा. सुमारे ११,००० वर्षांपूर्वी या सरोवराचे कमाल क्षेत्रफळ ५,६७० चौ. किमी. होते. काळाच्या ओघात वेगवेगळ्या कारणांनी सरोवराचे पाणी जसजसे कमी होत गेले, तसतसे येथे एकाच मोठ्या सरोवरातून एकमेकांना जोडणारी अनेक लहानमोठी सरोवरे निर्माण झाली. पाऊस आणि बर्फाच्या वितळण्याने या सरोवरांना पाणीपुरवठा होत असे; परंतु दिवसेंदिवस येथील तापमान वाढत जाऊन बर्फामुळे होणारा पाण्याचा पुरवठा कमी झाला.

अ‍ॅझटेक साम्राज्याने इ. स. १३२५ मध्ये या सरोवरातील एका बेटावर टेनॉच्टीत्लान हे आपल्या राजधानीचे ठिकाण वसविले. तसेच ते बेट बांध रस्त्यांनी मुख्य भूमीशी जोडले. स्पॅनिश जेता एर्नांदो कोर्तेझ यांनी इ. स. १५२१ मध्ये टेनॉच्टीत्लान जिंकून घेऊन त्याचा विनाश केला. त्याच अवशेषांवर ‘मेक्सिको सिटी’ ही आपली राजधानी वसविली. त्यानंतर काही अभियंत्यांनी या भागातील जलनि:सारणाचे काम हाती घेऊन पूरनियंत्रण आणि सरोवराचे जलनि:सारण केले. त्यासाठी कालवे आणि बोगदे तयार केले. त्यामुळे सरोवराचे क्षेत्र बरेच मर्यादित झाले.

सांप्रत मेक्सिको सिटी या महानगराचेही बरेच क्षेत्र या व इतर सरोवरांच्या पाण्याखाली होते. अजूनही काही पाणथळ भाग या महानगराच्या पूर्व भागातील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आहे. सरोवरातील पाण्याची पातळी बरीच कमी झाली असल्यामुळे दलदलीच्या आणि इतर भागांत भराव घालून तेथे मेक्सिको सिटीच्या अनेक इमारती उभारल्या आहेत. या सरोवरच्या काठावर तेस्कोको, त्लाकोपान व आस्कपट्सालको ही प्रमुख शहरे आहेत.

समीक्षक : वसंत चौधरी