पोलो, मार्को : (१२५४– ८ जानेवारी १३२४).

आशियातील देशांत, विशेषत: चीनमध्ये, प्रवास करणारा इटालियन साहसी प्रवासी व व्यापारी. त्याचा जन्म व्हेनिसमध्ये झाला. त्याच्या लहानपणीच आईचे निधन झाले. व्हेनिसमधील त्याच्या लहानपणीच्या जीवनाविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. त्याचे कुटुंब सधन व प्रतिष्ठित होते. वडील निकोलॉ व चुलते माफफेओ हे दोघेही व्हेनिसमधील नामांकित व्यापारी होते. व्यापारानिमित्त ते व्होल्गा नदीखोऱ्यापासून कॉन्स्टँटिनोपलच्या (इस्तंबूल) प्रदेशापर्यंत प्रवास करीत असत. मंगोल साम्राज्याच्या काळात त्यांनी चीनला भेट दिली. वयाच्या सतराव्या वर्षी मार्को आपल्या वडिलांबरोबर प्रवासाला निघून इराण,  अफगाणिस्तान, पामीरचे पठार असा खडतर प्रवास करीत १२७५ साली चीनमध्ये तो पोहोचला. परतीच्या प्रवासात त्याने भारताच्या पूर्वेकडील देश आणि भारत व अरबस्तानला भेट देऊन तो १२९५ मध्ये परत व्हेनिसला पोहोचला.

रोमन काळापासून चीन, भारत व अतिपूर्वेकडील आशियाई देशांशी ज्या खुष्कीच्या मार्गाने व्यापार चालत असे, तो मार्ग अब्बासी खिलाफतीच्या कालखंडात यूरोपियन लोकांसाठी बंद पडलेला होता. चंगीझखानाचा नातू हूलागूखान याने बगदादची अब्बासी खिलाफत नष्ट करून आशियात मंगोल सत्ता स्थापन केल्यावर म्हणजे १२५८ नंतर हा मार्ग पुन्हा यूरोपियन व्यापाऱ्यांसाठी खुला झाला. या संधीचा फायदा घेऊन १२६० मध्ये निकोलॉ व चुलते माफफेओ यांनी काळा समुद्र पार करून ते क्रिमियातील सूडाक या शहरी आले. तेथून ते सराईमार्गे बूखाऱ्यास गेले. सध्याच्या उझबेकिस्तानमधील हे बूखारा शहर त्यावेळेसही मोठे आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. तेथे खानाच्या राजदूताशी त्यांची भेट झाली व त्याच्याबरोबरच ते चीनला गेले. मध्ययुगीन काळात चीनमध्ये जाणारे ते पहिले यूरोपीय व्यापारी होते, हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे. पीकिंगमध्ये त्यांनी कूब्लाईखान या मंगोल सम्राटाची भेट घेतली. त्याने  निकोलॉ  व माफफेओ यांचे स्वागत केले आणि काही काळ त्यांना ठेवूनही घेतले. १२६९ मध्ये पोलो बंधू इटलीला परतले, तेव्हा ‘चीनमध्ये १०० ख्रिस्ती अभ्यासक (मिशनरी) पाठवावेत’ या आशयाचे पत्र कूब्लाईखानाने पोलो बंधूंबरोबर पोपला पाठवले. १२७१ साली पोलो बंधू सतरा वर्षांच्या मार्कोसह पुन्हा चीनकडे व्यापारासाठी निघाले आणि एकर येथून जेरूसलेमला पोहोचले, तेथून ते उत्तरेकडे प्रवास करीत सिरियाच्या किनारी आले. आयाश येथून इराणच्या आखातावरील हॉर्मूझ या बंदरात आले. तेथून जलमार्गाने चीनला जाण्याचा त्यांचा विचार होता, परंतु जहाज मिळू न शकल्याने त्यांनी खुष्कीच्या मार्गाने जाण्याचे ठरविले. इराणचे वाळवंट ओलांडून ते अफगाणिस्तानातील बाल्ख शहरी आले. येथून ते ऑक्ससमार्गे वाखान, नंतर पामीर पठार ओलांडून ते कॅश्गार, यार्कंद, खोतानमार्गे लॉप नॉर सरोवराच्या किनाऱ्याशी आले. नंतर गोबी वाळवंट पार करून १२७५ मध्ये चीनमधील शांगडू शहरी दाखल झाले.

चीनमध्ये मार्कोने मंगोल भाषेचा अभ्यास केला. मार्कोची हुशारी, विशेषत: त्याचे भाषाप्रभुत्व व बहुश्रुतता, या गुणांनी कूब्लाईखान खूश झाला. खानाने १२७७ मध्ये मार्कोची नागरी सेवेत नेमणूक केली. थोड्याच अवधीत कूब्लाईखानाच्या तो खास मर्जीतील समजला जाऊ लागला. मार्कोने तिबेट, ब्रह्मदेश, कोचीन, चीन, श्रीलंका, ईस्ट इंडीज बेटे, भारत इ. प्रदेशांना भेटी दिल्या. उत्तर भारत वगळता त्याने कन्याकुमारी, भारताचा पश्चिम किनारा, रामेश्वर ते अंदमान-निकोबारपर्यंतच्या प्रदेशाचे प्रवासवर्णन केले आहे. सतरा वर्षे चीनमध्ये काढल्यानंतर पोलोला मायदेशी परतण्याची इच्छा झाली, पण कूब्लाईखान त्याला सोडण्यास राजी नव्हता. पण पुढे त्याला ती संधी मिळाली. १२९२ मध्ये चिंगज्यांग (झैतून) बंदरातून तो परतीच्या प्रवासास निघाला. वाईट हवामानास तोंड देत मलाक्काच्या सामुद्रधुनीतून निकोबार बेटे, श्रीलंका, भारत या मार्गाने अडीच वर्षांनी तो इराणला पोहोचला. प्रवासातच त्याच्याबरोबर असलेले प्रशियाचे दोन दूत मरण पावले व कूब्लाईखानाच्या मृत्यूची वार्तापण समजली. पुढे पोलो प्रशियाच्या दरबारातील नऊ महिन्यांच्या वास्तव्यानंतर ट्रॅबझन येथून जहाजाने काळा समुद्र पार करून कॉन्स्टँटिनोपलमार्गे ग्रीसमधील युबोआ बेटाला वळसा घालून १२९५ मध्ये व्हेनिसला पोहोचला. दरम्यानच्या काळात त्याने सु. २४,००० किमी.चा प्रवास केला होता.

व्हेनिस आणि जेनोआ यांमध्ये १२९८ साली झालेल्या युद्धात मार्कोला युद्धकैदी म्हणून पकडण्यात येऊन जेनोआतील तुरुंगात ठेवण्यात आले. तेथे त्याच्याबरोबर पीसा येथील रुस्टीचल्लो हा लेखक होता. मार्को पोलोने त्याला आपल्या प्रवासाचा वृत्तांत सांगितला. या वृत्तांतावरून व मार्को पोलोच्या रोजनिशीवरून त्याने डिस्क्रिप्शन ऑफ द वर्ल्ड हे पुस्तक लिहिले. मूळचे लॅटिनमध्ये लिहिलेले हे पुस्तक नंतर अनेक यूरोपियन भाषांमध्येही प्रसिद्ध झाले. त्यांनी द बुक ऑफ मार्को पोलो हे पुस्तक तुरुंगातून सुटल्यानंतर तयार केले. थोड्याच कालावधीत सर्व यूरोपभर त्याचा पुस्तकाची प्रसिद्धी झाली. छपाई कला अवगत नसल्याने त्यांच्या काढलेल्या ८५ हस्तलिखित प्रती उपलब्ध आहेत. त्याची पहिली छापील आवृत्ती १४७७ मध्ये काढण्यात आली. या पुस्तकात मार्को पोलोने परतीच्या प्रवासात भारताच्या दक्षिण किनारपट्टीतून प्रवास करताना दक्षिणेतील मलबार प्रांताचे लोकजीवन, तेथील गूढविद्या तसेच पाहिलेले देश, तेथील लोक, समाजजीवन, पशुपक्षी इत्यादींची विस्तृत वर्णने केली आहेत. भारतातील लोकांच्या शरीरावर फक्त कटीवस्त्र असते, अगदी राजाच्या शरीरावरसुद्धा फक्त एक वस्त्र असते. राजाच्या गळ्यात एकशे चार मोत्यांची माळ असते, तर हाता-पायात सोन्याची कडी घातलेली असतात. येथील राजांचा खजिना सुवर्ण व रत्नांनी काठोकाठ भरलेला असतो, असे वर्णन त्याने केले आहे. त्याचप्रमाणे सती व देवदासी प्रथा, येथील ब्राह्मणांचे ज्ञान, येथील लोकांचे व्यापार, लोकांची इमानदारी, विश्वासपात्रता, रीतिरिवाज, कायदा सुव्यवस्था आदींसह समुद्रातून येथील लोक मोती आणि पोवळे कसे काढतात, यांचे वर्णनही त्याने केले आहे.

मार्कोने प्रवासात स्वतः बघितलेल्या गोष्टींबद्दल लिहिलेले असल्याने आणि ऐकीव गोष्टी व भाकडकथा न लिहिल्यामुळे त्याचे प्रवासवर्णन खरे वाटते. त्याने स्वत:बद्दल खूप कमी माहिती लिहून ठेवली आहे. त्याचे प्रवासवर्णन वाचताना त्याच्या स्वभावाबद्दल, तसेच त्याच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल माहिती मिळते. त्याने लिहिलेले वर्णन मूळ लॅटिन, फ्रेंच किवा इटालियन भाषेतील आहे, याविषयी वाद आहेत. मार्कोच्या माहितीपेक्षा त्याने लिहिलेली आशियाई देशांची वर्णने यूरोपात विशेष लोकप्रिय ठरली. चीनच्या दिलेल्या सविस्तर माहितीवरून असे दिसते की, त्या काळात चीन यूरोपपेक्षा सांस्कृतिक व तांत्रिकदृष्ट्या खूप पुढारलेला होता. कूब्लाईखानाचे साम्राज्य अतिशय समृद्ध व प्रगत होते. यूरोपमध्ये तांबे, सोने, यांची जड नाणी वापरात होती, तर चीनमध्ये कागदी चलन वापरले जाई. विशेष म्हणजे चीनमध्ये काळा दगड, द्रव पदार्थ, दगडी कोळसा, खनिज तेल जाळले जात असे.

क्रिस्तोफर कोलंबस याच्याकडे मार्को पोलोच्या पुस्तकाची एक लॅटिन आवृत्ती होती. त्याने हे पुस्तक वाचून काही टिपणे काढली होती. त्या पुस्तकाची एक प्रारंभीची इटालियन भाषेतील मुद्रित प्रत १५५९ सालची असून १८२४ मधील तयार झालेली फ्रेंच प्रत सध्या प्रमाणभूत समजली जाते.

मार्को पोलो याचे व्हेनिस येथे निधन झाले. त्याला तीन मुली होत्या.

संदर्भ :

  • Maurice, Collis, Ed., Marco Polo, London, 1949.
  • Komroff, Manuel, Trans., & Ed., The Travels of Marco Polo, New York, 1926.
  • शंखधर, जगत, अनु., मार्को पोलो,  सूचना और प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, १९६२.

                                                                                                                                                                                                                          समीक्षक : प्रमोद जोगळेकर