निद्रा म्हणजे झोप. वात, पित्त व कफ याप्रमाणेच आहार, निद्रा व ब्रह्मचर्य यांनाही आयुर्वेदात फार महत्त्वाचे स्थान आहे. आहार, निद्रा व ब्रह्मचर्यरूपी तिपाईवर आपले जीवन आधारलेले असते. म्हणूनच वात, पित्त व कफ यांच्या खालोखाल महत्त्वाचे असलेल्या या तीन घटकांना तीन उपस्तंभ म्हणतात. यापैकी एक उपस्तंभ म्हणजे निद्रा होय.

जेव्हा  मन व सर्व इंद्रिये थकतात त्यावेळी ते स्वत:च्या विषयांपासून निवृत्त होतात व त्यावेळी झोप येते. चांगली व पुरेशी झोप झाल्यास शरीराचे पोषण नीट होते, शरीराचे बळ व वीर्य वाढते, ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता वाढते, आयुष्य वाढते. झोप नीट न झाल्यास मनुष्य रोडावतो, दुबळा, नपुंसक व दु:खी होतो, ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता मंदावते, अल्पवयात मृत्यू येऊ शकतो. तसेच भलत्यावेळी झोपणे, खूप झोपणे यामुळेही आयुष्याची हानी होते.

दिवसा झोपणे आरोग्यासाठी अपायकारक आहे कारण त्यामुळे कफ व पित्त याबाबतचे दोष वाढतात व रोग निर्माण करतात. त्यातही लठ्ठ व कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी, कफाचे रोग झालेल्यांनी, सदैव तेलकट तुपकट अन्न खाणाऱ्यांनी  दिवसा मुळीच झोपू नये. फारच आवश्यक वाटल्यास बसूनच डुलकी घ्यावी. दिवसा झोपल्याने डोकेदुखी, शरीर जड वाटणे, अंगदुखी, भूक नाहीशी होणे, छातीत जडपणा जाणवणे, अंगावर सूज येणे, मळमळ, सारखी सर्दी-खोकला, तोंडाला चव नसणे, अर्धशिरी, गळ्याचे आजार, स्मरणशक्ती कमी होणे, काही त्वचेचे विकार असे अनेक आजार होतात. दिवसा झोपणे काही वेळा मात्र निषिध्द नाही. जसे उन्हाळ्यात थोडा वेळ दिवसा झोपण्यास हरकत नाही. कारण उन्हाळ्यातील कोरड्या हवेमुळे वात वाढतो. दुपारच्या झोपेने वाढलेला कफ या वाताला नियंत्रित करतो. शिवाय रात्र लहान झाल्याने झोप अपूरी होते, जिची पूर्तता दुपारच्या झोपेने होऊ शकते. तसेच गायक मंडळी, सतत अभ्यास करणारे विद्यार्थी, कष्टकरी लोक, रात्रपाळी करणारे लोक, आजारी, वृद्ध व लहान मुले यांनीही दुपारी झोपण्यास हरकत नाही.

आयुर्वेदात झोपेचे एकंदरीत तीन प्रकार सांगितले आहेत —

 (१) तामसी : तम गुण अत्यधिक प्रमाणात वाढल्यामुळे तामसी निद्रा येते. या झोपेच्या प्रभावाखाली असलेल्या व्यक्तीला कुठल्याच जाणीवा नसतात. ही निद्रा मृत्यूनिर्देशक ठरू शकते.

(२) स्वाभाविकी : ही निद्रा आपोआप येते. फक्त व्यक्तीमधील रजोगुण वाढल्यास रजोगुणाच्या चंचलतेमुळे निद्रा कधी दिवसा, तर कधी रात्री येते. सत्वगुण संपन्न व्यक्तींमध्ये झोप मात्र मध्यरात्रीच येते. रात्री सत्वाचा जोर थोडा कमी होतो व तमगुण काही काळ प्रबळ ठरतो म्हणून झोप येते. या दोन्ही प्रकारच्या निद्रा स्वाभाविकी निद्रा होत.

(३) वैकारिकी : काही कारणांमुळे शरीरातील कफ दोष दुबळा झाला, तर वात दोष वाढतो.  त्यामुळे झोप येतच नाही किंवा कमी येते. तसेच काही आजारांत दुखण्यांमुळे सुद्धा झोप येत नाही. या झोपेला वैकारिकी निद्रा म्हणतात.

पहा : झोप, निद्रा (योगविज्ञान).

संदर्भ :

  • चरक संहिता—सूत्रस्थान, अध्याय २१, श्लोक ३३-५०.
  • सुश्रुत संहिता—शारीरस्थान, अध्याय ४, श्लोक ३३.

समीक्षक : जयंत देवपुजारी