पवार, आप्पासाहेब गणपतराव : (५ मे १९०६ –३० डिसेंबर १९८१). महाराष्ट्रातील एक शिक्षणतज्ज्ञ, मुरब्बी प्रशासक, मराठ्यांच्या इतिहासाचे ख्यातकीर्त संशोधक आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे शिल्पकार. महाराष्ट्र राज्याचे ते पहिले शिक्षण संचालक होते. त्यांचा जन्म कुरुंदवाड संस्थानातील मुचंडी या बेळगावपासून जवळ असलेल्या एका खेडेगावात शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गणपतराव, तर आईचे नाव गंगाबाई होते. त्यांना श्रीपतराव व बसवंतराव नावाचे दोन भाऊ आणि विमलाबाई (विमलाबाई वसंतराव बागल) ही एक बहीण होती. त्यांचे वडील कुरुंदवाड संस्थानचे सनदी वकील होते. वकिली व्यवसायाच्या निमित्ताने गणपतरावांनी मुचंडीहून बेळगाव जवळच्या वडगावला १९१२ साली सहकुटुंब स्थलांतर केले. त्यानंतर आप्पासाहेबांचे औपचारिक शिक्षण सुरू झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण वडगाव येथे, तर शहापूर येथील चिंतामणराव हायस्कूलमधून (पूर्वीचे सर परशुरामभाऊ पटवर्धन हायस्कूल) माध्यमिक शिक्षण झाले. १९२४ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.
आप्पासाहेब उच्चशिक्षणासाठी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये दाखल झाले. त्यावेळी डॉ. बाळकृष्ण हे इतिहास संशोधक व शिक्षणतज्ज्ञ राजाराम कॉलेजचे प्राचार्य होते. कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षेत भौतिकशास्त्र आणि इंग्रजी या विषयांत आप्पासाहेब प्रथम आल्यामुळे त्यांना करवीर दरबारची ‘आल्फ्रेड शिष्यवृत्ती’ (स्कॉलरशिप) मिळाली. त्यांनी बी. ए. साठी इतिहास, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र हे विषय निवडल्यामुळे ते डॉ. बाळकृष्ण यांच्या संपर्कात आले. डॉ. बाळकृष्ण यांची विद्वत्ता, त्यांचे प्रभावी वक्तृत्व व अभ्यासू वृत्ती या गोष्टींचा आप्पासाहेबांच्यावर प्रभाव पडला. १९२८ साली आप्पासाहेबांनी मुंबई विद्यापीठाची बी. ए. पदवी संपादन केली. या पदवी परीक्षेतील उच्च गुणवत्तेमुळे त्यांना पुढील शिक्षणासाठी कोल्हापूर संस्थानाची अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) व मुंबई प्रांतिक सरकारची शिष्यवृत्ती मिळाली. १९३० साली त्यांनी इतिहास व अर्थशास्त्र या विषयांत एम. ए. पूर्ण केले, तर १९३१ साली एलएल.बी. झाले.
इतिहास विषयात ‘डॉक्टरेट’ मिळवण्यासाठी इंग्लंडला जाण्याचा त्यांनी निर्धार केला. परदेशातील उच्च शिक्षणासाठी त्यांना आवश्यक आर्थिक पाठबळ कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापुरातील मराठा समाजातील सधन धान्य व्यापारी बळवंतराव सखाराम शिंदे यांच्या भरीव मदतीने उभे राहिले. ऑगस्ट १९३१ ला ते इंग्लंडला गेले. लंडन विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ ऑरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज्’ मध्ये त्यांनी प्रा. बार्नेट यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षे संशोधन करून ‘दि रेन ऑफ शाहू छत्रपती’ (१७०८–१७४९) हा सातारच्या छ. शाहू महाराजांच्या कारकिर्दीचा समग्र अभ्यास करणारा प्रबंध सादर केला व त्यांना लंडन विद्यापीठाची इतिहास विषयाची विद्यावाचस्पती (पीएच. डी.) पदवी मिळाली (१९३४). इंग्लंडमधील वास्तव्यात त्यांनी अडचणींवर मात करून बार–अॅट–लॉ चा अभ्यासक्रम यशस्वी रीत्या पूर्ण केला. १९३५ च्या ऑगस्ट महिन्यात ते उच्चविद्याविभूषित होऊन इंग्लंडहून मायदेशी परतले. पुढे त्यांची कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये इतिहास व अर्थशास्त्र या विषयांचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली (नोव्हेंबर १९३५). त्यांचा बळवंतराव शिंदे यांच्या ‘सुशीला’ या कन्येशी विवाह झाला (६ मे १९३६). त्यांना पाच मुली व दोन मुलगे अशी सात अपत्ये होती.
आप्पासाहेब राजाराम कॉलेजमध्ये १९३५–४५ पर्यंत प्राध्यापक आणि १९४५ ते १९४९ या कालावधीत प्राचार्य होते. प्रभावी अध्यापन आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक ही त्यांची वैशिष्ट्ये. कोल्हापूर संस्थानाच्या विलीनीकरणानंतर त्यांची उत्तर गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील विसनगरच्या एम. एन. महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून बदली झाली. १९४९–५२ या तीन वर्षांत या महाविद्यालयाची नवीन इमारत पूर्ण करण्यात व या महाविद्यालयास सरकारची मान्यता मिळवून देण्यात त्यांचा सक्रिय पुढाकार होता. पुढे त्यांनी मुंबई राज्याच्या शिक्षण प्रशासन सेवेतील शिक्षण उपसंचालक (१९५२–५४); अध्यक्ष, माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ, पुणे (१९५४–५८); शिक्षण सहसंचालक, मुंबई राज्य (१९५८–५९); शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य (१९६०–६२) या पदांवर काम केले.
महाराष्ट्र शासनाने १९६२ साली दक्षिण महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाची स्थापना केली. त्या नवीन विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून शासनाने आप्पासाहेबांची नियुक्ती केली. नव्याने स्थापन झालेल्या या विद्यापीठाच्या उभारणीचे मोठे आव्हान त्यांनी समर्थपणे पेलले. आपल्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत (२० सप्टेंबर १९६२–२० जानेवारी १९७५) त्यांनी दूरदृष्टीने शिवाजी विद्यापीठाच्या भावी वाटचालीची भक्कम पायाभरणी केली. कठोर परिश्रम घेऊन त्यांनी कोल्हापूरच्या निर्जन, उजाड सागर माळावर चैतन्यशाली विद्यानगरी वसविली. नवोदित प्रादेशिक विद्यापीठाच्या सर्व गरजा लक्षात घेऊन त्यांनी शिवाजी विद्यापीठाची उभारणी केली. त्यांच्या कार्यकाळातील विद्यापीठ परिसराचा विकास, प्रशासनाची भक्कम चौकट, मजबूत अर्थव्यवस्था, नावीन्यपूर्ण उपक्रम, योजना यांमुळे शिवाजी विद्यापीठाचा सर्वत्र नावलौकिक झाला. विद्यापीठाच्या उभारणीतील त्यांच्या असामान्य योगदानामुळे त्यांना शिवाजी विद्यापीठाचे शिल्पकार म्हटले जाते.
आप्पासाहेब अव्वल दर्जाचे इतिहास संशोधक होते. मराठ्यांच्या इतिहास संदर्भातील त्यांची कामगिरी प्रशंसनीय आहे. इ. स. १६०० ते १७६१ या कालखंडातील मराठ्यांच्या इतिहासाचा त्यांचा गाढा व्यासंग होता. त्यांचे इतिहास संशोधनातील योगदान दोन प्रकारचे होते : १. प्रकाशित शोधनिबंध. २. ऐतिहासिक कागदपत्रांचे संपादन. त्यांचे निवडक १४ शोधनिबंध स्टडीज् इन मराठा हिस्ट्री (खंड–१) या ग्रंथात प्रकाशित झाले (१९७१). त्यांचा १९३४ साली लंडन विद्यापीठाला सादर केलेला पीएच. डी. चा प्रबंध २०१३ साली शिवाजी विद्यापीठाने प्रकाशित केला. त्यांचे शिवाजी विद्यापीठाच्या ऐतिहासिक ग्रंथमालेत ताराबाईकालीन कागदपत्रे, खंड – १, २ व ३; ताराबाई पेपर्स : ए कलेक्शन ऑफ पर्शियन लेटर्स; जिजाबाईकालीन कागदपत्रे आणि राजर्षी शाहू छत्रपती पेपर्स या ग्रंथमालेतील पहिला खंड फ्रॉम ॲडॉप्शन टू इन्स्टॉलेशन हे ऐतिहासिक कागदपत्रांचे सहा खंड संपादित करून प्रकाशित केले आहेत. करवीर राज्य संस्थापिका महाराणी ताराबाईंच्या कामगिरीचे साधार विवेचन व मूल्यमापन हे आप्पासाहेबांचे मराठा इतिहास अभ्यासातील महत्त्वाचे योगदान आहे.
अखिल भारतीय इतिहास परिषद; इंडियन हिस्टॉरिक रेकॉर्डस् कमिशन; इन्स्टिट्यूट ऑफ हिस्टॉरिकल स्टडीज्, कोलकात्ता; महाराष्ट्र इतिहास परिषद; भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे या इतिहास संशोधन क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्था–संघटनांचे ते क्रियाशील सभासद होते. १९७१ साली ‘भारत- लंका आंतरविद्यापीठ महामंडळ’ या संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती.
त्यांचे पुणे येथे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले.
संदर्भ :
- भोसले, अरुण, शिवाजी विद्यापीठाचे शिल्पकार कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार, कोल्हापूर, २०१२.
समीक्षक : अवनीश पाटील
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.