जोधपूर (राजस्थान) येथे प्रसिद्ध असलेल्या मेहरानगड किल्ल्याच्या पायथ्याशी फिकट रंगाच्या वालुकाश्म खडकांचा जोधपूर श्रेणी आणि मलाणी अग्निज कुल/गट खडकांचा संपर्क ठळकपणे पाहावयास मिळतो. येथील अग्निज कुल खडक हे भारतीय उपखंडामध्ये कँब्रियन पूर्व काळातील शेवटच्या टप्प्यातील अग्निज क्रियाशील घडामोडींचे दर्शक आहेत. हे खडक जांभळा ते लाल व राखाडी रंगाचे असून स्तरिकीत टफ (Stratified Tuffs) आहेत. त्यांच्याबरोबर इग्निमबराइट (Ignimbarite) खडकाशी साम्य असणारे, तपकिरी-चॉकलेट रंगाचे कॅल्सिडोनी (Chalcedony; गारेचा दगड), गडद लाल रंगाचे ऑब्सिडीअन (Obsidian), जांभळट, लालसर, फिकट पिवळा, पांढरट आणि राखाडी रंगाचे ऱ्हायोलाइट टफ (Rhyolite Tuff) हे सर्व एकत्रित आढळतात. हे सर्व खडक कँब्रियन पूर्व प्राचीन भूवैज्ञानिकीय काळात झालेल्या केंद्रीय ज्वालामुखीय उद्रेकाचे (Central volcanic eruption) संकेत देतात.
या लाव्हा थरांसहित असलेल्या अग्निज कुल खडकांवर अपक्षरण पृष्ठ (Erosional surface) तयार झालेले दिसून येते. याचाच अर्थ त्या काळात निक्षेपण खंडित झाल्याने अपक्षरण पृष्ठ तयार होऊन ही अभिविसंगती (Unconformity) झालेली आहे आणि त्यावर तुलनेने तरुण असलेले वालुकाश्म (Younger sandstones) नंतरच्या काळात निक्षेपित झालेले आहेत. गडद रंगाच्या खडकांचे अग्निज कुल आणि फिकट रंगाचे वालुकाश्म असल्यामुळे त्यांच्यातील संपर्कसंबंध ठळकपणे दिसून येतो.
जोधपूर शहर हे जयपूर शहराच्या दक्षिण-पश्चिमेला/नैऋत्य दिशेला असून, इतर सर्व मोठ्या शहरांशी राज्य महामार्ग रस्त्यांनी जोडलेले आहे. हे उत्तररेल्वेच्या प्रमुख मार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे आणि ते हवाई मार्गानेही जोडले आहे.
संदर्भ :
https://www.gsi.gov.in/webcenter/portal/OCBIS/pageGeoInfo/pageGEOTOURISM?_adf.ctrl-state=dvd210a27_5&_afrLoop=29220469476959168#!
समीक्षक : पी. एस. कुलकर्णी