उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागातील पॅसिफिक पर्वतप्रणालीच्या एका भागाला कॅस्केड पर्वतश्रेणी म्हणतात. कॅलिफोर्निया राज्याच्या उत्तर भागातील लासेन शिखरापासून ही पर्वतश्रेणी उत्तरेकडे १,१०० किमी. पेक्षा अधिक अंतरापर्यंत दक्षिणोत्तर पसरलेली आहे. ही पर्वतश्रेणी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील ऑरेगन व वॉशिंग्टन राज्यांमधून कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांताच्या दक्षिण भागातील फ्रेझर नदीपर्यंत गेलेली आहे. ही पर्वतश्रेणी पॅसिफिक महासागराच्या किनार्यापासून १६० ते २४० किमी. आतपर्यंत जमिनीवर पसरलेली आहे. ऑरेगन राज्यात विलेमिट नदीखोर्याच्या पूर्वेस ही श्रेणी आहे. या पर्वतरांगा उत्तरेला ब्रिटिश कोलंबियातील कोस्ट मौंटनपर्यंत आणि दक्षिणेला सिएरा नेव्हाडा पर्वतरांगेपर्यंत अखंडपणे पसरलेल्या आहेत. ऑरेगन राज्याच्या दक्षिण भागातील वेस्टर्न कॅस्केड्स, कॅनडा-अ. सं. सं. यांच्या सरहद्दीदरम्यानची नॉर्थ कॅस्केड्स आणि कोलंबियातील कॅनडीयन कॅस्केड या कॅस्केड पर्वतश्रेणीतील प्रमुख श्रेण्या आहेत.
या पर्वतश्रेणीतील अनेक शिखरे ३,००० मी. पेक्षा उंच आहेत. उदा., हूड शिखर हे ऑरेगनमधील सर्वोच्च शिखर (उंची ३,४२५ मी.), मौंट रेनिअर हे वॉशिंग्टन राज्यातील व कॅस्केड पर्वतश्रेणीतील सर्वोच्च शिखर (४,३९२ मी.) असून त्याच श्रेणीत शॅस्टा शिखर (४,३१७ मी.) आहे. बहुतेक शिखरे मृत ज्वालामुखीचे शंकू असले, तरी लॅसन (३,१८७ मी.) व इतर अनेक शिखरांच्या ठिकाणी नजिकच्या भूतकाळात ज्वालामुखीचे उद्रेक झालेले आहेत. मौंट बेकर (३,२८५ मी.) येथून १९७५ मध्ये मोठ्या प्रमाणात वाफ बाहेर पडली होती, तर मौंट सेंट हेलेन्स (२,५५० मी.) या ज्वालामुखीचा १९८० व पुन्हा १९८१ मध्ये उद्रेक झाला होता. या पर्वतश्रेणीची निर्मिती २४ कोटी वर्षांपूर्वी सुरू झाली व गेल्या ६ ते ३ कोटी वर्षांत तिची उंची आणखी वाढत गेली.
हिमानी क्रिया व तिच्यातून निर्माण झालेली सरोवरे तसेच जलप्रवाहांनी झालेली विच्छेदनक्रिया यांच्या खुणा येथे आढळतात. ही पर्वतश्रेणी विलेमिट नदीच्या अनेक शीर्षप्रवाहांचा स्रोतप्रदेश आहे. याशिवाय इतरही अनेक नद्या या पर्वतश्रेणीत उगम पावतात. पश्चिम उतारावर २,५०० मिमी. पर्यंत वार्षिक पर्जन्यवृष्टी होते, तर ऑरेगनमधील या पर्वतश्रेणीवर मोठी हिमवृष्टी होते. ज्या उंचीपर्यंत वृक्ष वाढतात, त्या म्हणजेच तरुरेषेच्या वर असलेली शिखरे वगळता या संपूर्ण पर्वतश्रेणीवर दाट वने असून ती संरक्षित क्षेत्रे व राष्ट्रीय उद्याने आहेत. प्रामुख्याने सूचिपर्णी वृक्षांची दाट अरण्ये येथे आढळतात. जैवविविधतेच्या बाबतीत कॅस्केड पर्वतपरिसर समृद्ध आहे. या पर्वतश्रेणीच्या पूर्वेस अंतर्गत शुष्क प्रदेश आहे. जलप्रवाहांमुळे खोल निदर्या निर्माण झाल्या आहेत. तेथे फर व पाइन वृक्षांची दाट वने वाढली आहेत. कॅस्केड पर्वतश्रेणी पार करणार्या कोलंबिया नदीची निदरी अनेक ठिकाणी १२० मी. पेक्षा अधिक खोल झाली आहे. वॉशिंग्टन व ऑरेगन राज्यांच्या सीमेलगत खोदल्या गेलेल्या निदर्यांच्या दरम्यान सुंदर सोपानी धबधबे (कॅस्केड) निर्माण झाले असून त्यांवरून
कॅस्केड पर्वतश्रेणी हे नाव पडले आहे. या पर्वतश्रेणीमधून रेल्वेमार्गासाठी अनेक लांब बोगदे खोदले आहेत. यांपैकी अमेरिकेतील रेल्वेमार्गावरील एक सर्वांत लांब (१२.५ किमी.) बोगदा येथे असून त्याला कॅस्केड बोगदा म्हणतात.
नॉर्थ कॅस्केड्स, मौंट रेनिअर, क्रेटर सरोवर व लॅसन व्होल्कॅनिक राष्ट्रीय उद्यान, तसेच लाव्हा बेड्स नॅशनल मॉन्युमेंट आणि कॅनडातील मॅनिंग प्रॉव्हिन्शियल पार्क यांच्यामुळे या
पर्वतश्रेणीत असाधारण नैसर्गिक सौंदर्य स्थळे व भव्य नैसर्गिक सुंदर देखावे निर्माण झालेले दिसतात. पर्यटन, उघड्या निसर्गातील मनोरंजन तसेच जलविद्युत, कृषिसिंचन व उद्योगधंदे यांसाठी उपलब्ध असणारे पाणी ही येथील उद्यमशीलता व साधनसंपत्ती यांची साधने बनली आहेत.
जॉर्ज व्हँक्यूव्हर व विल्यम आर. ब्रौटन या इंग्रज मार्गनिर्देशकांनी १७९२ मध्ये ही पर्वतश्रेणी पाहिली होती; तर मेरीवेदर लेविस व विल्यम क्लार्क या अमेरिकी समन्वेषकांनी आपल्या वायव्येकडील १८०६ मधील मोहिमेत या पर्वतश्रेणीतील वॉशिंग्टन-ऑरेगन यांच्या सीमेवरील कोलंबिया नदीच्या १,२१९ मी. खोल निदरीतून प्रवास केला होता.
समीक्षक : वसंत चौधरी