रीडिंग, रूफस दानियल आयझाक्स : (१० ऑक्टोबर १८६० — ३० डिसेंबर १९३५). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल व व्हाइसरॉय (१९२१−२६) आणि एक मुत्सद्दी.  वडील जोसेफ मायकेल आयझॉक्स. त्याचा जन्म लंडनला सधन घराण्यात झाला.

रीडिंगचे सुरुवातीचे शिक्षण यथातथाच झाले. ऐन तारुण्यात त्याने खलाशाचे काम पतकरले व अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि हिंदुस्थानचा प्रवास केला. नंतर त्याने कारकुनी पेशा पतकरला (१८८०). पुढे त्याने शेअर बाजाराचे सदस्यत्व घेतले व तो बार ॲट लॉ झाला (१८८७). याच सुमारास त्याने ॲलिस एडिट या आल्बर्ट कोअनच्या मुलीशी लग्न केले. वकिलीत त्याला प्रतिष्ठा आणि पैसा मिळाला.व्यापारी निगम आणि कामगार संघटना यांचे तो प्रतिनिधित्व करू लागला. १९०४ मध्ये तो हाउस ऑफ कॉमन्सवर निवडून आला आणि लॉइड−जॉर्जशी त्याची मैत्री जडली. त्याची महान्यायाभिकर्ता म्हणून नेमणूक झाली (१९१०). पुढे तो प्रिव्ही कौन्सिलर व नंतर महान्यायवादी झाला. १९१३ मध्ये तो इंग्लंडचा मुख्य न्यायाधीश (१९१३−२१) झाला. त्याला बॅरन करण्यात आले. मुख्य न्यायाधीश असताना काही दिवस अमेरिकेत राजदूत म्हणून त्याने काम कले (१९१८-१९). पहिल्या महायुद्ध काळात त्याने इंग्लंड−अमेरिकेचे राजनैतिक संबंध दृढतर केले व फ्रान्सच्या प्रतिमंडळासही सहकार्य दिले. त्यातून अमेरिकेकडून पन्नास कोटी डॉलर्स कर्ज मिळविले. नंतर त्याची हिंदुस्थानात व्हाइसरॉय म्हणून नियुक्ती झाली (१९२१).

रीडिंग हिंदुस्थानात आला त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीचा जोर वाढला होता. म. गांधींनी असहकारितेची चळवळ सुरू केली होती. त्यामुळे देशात सरकारविरुद्ध असंतोषाची लाट उसळली. त्याचवेळी प्रिन्स ऑफ वेल्स यांचे हिंदुस्थानात आगमन झाले. त्यावर लोकांनी बहिष्कार घातला आणि अहिसात्मक लढ्याने हिंसात्मक वळण घेतले. चौरीचौरा येथील पोलीस चौकी लोकांनी जाळून टाकली. त्यातील सर्व पोलीस मृत्यूमुखी पडले. मुंबई, मद्रास आदी शहरांतून दंगली उसळल्या. मलबारला मोपल्यांनी बंड करून कित्येक हिंदूंना मारले. त्याची प्रतिक्रिया उत्तर प्रदेश व पंजाबमध्ये झाली. ब्रिटिशांनी हिंदु-मुस्लिम नेत्यांची धरपकड केली. म. गांधींना सहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. कायदेमंडळाचा विरोध न जुमानता रीडिंगने मिठावरील कर वाढविला. यामुळे लॉर्ड रीडिंग अल्प काळातच अप्रिय झाला. रीडिंगने रौलट ॲक्ट सुधारला, देशी कापडावरील जकात कमी केली आणि सैन्यातील हिंदी लोकांना किंग्ज कमिशन देण्याची व्यवस्था केली तसेच हिंदी तरूणांना लष्करी शिक्षण मिळावे म्हणून रॉयल मिलिटरी ॲकॅडमी (सँढर्स्ट) या संस्थेत काही जागा राखून ठेवण्यात आल्या. त्यानेच रॉयल इंडियन नेव्हीची स्थापना करून नाविक शिक्षणाला महत्त्व दिले.

१९२६ साली रीडिंग इग्लंडला परत गेला. इंग्लंडला परतल्यानंतर त्याला मार्क्विस हा शाही किताब देण्यात आला. सर्वसामान्य नागरिकाला आपल्या हयातीत हा सरंजामशाही किताब मिळण्याचे ग्रेट ब्रिटनच्या इतिहासातील हे दुसरे उदाहरण. १९३१ मध्ये रीडिंगची परराष्ट्र सचिवपदावर रॅम्सी मकडॉनल्ड याने नियुक्ती केली. त्याला पुढे लॉर्ड वॉर्डन करण्यात आले (१९३४). उर्वरित जीवन त्याने समुद्रसान्निध्यात वाल्मर कॅसल येथे व्यतीत केले.

अल्पकालीन आजारानंतर तो लंडन येथे मरण पावला.

जेराल्ड रूफस आयझॉक्स या मुलाने त्याचे दोन खंडांत चरित्र लिहिले आहे (१९४२−४५).

संदर्भ  :

  • Mill, James, History of British India, 3 Vols., New Delhi, 1972.
  • Sethi, R. R. Last Phase of British Sovereigenty in India, 1919-1947, New Delhi, 1948.