खडकांमधील नैसर्गिक कमान (नैसर्गिक पूल) ही प्रामुख्याने समुद्रकिनारी आणि नदी प्रवाहांमध्ये तसेच लाटांच्या विशिष्ट भागात बसणाऱ्या जोराच्या तडाख्याने वा खडक असमान झिजल्याने तयार झाल्याचे दिसून येते. नैसर्गिक रीत्या ज्या ठिकाणी कठीण व मृदू खडक अथवा भेगायुक्त खडक असतात, त्याठिकाणी मृदू खडकांचे किंवा भेगाळलेल्या खडकांचे सातत्याने कारक क्रिया झाल्याने असमान अपक्षरण होऊन खडकाला मोठे छिद्र पडते किंवा बोगदा तयार होतो. कठीण खडकावर विशेष परिणाम न झाल्याने ते तसेच राहतात आणि बोगदा रुंदावत किंवा उंचावत जातो. कालांतराने त्याठिकाणी कमानी तयार होतात. बहुतेक वेळा प्रचंड अशा भूशास्त्रीय कालौघामध्ये अशा कमानीतील अधांतरी अवस्थेत असलेले खडक तुटून खाली पडल्याने कमानीचे अस्तित्व टिकत नाही, अशा परिस्थितीत नैसर्गिक कमान पाहावयास मिळणे हे आश्चर्य ठरते.
आंध्रप्रदेशात चित्तूर जिल्ह्यातील तिरुमला डोंगरामधील क्वॉर्ट्झाइट (Quartzite) या खडकांमध्ये ८ मी. रुंद व ३ मी. उंच अशी नैसर्गिक रीत्या तयार झालेली आणि संरक्षित असलेली अद्वितीय अशी नैसर्गिक कमान पाहावयास मिळते. भूशास्त्रीय स्तंभातील मध्य (Middle) ते उत्तर (Upper) सुपुराकल्प (प्रोटिरोझोइक; Proterozoic) काळातील (सुमारे १६०० ते ५७० दश लक्ष वर्षे / १६० ते ५७ कोटी वर्षांपूर्वी) अवसादी निक्षेपणानंतर सौम्य रुपांतरण झालेल्या शैलसमुहाच्या कडाप्पा महासंघातील (Cuddapah Super group) हे क्वॉर्ट्झाइट खडक आहेत. या भेगायुक्त क्वॉर्ट्झाइट खडकांवर एकाच दिशेने, प्रामुख्याने वारा आणि पाणी या कारकांनी लाखों वर्षे अपक्षय आणि अपक्षरण क्रिया केल्याने ही कमान तयार झाली असल्याचे भूवैज्ञानिकांचे मत आहे. ही नैसर्गिक कमान तिरुपती शहराच्या वायव्येला १० किमी. अंतरावर असलेल्या तिरुमला डोंगररांगेतील शेवटच्या शेषाद्री डोंगरात, तिरुमला देवस्थानच्या उत्तरेला १ किमी. अंतरावर चक्र तीर्थाकडे जाणाऱ्या घाट रस्त्यावर आहे. मुंबई-चेन्नई मुख्य रेल्वे मार्गावर रेणीगुंठा स्थानकापासून तेथे जाता येते. तिरुपती हे भारतातील सर्व प्रमुख शहरांशी रस्ते व हवाई मार्गाने जोडलेले आहे. अमेरिकेमध्ये उटाह प्रांतातील नॅशनल पार्कमध्येसुद्धा अशा प्रकारचे रेनबो कमान पाहावयास मिळते.
संदर्भ :
- संकेतस्थळ : Geological Survey of India, https://www.gsi.gov.in/webcenter/portal/OCBIS/pageGeoInfo/pageGEOTOURISM?_adf.ctrl-state=dvd210a27_5&_afrLoop=29220469476959168#!
- समीक्षक : पी. एस. कुलकर्णी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.