नेफेलीन सायनाइट हे किसनगढ (अजमेर; राजस्थान) गावातील राष्ट्रीय भूवैज्ञानिकीय शिला स्मारक त्याच गावाच्या नावाने भारतीय भूशास्त्रीय इतिहासात प्रचलित असून अतिप्राचीन काळातील दुर्मिळ खडक म्हणून प्रसिद्ध आहे.

भारतीय उपखंडाचा मुख्य भाग हा धारवार (Dharwar), बस्तर (Bastar), सिंगभूम (Singbhum), बुंदेलखंड (Bundelkhand) व अरवली (Aravali) या ५ प्रमुख क्रेटॉन- भूखंड केंद्रक (Craton) यांनी बनलेला आहे. भूखंड केंद्रक हे सर्व अतिप्राचीन खंड आणि उपखंडाच्या केंद्रीय स्थानातील पृथ्वीच्या मूळ तथा प्राथमिक पृष्ठभाग निर्मितीप्रक्रियेशी (Primary crust formation) संलग्नित आणि प्रामुख्याने पातालीय अग्निजन्य – रूपांतरित (Plutonic Igneous / Metamorphic) खडकांचे भाग असून अब्जावधी वर्षांच्या भूशास्त्रीय कालखंडात प्रामुख्याने क़ँब्रियन पूर्व (Pre Cambrian) काळापासून ते स्थिर आहेत; म्हणजेच त्यांच्यात फार मोठे भूवैज्ञानिकीय बदल झालेले नाहीत. असे हे खडक आज पृष्ठभागाजवळ उघडे पडलेले दिसतात, तर काही ठिकाणी त्यांच्यावर पातळ अवसादी खडकांचे आवरण पाहावयास मिळते.

भारतातील अरवली भूखंड केंद्रक हे विशेष महत्त्वाचे आहे. भूगर्भातील विवर्तनी हालचालींचाच एक भाग म्हणून जेव्हा याच्या केंद्रातील रूपांतरित खडकांचा हा भूभाग उचलला जाण्यासाठी (Antiform of metamorphites) जे पातालीय अभिस्थापन (Plutonic emplacement) झाले, त्यांच्यातील खडकांचा काही भाग म्हणजेच हे नेफेलीन सायनाइट खडक. हे खडक जास्त खोलीवरून (प्रावरणाच्या पृष्ठापासून; Mantle Layer) आलेल्या शिलारसाच्या (मॅग्मापासूनचा) अवसिलिक प्रकारातील आहे. यांच्या रासायनिक घटकांमध्ये ग्रॅनाइट खडकांपेक्षा सोडियम अल्कलीचे प्रमाण जास्त असून सिलिकाचे प्रमाण कमी असते. ह्यांच्यात नेफेलीन हे महत्त्वाचे आणि दुर्मिळ असलेले अवसिलिक खनिज (Under saturated mineral) तयार झालेले असते; यात क्वॉर्ट्झ (Quartz) खनिज नसते. ह्या खडकांचे वय सु. १५९० ते १९१० द.ल. वर्षांपूर्वी इतके आहे.

किसनगढ हे राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वर असून अजमेर या प्रसिद्ध शहराच्या ईशान्येला २६ किमी. अंतरावर असलेल्या पश्चिम रेल्वेच्या मुख्य मार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. किसनगढकडून जयपूरकडे जाणाऱ्या दुभाजक जोडरस्त्यापासून ५०० मी. अंतरावर हे राष्ट्रीय भूवैज्ञानिकीय स्मारक असून त्याची व्याप्ती प्रसिद्ध अशा गुंडूराव तलावापर्यंत आहे.

संदर्भ :

  • https://www.gsi.gov.in/webcenter/portal/OCBIS/pageGeoInfo/pageGEOTOURISM?_adf.ctrl-state=dvd210a27_5&_afrLoop=29220469476959168#!

समीक्षक : पी. एस. कुलकर्णी