शैवालस्तराश्म हे पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या प्रारंभ काळातील सूक्ष्म जीवजंतूंनी (Microbes) ठसे (Impression) प्रकारातील जीवाश्मांच्या रूपाने ठेवलेला पुरावा असल्याचे शास्त्रज्ञ मानतात. शैवालस्तराश्म ही निळ्या – हिरव्या शैवालामुळे (Blue – Green Algae) तयार झालेली एक संरचना आहे. यामध्ये शैवाळे आपल्या सूक्ष्म तंतूंच्या (Filaments) साहाय्याने पाण्यातील कार्बोनेट कणांना आकर्षित करून व एकत्र जोडून सपाट अथवा छोट्या उंचवट्याचे थर (mats) तयार करतात. त्याकाळातील परिस्थितीनुसार शैवालांची संख्या, आकार, त्यांचे एकत्रीकरण (Assembledges), गाळाचे प्रमाण आणि त्यांच्यातील कणांना जोडणारी क्रिया (Bonding) यांच्या एकत्रित परिणामाने; कालांतराने हे स्तरीय, स्तंभी आणि गाठीसारखी रचना (Stratiform, Columnar and Nodular structure) दाखवितात. हे बहुतांशी उथळ पाण्यात तयार होतात; ज्या ठिकाणी भरतीमुळे बारीक गाळाचे आणि कार्बोनेटचे प्रमाण मिळत जाते.

राजस्थान राज्यातील भोजुंडा (चितोडगढ जिल्हा) येथील शैवालस्तराश्म उद्यान हे विंध्यन महासंघाच्या बुडातील/तळातील (Lower Vindhyan Super group) भगवानपुरा चुनखडी खडकमाला (Bhagwanpura Limestone Series) गटामध्ये असलेल्या जीवाश्मांचे प्रतिनिधित्व करतात. चुनखडी खडकात छोट्या – मोठ्या प्रमाणात यांच्या विविध रचनांसह त्यांचे अस्तित्व येथे आढळते. त्यांचे भूशास्त्रीय वय साधारण १००० – १३०० द.ल. वर्षांपूर्वी इतके आहे.

या उद्यानातील वैशिट्यपूर्ण शैवालस्तराश्म हे चितोडगढ शहराच्या नैऋत्येला ६ किमी. अंतरावर असलेल्या भोजुंडा गावाजवळ; शेळीपालन केंद्राच्या बाजूला आणि तेथून जात असलेल्या चितोडगढ – उदयपूर राज्य महामार्ग रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाहवयास मिळतात.

संदर्भ :

  • संकेतस्थळ – Geological Survey of India, https://www.gsi.gov.in/webcenter/portal/OCBIS/pageGeoInfo/pageGEOTOURISM?_adf.ctrl-state=dvd210a27_5&_afrLoop=29220469476959168#!

समीक्षक : पी. एस. कुलकर्णी