सोव्हिएत महासंघात असलेल्या कैदी छावण्यांच्या पुरातत्त्वीय अभ्यासाला गुलाग श्रमछावण्यांचे पुरातत्त्व असे म्हटले जाते. हे बंदिछावण्यांच्या पुरातत्त्वीय अभ्यासाचे विशेष क्षेत्र आहे. साहजिकच या क्षेत्रातील संशोधनाची पद्धत बंदिछावण्यांच्या पुरातत्त्वासारखीच आहे [ बंदिछावण्यांचे पुरातत्त्व ].
रशियातील साम्यवादी क्रांतीनंतर (१९१७—१९२३) सोव्हिएत महासंघाची निर्मिती झाली. तेव्हापासून दीर्घकाळ, म्हणजे जवळजवळ सोव्हिएत महासंघाचे विघटन होईपर्यंत ‘पक्ष सफाई’ (party purges) या नावाखाली साम्यवादी पक्षातील विरोधकांना, सत्ताधारी वर्गाला गैरसोईच्या ठरणार्या लोकांना आणि लक्षावधी सामान्य नागरिकांना ’जनतेचे शत्रू’ किंवा ’प्रतिक्रांतिकारक’ ठरवून ठार केले जात असे. जिथे असे शक्य नाही तिथे अशा लोकांच्या श्रमशक्तीचा वापर करून घेण्यासाठी त्यांना बंदिछावण्यांत ठेवले जात असे. अशा छावण्यांना श्रमछावणी म्हणत. या छावण्यांसाठी गुलाग नावाची वेगळी यंत्रणा होती. गुलाग हे ’छावण्यांचे मुख्य प्रशासन’ या अर्थाच्या रशियन नावाचे लघुरूप आहे. गुलाग छावण्यांमध्ये अधूनमधून काही जणांचा निकाल (liquidation) लावला जाई. गुलाग यंत्रणेतील श्रमछावण्या प्रामुख्याने १९३१ ते १९६० या काळात अस्तित्वात होत्या. १९४० मध्ये सोव्हिएत महासंघात ५३ श्रमछावण्या आणि ४२३ ’श्रमिकांच्या वसाहती’ होत्या. १९२८ ते १९५३ या काळात अडीच कोटी लोक गुलाग छावण्यांमध्ये सडत पडले होते आणि एक कोटी सत्तर लाख मृत्युमुखी पडले होते. गुलाग हे नाव अमानवी प्रशासन, दडपशाही, दहशत, छळ, उपासमार, अतिश्रम, अपार मानवी वेदना आणि मृत्यूशी जोडले गेले आहे. विशेषतः अलेस्सान्द्र सोल्जनित्सिन (१९१८—२००८) या नोबेल सन्मानित रशियन लेखकाच्या गुलाग आर्किपेलागो आणि वन डे इन द लाइफ ऑफ इवान डेनिसोविच या दोन कादंबर्यांमुळे श्रमछावण्यांचे भीषण वास्तव पाश्चात्त्य जगासमोर आले.
गुलाग श्रमछावण्यांचे पुरातत्त्व या विषयाची पुरातत्त्वाच्या मुख्य धारेत (इंग्लिश भाषेतील) फारच कमी प्रमाणात चर्चा आढळते. याची तीन मुख्य कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे सोव्हिएत महासंघाचे १९९१ मध्ये विघटन होईपर्यंत गुलाग श्रमछावण्यांचे दस्तऐवज पोलादी पडद्याआड होते आणि त्या परिस्थितीत श्रमछावण्यांच्या अथवा सामूहिक हत्यांच्या ठिकाणांचा कसलाही अभ्यास होणे अशक्य होते. दुसरे कारण म्हणजे सोव्हिएत महासंघातील घटक राष्ट्रे वेगळी होण्याआधीचे आणि नंतरचे पुरातत्त्वीय संशोधन प्रामुख्याने रशियन भाषेत आहे. तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे काही मोजक्याच गुलाग श्रमछावण्यांवर पुरातत्त्वीय संशोधन झाले आहे. पुरातत्त्वविद्येची रशियातील परंपरा मोठी आहे. पाश्चात्त्य देशांप्रमाणेच तेथील संशोधन वैज्ञानिक काटेकोरपणाने केले जात असले, तरी गुलाग श्रमछावणीची पद्धत अधिकृतपणे अलीकडेच बंद झाली (१९८७), त्यामुळे पुरातत्त्वीय संशोधनाला आवश्यक अशा पूरक दस्तऐवजांचा अभ्यास होणे बाकी आहे. श्रमछावणीतील भयंकर जीवन जगलेले काहीजण अद्याप जिवंत असून ते सहजासहजी माहिती देत नाहीत. सोव्हिएत महासंघातून वेगळ्या झालेल्या बहुतेक घटक राष्ट्रांमधील आणि पूर्वी सोव्हिएत महासंघाचे अंकित असलेल्या इस्टोनिया, लिथुआनिया, लात्विया, रूमेनिया, पोलंड व हंगेरी या देशांमधील जनमत गुलाग श्रमछावण्यांचा ’काळा वारसा’ जपायला अनुकूल नाही. साहजिकच गुलाग श्रमछावण्यांच्या पुरातत्त्वीय संशोधनाला फारसे प्रोत्साहन मिळत नाही.
ज्या काही मोजक्या गुलाग श्रमछावण्यांवर पुरातत्त्वीय संशोधन झाले आहे, ते पद्धतशीर आणि उत्तम गुणवत्तेचे आहे. सैबेरियात बोरस्की (Borsky) येथे तीन श्रमछावण्या होत्या (१९४९-५१). त्यांमधून कोदार पर्वतराजीतील युरेनियम खाणींना लागणारे मजूर पुरवले जात. त्यामधील ’मार्बल की’ या ठिकाणी हवाई छायाचित्रण आणि तेथील अवशेषांचा प्राथमिक पुरातत्त्वीय अभ्यास झाला आहे.
लिथुआनियात व्हिल्नियस या ठिकाणी केजीबी या सोव्हिएत गुप्तचर यंत्रणेची कैदीछावणी होती (१९४४-४७). गुलाग प्रकारच्या श्रमछावण्यांमध्ये पाठवण्याआधी कैदी या ठिकाणी ठेवले जात आणि त्यांपैकी बहुतेकांना ठार केले जाई. येथील सामूहिक दफनांच्या उत्खननात ७२० सांगाडे मिळाले असून जवळजवळ सर्वांच्या कवट्यांमध्ये गोळी घातल्याच्या व हाडांवर शारीरिक छळाच्या खुणा आढळून आल्या. याखेरीज लिथुआनियातील सिल्यूते जिल्ह्यातील मसीकाय व आर्मालेनाय या दोन गावांमधील १९४३-४४ दरम्यानच्या गुलाग श्रमछावण्यांच्या पुरातत्त्वीय सर्वेक्षणाचे व उत्खननात मिळालेल्या अवशेषांचे संशोधन झाले आहे.
संदर्भ :
- Applebaum, Anne, Gulag : A History, New York, 2003.
- Jakobson, Michael, Origins of the Gulag : The Soviet Prison Camp System, 1917-1934, Lexington, 2014.
- Klejn, Leo S. Soviet Archaeology, Trends, Schools and History, Oxford, 2012.
- Rossi, Jacques, The GULAG Handbook, A Historical Dictionary of Soviet Penitentiary Institutions and Terms Related to the Forced Labour Camps, London,1987.
समीक्षक : सुषमा देव