बाळकडू हे झुडूप रॅनन्क्युलेसी (मोरवेलीच्या) कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव हेलेबोरस नायगर आहे. ही बहुवर्षायू वनस्पती दक्षिण व मध्य यूरोपात, पश्चिम आशियात आणि भारतातील डोंगराळ भागात वाढते. बाळकडूची फुले रानटी गुलाबाप्रमाणे दिसत असली, तरी ती गुलाबाच्या कुलातील नाही. बाळकडू वनस्पतीला नाताळच्या सुमारास फुले येतात, म्हणून तिचे इंग्रजीत ‘ख्रिसमस रोज’ हे नाव पडले आहे. फुले आकर्षक असल्यामुळे बाळकडू वनस्पती शोभेकरिता बागांमध्ये लावतात. मात्र ती विषारी वनस्पती आहे.
बाळकडू सदाहरित सपुष्प वनस्पती आहे. तिचे खोड निसर्गत: बहुधा खडकाळ जमिनीत वाढते. जमिनीवरील खोडाची लांबी ९–१२ सेंमी. असते. पाने संयुक्त, मुळ्याच्या किंवा गाजराच्या पानांप्रमाणे मुळांपासून वाढलेली (मूलज), लांब देठाची, गुळगुळीत, वरच्या बाजूने हिरवी गर्द व खालच्या बाजूने फिकट असतात. दले चामड्याप्रमाणे जाड, उभट, ७–९, अनियमित, हस्ताकृती व अंशत: दातेरी असतात. फुले मोठी, पांढरी किंवा फिकट जांभळी असून निदले ५, मोठी व पांढरी असतात; परंतु फलनानंतर ती हिरवी होतात. प्रत्येक खोडावर फक्त एकच फूल असते. फुलाचा दांडा लांब असून पाकळ्या ८–१३ व मधुर रसयुक्त असतात. पुंकेसर अनेक असून त्यांपैकी काहींचे रूपांतर मकरंदाच्या ग्रंथीत झालेले असते. पुटक फळे ५–१० च्या घोसांत येतात. त्यांमध्ये बिया असतात. बियांतील गर तेलयुक्त असतो.
बाळकडू वनस्पतीची लागवड बिया आणि खोडाचे तुकडे लावून करतात. त्याच्या खोडात हेलेबोरीन आणि हेलेबोर्सीन ही ग्लायकोसाइडे असतात. लहान बालकांना ठराविक काळाने उद्भवणाऱ्या तापासारख्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी ते योग्य प्रमाणात देतात. म्हणूनच या वनस्पतीला बाळकडू म्हटले गेले असावे. त्यांपैकी हेलेबोरीन चवीला तीव्र असून ते मादक आहे, तर हेलेबोर्सीन चवीला गोड असून तीव्र रेचक म्हणून वापरतात. ही ग्लायकोसाइडे हृदयावर विषारी परिणाम करतात, म्हणून या वनस्पतीचा वापर जपून करतात.