टेलर, फिलीप मेडोज (२५ सप्टेंबर १८०८ – १३ मे १८७६). प्रसिद्ध ब्रिटिश अँग्लो- इंडियन साहित्यिक, कादंबरीकार, पत्रकार आणि पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये लिव्हरपूल येथे झाला. वडिलांचा किरकोळ व्यापार होता. आई जेन ऑनरिया मिटफोर्ड ही उच्चभ्रू घराण्यातील होती व तिचे तत्कालीन सरदार उमरावांशी नातेसंबंध होते. व्यापारात वडिलांना अपयश आल्यामुळे त्यांना भटकावे लागले. अखेर डब्लिन येथे एका आसवनीत (brewery) व्यवस्थापक म्हणून ते रुजू झाले. त्यामुळे फिलीप टेलर यांचे शालेय शिक्षण कसेबसे जेमतेम पूर्ण झाले. त्यांनी इंग्रजी व लॅटिन या भाषा आत्मसात केल्या. विद्यार्थिदशेतच त्यांच्यात संगीत व चित्रकला यांची आवड निर्माण झाली.

घरच्या गरीब परिस्थितीमुळे त्यांनी मेसर्स येट्स ब्रदर्स या कंपनीत कारकून म्हणून नोकरी पतकरली; पण प्रकृतीअस्वास्थ्यामुळे कंपनीने त्यांना कार्यमुक्त केले (१८२४). दरम्यान वडील हेमेल हेमस्टेड (हर्टफोर्डशायर) येथे गेले असता तेथे फिलीप टेलर यांची बॅक्स्टर या मुंबईमधील व्यापाऱ्याशी ओळख झाली. बॅक्स्टर यांनी त्यांना सहायक म्हणून मुंबईस आणले. ज्या व्यापारी फर्ममध्ये काम करायला ते आले होते, ती फर्म दिवाळखोरीत गेली असल्याचे त्यांना कळले.पुढे आईकडून नातेसंबंध असलेले तत्कालीन मुंबई सरकारचे मुख्य सचिव विल्यम न्यूहॅम यांनी  हैदराबाद संस्थानचे रेसिडंट सर चार्ल्स मेटकाफ यांच्या शिफारशीने  फिलीप टेलर यांची निजामाच्या औरंगाबाद येथील सैन्यात लेफ्टनंटपदावर नियुक्ती केली (१८२४). येथील कार्यकाळात त्यांना कॅप्टन, कर्नल आदी पदांवर पदोन्नती मिळाली. सेवेत असताना त्यांना भारतीय चालीरीती, सामाजिक स्थिती यांची माहिती झाली. त्यांच्याकडे संस्थानातील वायव्येकडील जिल्ह्यात सहायक पोलीस अधीक्षकाची जबाबदारी सोपविली गेली. या सुमारास त्यांचा आर्थिक सल्लागार असलेला विल्यम पामर याच्या मेरी या मुलीशी त्यांनी विवाह केला (१८३२). त्यांना ॲलिस नावाची मुलगी झाली. तथापि अल्पशा आजाराने पुढे पत्नी मेरीचे निधन झाले (१८४४).

फिलीप टेलर यांची कर्नाटकातील निजामाच्या अखत्यारीतील शोरापूर या संस्थानात पोलिटिकल एजंट म्हणून नियुक्ती करण्यात आली (१८४१-१८५३). येथील कार्यकाळात त्यांनी बालराजा व त्याची आई (राणी) ईश्वर–अम्मा यांना सहकार्य करून संस्थानात शांतता व सुव्यवस्था ठेवली. तेथील परिस्थितीवरूनच त्यांनी पुढे तारा आणि सीता या कादंबऱ्या लिहिल्या. येथील यशस्वी कामगिरीमुळे त्यांची नळदुर्ग जिल्ह्यात प्रशासक म्हणून नियुक्ती झाली (१८५३-५७). कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून जरी त्यांची ख्याती असली, तरी स्थानिक लोकांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी फारसी व भारतीय भाषांवर प्रभुत्व मिळविले; तसेच भारतीय चित्रकला, मंदिरस्थापत्य व संगीत या विषयांमध्ये त्यांना रुची निर्माण झाली. अठराशे सत्तावनच्या उठावादरम्यान त्यांनी वऱ्हाड परिसरात शांतता राखली. त्यानंतर पुन्हा ते शोरापूर संस्थानात परतले (१८५८) आणि तेथूनच प्रकृतीअस्वास्थ्यामुळे स्वेच्छानिवृत्ती घेऊन ते इंग्लंडला गेले (१८६०).

फिलीप टेलर यांनी उर्वरित जीवन डब्लिन येथे वाचन-लेखन यांत व्यतीत केले; तथापि सालारजंग यांच्या निमंत्रणावरून १८७५ मध्ये त्यांनी हैदराबाद संस्थानाला भेट दिली. भारतात असताना त्यांनी ठगांच्या कारवाया, येथील सामाजिक राजकीय स्थिती यांचे अवलोकन करून टिपणी केल्या होत्या. तसेच द टाइम्स (लंडन) या दैनिकाचे ते भारतातील अधिकृत पत्रकार होते. याशिवाय निवृत्तीनंतरही त्यांनी द एडिंबर्ग रिव्ह्यू, फ्रेझर्स मॅगॅझीन, आणि द अथेनेइम या नियतकालिकांतून लेखन केले. भारतातल्या वास्तव्यातच त्यांना संशोधनाची व लेखनाची गोडी लागली होती. त्यांनी लंडनच्या द टाइम्ससाठी भारतीय संस्कृतीविषयी दीर्घकाळ लेखन केले. ठगांच्या समस्येवर अभ्यासपूर्वक लिहिलेली कन्फेशन्स ऑफ द ठग (१८३९) ही त्यांची कादंबरी विशेष गाजली. याशिवाय  तत्कालीन भारतीय समाजाचे उत्कृष्ट चित्रण करणाऱ्या टिपू सुलतान :अ टेल ऑफ द म्हैसूर वॉर (१८४१), तारा (१८६३), राल्फ डार्नेल  (१८६५), सीता (१८७३) या त्यांच्या अन्य कादंबऱ्या होत. ए नोबल क्वीन ही त्यांची अखेरची कादंबरी १८७८ मध्ये प्रकाशित झाली; तसेच द स्टोरी ऑफ माय लाइफ हे त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या ॲलिस या मुलीने प्रकाशित केले (१८७८).

फिलीप टेलर यांनी भारतीय इतिहास व पुरातत्त्व यांवर विपुल लेखन केले. त्यांनी जेथे प्रशासकीय सेवा केली त्या सर्व ठिकाणी, विशेषतः शोरापूर संस्थानात, पुरातत्त्वीय अवशेषांची नोंदणी केली व काही महापाषाणयुगीन (megalithic)स्थळांचे उत्खनन केले. त्यांनी कृष्णा-भीमा दोआब प्रदेशात अनेक पुरातत्त्वीय स्थळांचा शोध लावला. टेलर यांनी कर्नाटकातील हिरेबेन्कल, जवरगी, राजन कोलूर आणि चिकनहळ्ळी या ठिकाणी केलेल्या पुरातत्त्वीय कामाचे अहवाल रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. ज्या काळात पुरातत्त्व निव्वळ कुतूहल व प्राचीन अवशेषांची लूटमार करण्यापुरते मर्यादित होते, त्या काळात उत्खननाचा उद्देश स्पष्टपणे मांडणारे, पुरातत्त्वीय अवशेषांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणारे प्रशासकीय अधिकारी असलेले टेलर हे एक अनोखे पुरातत्त्वसंशोधक होते. त्यांची उत्खननाची व अहवाललेखनाची पद्धत तर काळाच्या कितीतरी पुढची होती. आत्मचरित्रात स्वतः फिलीप टेलर यांनी ‘आपल्याला फारसे औपचारिक शिक्षण मिळाले नव्हते’ असे जरी म्हटले असले, तरी साहित्य, भारतीय इतिहास व पुरातत्त्व यांत त्यांनी केलेली कामगिरी थक्क करणारी आहे.

टेलर यांना अनेक मानसन्मान लाभले. त्यांत डब्लिनचा जस्टीस ऑफ पीस पुरस्कार, व्हिक्टोरिया राणीकडून मिळालेला ‘अ कंपॅनियन ऑफ द मोस्ट एक्झाल्टेड ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इंडियाʼ हे उल्लेखनीय होत. रॉयल आयर्लंड ॲकॅडमीचे ते आजीव सदस्य होते.

अल्पशा आजाराने मेंटॉन (फ्रान्स) येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Cadell, Sir Patrick Ed. The Letters of Philip Meadows Taylor to Henry Reeve, Oxford, 1947.
  • Finkelstein, David, Philip Meadows Taylor : Victorian Fiction Research Guides, 1990.
  • Taylor, Philip Meadows The Story of My Life, Edinburgh, 1877.

समीक्षक – शरद राजगुरू

प्रतिक्रिया व्यक्त करा