बिब्बा हा पानझडी वृक्ष अ‍ॅनाकार्डिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सेमेकार्पस अ‍ॅनाकार्डियम आहे. आंबा व काजू या वनस्पतीदेखील याच कुलातील आहेत. बिब्बा मूळचा भारतातील असून हिमालयाच्या बाह्य परिसरापासून दक्षिण भारताच्या टोकापर्यंत तो नैसर्गिकरीत्या वाढलेला आढळतो. तसेच वेस्ट इंडीज व ऑस्ट्रेलिया येथेही तो आढळतो. बिब्बा हे नाव वृक्षासाठी आणि फळांसाठीही वापरतात. फार पूर्वीपासून या फळाच्या सालीतील रस कपड्यांवर खुणा करण्यासाठी वापरण्यात आला आहे. म्हणून बिब्बा वृक्षाला इंग्रजी भाषेत ‘मार्किंग नट ट्री’ हे नाव पडले आहे.

बिब्बा (सेमेकार्पस अ‍ॅनाकार्डियम): (१) वृक्ष, (२) फुले असलेली फांदी (३) फांदीवरील फळे, (४) बिबुट्यांसह असलेली फळे (बिब्बे)

बिब्बा वृक्ष मध्यम आकाराचा असून उंची ६–१२ मी. असते. त्याचे छत्र ५-६ मी. व्यासाचे असते. पाने साधी, एकाआड एक, २०–४० सेंमी. लांब, १०–३० सेंमी. रुंद व चिवट असतात. ती टोकाला अधिक रुंद तर देठाकडे निमुळती असतात. मे महिन्यात वृक्षाला पालवी येते आणि उन्हाळ्यात आंब्याच्या मोहरासारखे परंतु विरळ तुरे येतात. फुले लहान, हिरवट पांढरी व पिवळसर आणि अनाकर्षक असतात. फळे हिवाळ्यात लागतात. फळे सुरुवातीला हिरवी असून नंतर काळी होतात. या फळांनाही बिब्बा म्हणतात. फळे काळी, चपटी, काहीशी हृदयाकृती व २-३ सेंमी. आकाराची असतात. त्यांचे देठ फुगीर, मांसल व पिवळ्या रंगाचे असून ते खाण्यायोग्य असतात. त्यांना बिबुट्या म्हणतात. पशु-पक्षी हे बिबुटे आवडीने खातात. बिब्बे खाली गळून पडतात व पावसाळ्यात सहजपणे रुजतात.

बिब्ब्यापासून तयार केलेली औषधे खोकला, दमा, अपचन, यकृतवृद्धी, सूज व व्रण या विकारांवर अत्यंत गुणकारी समजली जातात. वल्ही आणि काडेपेट्या बनविण्यासाठी बिब्ब्याचे लाकूड वापरतात. बिब्बा वृक्षावर लाखेचे कीटक चांगले पोसले जातात. बिब्ब्याच्या तेलाचा उपयोग कीडनाशक आणि कीडप्रतिबंधक म्हणून व्हॉर्निशामध्ये करतात. फळे मुख्यत: औषधी उपयोगासाठी गोळा केली जातात. ती विषारी असून त्यावर योग्य प्रक्रिया न करता वापर केल्यास अधिहर्षता (ॲलर्जी) होऊ शकते. वनीकरणासाठी  व वृक्ष लागवडीसाठी हा एक उत्तम बहुगुणी वृक्ष आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा