एक नैसर्गिक पर्यावरणीय आपत्ती. पृथ्वीच्या कवचात कोणत्याही कारणाने क्षोभ निर्माण होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाला अचानक व जाणवण्याइतक्या बसलेल्या धक्क्याला भूकंप म्हणतात. भूकंपाचा धक्का कधीकधी एवढा जोरदार असतो की, त्यामुळे मोठमोठ्या इमारती जमीनदोस्त होतात, मोठे वृक्ष डगमगून पडतात आणि हजारो लोक मृत्युमुखी पडतात.
पृथ्वीच्या कवचात क्षोभ निर्माण होऊन कधीकधी भूगर्भातील ऊर्जा अचानक मुक्त होते. ही ऊर्जा तरंगांच्या स्वरूपात सभोवताली दूरवर पसरते. या तरंगांना भूकंप तरंग म्हणतात. या तरंगांमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग हादरतो आणि भूकंपाचा धक्का जाणवतो. भूकंप तरंग जेथे उगम पावतात त्या स्थानाला भूकंप नाभी म्हणतात आणि त्या स्थानाच्या सरळ वर भूपृष्ठावरील स्थानाला अपिकेंद्र म्हणतात. सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या भूपट्टांमधील विभंग, ज्वालामुखी, भूमिपात, खाणकाम, अणुचाचणी इत्यादींमुळे भूकंप होऊ शकतात. अधिकतर भूकंप हे भूपट्टांमधील विभंगाच्या ठिकाणी घडून येत असतात.
पृथ्वीचे बाह्यकवच एकसंध नसून ते सु. ३० दृढ आणि कठीण भागांचे बनलेले आहे. त्यांना भूपट्ट म्हणतात. त्यांपैकी १० भूपट्ट आकारमानाने विशाल आहेत. प्रत्येक भूपट्ट हा पृथ्वीचे कवच आणि कवचाखालील उष्ण खडक (म्हणजे प्रावरणाचा काही भाग) यांचा बनलेला असतो. कवच आणि प्रावरणाचा भाग यांपासून बनलेल्या या थराला शिलावरण म्हणतात. भूपट्ट दुर्बलावरणावर म्हणजे प्रावरणातील शिलावरणाच्या खाली उष्ण व मृदू खडकांचा जो भाग असतो त्यावर (पाण्यावर जसे लाकडाचे तराफे तरंगतात तसे) मंदपणे सतत सरकत असतात. भूपट्टांची ही हालचाल एकमेकांत अडकणे-निसटणे व धक्के खात सरकणे अशी होत असते. भूपट्टांच्या अशा हालचालींमुळे भूपट्टांच्या कडा जेथे एकत्र येतात तेथील खडकांमध्ये ताण निर्माण होऊन भूपट्टांच्या कडांच्या आजूबाजूला विभंग क्षेत्र निर्माण होत असते. काही वेळा भूपट्टाचे खडक एकमेकांमध्ये असे अडकतात की ते हलू शकत नाहीत. अशा वेळी विभंगाच्या दोन्ही बाजूंच्या खडकांमध्ये ताण वाढत जाऊन ते तुटतात आणि ते पुढे-मागे किंवा वर-खाली सरकतात आणि त्यामुळे भूकंप घडून येतात. भूकंप होण्यामागे भूकवचाच्या हालचाली कशा घडून येतात, यासंबंधी भूपट्ट विवर्तनिकी (प्लेट टेक्टॉनिक) सिद्धांत मांडण्यात आला आहे.
विभंगांचे तीन प्रकार आहेत : (१) सामान्य विभंग : या प्रकारात, वरच्या बाजूला असलेल्या भूपट्टाचा भाग वर होऊन तुटलेला भाग खाली सरकतो. (२) व्युत्क्रमी विभंग : या प्रकारात, भूपट्टाचा एक भाग वरच्या दिशेने, तर दुसरा खालच्या दिशेने सरकतो. (३) आघात-सरक विभंग : या प्रकारात, भूपट्टाचे दोन्ही भाग एकमेकांना घासून, विभंग रेषेजवळ एकमेकांपासून दूर किंवा एकमेकांच्या जवळ सरकतात. क्वचित भूपट्टाच्या मधल्या भागामध्ये विभंग निर्माण होऊन भूकंप होतात. त्यांना आंतरपट्ट भूकंप म्हणतात. १९६७मध्ये महाराष्ट्रातील कोयनानगरचा भूकंप हे आंतरपट्ट भूकंपाचे उदाहरण आहे.
मोठ्या भूकंपाच्या धक्क्याआधी कमी तीव्रतेचे धक्के जाणवतात. त्यांना पूर्वधक्के म्हणतात. भूपट्ट विभंगापाशी सरकत असताना त्याखाली असलेले लहानमोठे खडक घर्षणामुळे फुटून असे धक्के बसतात. काही वेळा मोठे भूकंप मात्र कोणतीही पूर्वसूचना न मिळता घडून येतात. भूकंपाच्या मोठ्या धक्क्यांनंतर त्या भागात अनेक लहानलहान धक्के बसतात. त्यांना पश्चात धक्के म्हणतात. भूकंपाच्या मुख्य धक्क्यामुळे भूपट्टांच्या खडकांमध्ये साचलेला ताण जोपर्यंत मोकळा होत नाही तोपर्यंत असे धक्के बसतात. या धक्क्यांची तीव्रता बरीच कमी असल्यामुळे फारसे नुकसान होत नाही.
पर्यावरणाच्या दृष्टीने, भूकंपाचे परिणाम विध्वंसक आणि विधायकही असतात. भूकंपामुळे भूमीला लांब, खोल व अरुंद भेगा पडतात. या भेगांमुळे जमिनीलगतचा काही भाग वर उचलला जातो किंवा खचला जातो. खडक स्थलांतरित होतात. भूघसरण होण्यास चालना मिळते. नदी, तलाव, सरोवरे आणि इतर जलाशय यांचे काठ दुभंगल्यामुळे पूर येतात. स्थानिक परिसंस्थेत बदल घडून येतात. भूमी हेलकावल्याने खडकाचे खंड वर-खाली होतात आणि इमारतींचा पाया निखळल्यामुळे इमारती कोसळतात. परिणामी नागरी व आर्थिक हानी हाेते व पर्यावरणाचे नुकसान होते.
भूकंपामुळे भूकवचाच्या भागाचे आकुंचन होते. त्यामुळे पाण्याचे नळ, तेलवाहिन्या व लोहमार्ग वाकतात, नद्यांवरील पूल तसेच इमारती कोसळतात, दूरध्वनीच्या तसेच विजेच्या तारा तुटतात आणि वाहतूक व संदेशवहन विसकळित होते. नागरी वस्त्यांमधील सांडपाण्याच्या नलिका फुटतात. हे दूषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळून पिण्याचे स्रोत प्रदूषित होतात. प्रदूषित पाण्यामुळे पटकी, विषमज्वर व जुलाब असे आजार पसरतात. पर्वतीय प्रदेशात भूकंपामुळे भूमिपात होतो आणि पर्वताच्या पायथ्यालगत असलेल्या वनस्पती, तेथील प्राणी तसेच नागरी वस्त्या गाडल्या जातात. हिमाच्छादित प्रदेशात हिमलोट होतात. त्यामुळे सजीवही मृत्युमुखी पडतात.
समुद्राच्या पृष्ठावर झालेल्या भूकंपामुळे त्सुनामींची निर्मिती होते (पहा : त्सुनामी). या सागरी लाटांच्या प्रभावामुळे किनाऱ्यावरील परिसंस्था उध्वस्त होतात. सागरातील व किनारी भागातील पारिस्थितिकीय समतोल बिघडतो. काही वेळा भूकंपामुळे जमिनीतून वायू बाहेर पडतात व धूर निघतो. त्यामुळे आग लागण्याची शक्यता असते. परिणामी अनेक जीव मृत्युमुखी पडतात. भूपृष्ठातून बाहेर पडलेल्या विषारी रसायनांमुळे हवा, मृदा व जल प्रदूषित होतात.
भूकंपाचे पर्यावरणीय विधायक परिणामही दिसून येतात. भूकंपामुळे खडकांचे विघटन होऊन खडकांचे क्षरण होते व मृदानिर्मिती होते. ही नवीन मृदा सुपीक असते. भूजलाची पातळी वाढते आणि विहिरी व तलाव यांतील जलसाठा वाढतो. जमीन उंच झाल्यामुळे नवीन भूमी उपलब्ध होते. किनारी भागात खाड्यांची निर्मिती होऊन जलवाहतूक व मत्स्योत्पादन करण्याकरिता त्यांचा उपयोग होतो.
भूकंपाचे स्थान व त्याची तीव्रता ह्या बाबी भूकंपलेखाद्वारे निश्चित केल्या जातात. भूकंपमापकाद्वारे भूकंप-तरंगांची भूमीवरील हालचाल शोधली जाते. भूकंपाच्या धक्क्यातून किती ऊर्जा बाहेर पडते, त्यावरून भूकंपाची तीव्रता ठरवितात. भूवैज्ञानिक चार्ल्स रिश्टर यांनी १९३५मध्ये भूकंपाची तीव्रता ठरविणारे मापक्रम तयार केले. भूकंपाची तीव्रता या मापन पद्धतीला रिश्टर प्रमाण (रिश्टर स्केल) म्हणतात. या पद्धतीत भूकंपाची तीव्रता (मॅग्निट्यूड) एक अंकाने वाढली, तर भूकंपामुळे मुक्त झालेली ऊर्जा ३२ पट वाढली, असे मानतात. उदा., रिश्टर प्रमाण ७ असलेल्या भूकंपामुळे रिश्टर प्रमाण ६ असलेल्या भूकंपाच्या तुलनेत ३२ पट अधिक ऊर्जा मुक्त होते. ३ रिश्टर प्रमाण किंवा त्याहून कमी प्रमाण असलेल्या भूकंपाची जाणीव सहसा होत नाही. भूकंपाचे सर्व धक्के भूकंपमापकावर नोंदले जात असतात. ७ किंवा अधिक रिश्टर प्रमाण असलेल्या भूकंपामुळे इमारती जमीनदोस्त होऊ शकतात.
आत्तापर्यंत सर्वांत मोठा भूकंप १९६०मध्ये चिली देशात घडून आला होता. या भूकंपाची तीव्रता रिश्टर प्रमाणावर ९·५ एवढी नोंदली गेली होती. २०११मध्ये जपानमधील फुकुशिमा शहरात झालेल्या भूकंपाची तीव्रता ७·१ होती. या भूकंपामुळे जपानमधील सार्वजनिक तसेच वैयक्तिक संपत्तीची हानी मोठ्या प्रमाणावर झाली. भारतातदेखील कमी-अधिक तीव्रतेचे भूकंप झालेले आहेत. जानेवारी २००१मध्ये गुजरातमधील भूज येथे झालेल्या भूकंपाची नोंद रिश्टर प्रमाणावर ७·७ एवढी होती. या भूकंपामुळे तेथील लोकांचे आर्थिक नुकसान झाले, त्याशिवाय सु. २०,००० लोक मृत्युमुखी पडले. महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यात सप्टेंबर १९९३ मध्ये झालेला भूकंप रिश्टर प्रमाणावर ६·२ एवढा नोंदला गेला असून त्यात सु. ९५०० लोक मृत्युमुखी पडले. २६ डिसेंबर २००४ रोजी इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटाजवळ ९·१ रिश्टर प्रमाण असलेला भूकंप झाला. त्यामुळे निर्माण झालेल्या त्सुनामी सागरी लाटांमुळे भारतात सु. १५,००० लोक मृत्युमुखी पडले. जगातील सु. ८०% प्रमुख भूकंप पॅसिफिक महासागराच्या पट्ट्यात होतात. भूकंप केव्हा होणार याचे पूर्वानुमान करण्यासाठी सध्या संशोधन चालू असून काही सौम्य भूकंपांचे पूर्वानुमान करण्यात भूवैज्ञानिकांना यश आले आहे.
भूकंपामुळे विधायक परिणामांपेक्षा विध्वंसक परिणामच अधिक घडून येतात. त्यामुळे या आपत्तिकालाचे व्यवस्थापन करावे लागते. त्यासाठी सर्वप्रथम भूकंपप्रवण क्षेत्र निश्चित करून तेथे भूवैज्ञानिक सर्वेक्षण व संशोधन केंद्र उभारतात. केंद्रात भूकंपाविषयी माहिती स्पष्ट करणारी व पूर्वसूचना देणारी आधुनिक उपकरणांची मांडणी करतात. अशा भूकंपाची पूर्वसूचना तात्काळ पोहोचण्यासाठी संदेशवहन व्यवस्था कार्यक्षम असावी लागते. महाराष्ट्रात कराड येथे असे केंद्र (भूकंप संशोधन केंद्र) उभारण्यात येत आहे. प्रसारमाध्यमांनी भूकंपाविषयी लोकांना वस्तुस्थिती सांगून अफवा पसरणार नाहीत, याची दक्षता घेणे गरजेचे असते. निराधार विधाने व भाकिते करून जनतेची दिशाभूल होणार नाही याचे भान अभ्यासकांना, तज्ज्ञांना राखावे लागते. भूकंप आल्यावर लोकांनी कसे राहावे व काय करावे यांसंबंधीचे प्रशिक्षण भूकंपप्रवण क्षेत्रात दिले जाते. शालेय शिक्षण व लोकशिक्षण यांतून भूकंपासारख्या नैसर्गिक संकटाची माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो.
भूकंपप्रवण क्षेत्रात घरे, इमारती व पूल अशा बांधकामांच्या बाबतीत विशेष दक्षता घ्यावी लागते. घरे शक्यतो तळमजली असावीत. घराचा पाया मजबूत असून तो घराच्या भागांना जोडलेला असावा. घरे शक्यतो चौरसाकार बांधावीत. घरांना सज्जा व मंडपी नसाव्यात. घरासाठी लाकूड व छतासाठी गवत किंवा काँक्रीटचे पत्रे वापरणे सोयीचे असते. घराच्या भिंतींचे कोपरे, दरवाजे व खिडक्यांवरील लिंटल यांच्या पोकळ्या व्यवस्थित भराव्यात. इमारती ३० मी.पेक्षा अधिक उंच नसाव्यात. मोठ्या भिंतीची लांबी भिंतीच्या जाडीच्या दहापट असावी. दारे व खिडक्यांचा आकार प्रमाणबद्ध असावा. घराचे बांधकाम दगडाचे असल्यास दगड शक्यतो लहान असावेत. इमारतीच्या बांधकामाचा जमिनीकडील भाग लवचिक व एकसंध असावा. घरे उतारावर किंवा मुरुमाच्या जागी बांधू नयेत. भूकंपामुळे इमारती व घरे कोसळल्याने अधिक हानी होत असल्याने ती भूकंपात टिकून राहतील अशी बांधावी लागतात. भूकंपाचा परिणाम बांधकामावर काय होतो आणि भूकंपरोधी तंत्रे कशी विकसित करता येतील याचा अभ्यास भूकंप अभियांत्रिकी या शाखेत होतो. अशी तंत्रे वापरून अनेक शहरात उंच इमारती बांधल्या गेल्या आहेत. लातूरच्या भूकंपामुळे मोठ्या संख्येने मनुष्यहानी झाली, कारण तेथील घरबांधणी भूकंपरोधक नव्हती. भूकंप ही नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे भूकंपग्रस्तांना सर्वतोपरी मदत करणे, हे प्रत्येकाने आपले कर्तव्य मानले पाहिजे.